चला, झाडांची कत्तल थांबवूया ! 

चला, झाडांची कत्तल थांबवूया ! 

रात्रीच्या अंधारात दुष्कृत्ये केली जातात, असे म्हटले जाते. मात्र, पिंपरी-चिंचवड शहरात रात्री कमी आणि दिवसाच जास्त, अशी स्थिती वृक्षतोडीची आहे. स्वबळावर वाढत राहिलेल्या या झाडांची कत्तल केली जात आहे. उघड्या डोळ्याने येणारे-जाणारे ते बघत असतात; पण धारदार करवती हाती घेतलेल्या माणसांना कोणी अडवत नाही. याला कारण आहे, लोकजागृतीचा अभाव. हाकेच्या अंतरावर असलेल्या पुण्यात मात्र, उलट परिस्थिती आहे. फांद्या छाटण्यासाठी महावितरणचा कर्मचारी झाडाजवळ गेला, तरी लोक त्याच्याकडे परवानगी विचारतात. मोठी झाडे तोडण्याची हिंमत, तर लांबच राहिली. त्यातून कोणी बेकायदा कुऱ्हाड चालविण्याचा प्रयत्न करत असला, तर तेथील नागरिक थेट शंभर नंबरला फोन करतात. त्यानंतर अवघ्या पाच मिनिटांत पोलिस कारवाई केली जाते. 

असा आहे कायदा 
वृक्षतोड म्हणजे काय हे कायद्याने अगदी सोपे करून सांगितले आहे. "महाराष्ट्र (शहरी क्षेत्र) वृक्षांचे संरक्षण व संरक्षण अधिनियम 1975 कलम 2 (क) मध्ये लिहिले आहे की, झाडे जाळणे, तोडणे किंवा नुकसान करणे यासारखे कोणतेही कृत्य म्हणजे वृक्षतोड. याचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कायद्याचे संरक्षक म्हणून महापालिका वृक्ष प्राधिकरणाने पोलिसात तक्रार द्यावी. प्रत्येक गुन्ह्यासाठी किमान एक हजार ते पाच हजार रुपये दंड किंवा एक आठवड्याचा कारावास, अशी शिक्षा.'' 

नागरिकांनो, जागे व्हा! 
लोकांनी आता जागरूक व्हायला हवे. पर्यावरण प्रेमी नागरिक व संघटना आपापल्या परीने लढा देतच आहेत. मात्र, आता ही लोकचळवळ बनायला हवी. यासाठी काय करूया, फलक लावण्यासाठी कोणी झाडावर खिळे ठोकताना दिसला, फ्लेक्‍सचा सांगाडा झाडामध्ये लावत असेल, तर त्याच्याकडे वृक्षतोडीचा परवाना आहे का? याची विचारणा करूया. त्याच्याकडे नसेल, तर पोलिसांना फोन करा. प्रत्येकाने आपल्या घराच्या परिसरातील झाडांवर जातायेता लक्ष ठेवले, तरी पर्यावरण रक्षणाचे काम होईल. 

भ्रष्टाचाराची साखळी सक्रिय? 
सध्याची स्थिती अशी आहे, मोठा ट्रक येतो. दहा-बारा लोकं उतरतात. इलेक्‍ट्रॉनिक कटर मोठमोठ्या झाडांच्या बुंध्यांना लावतात. नंतरच्या तासाभरात तिथे उरतो तो फक्त पालापाचोळा. हे सर्व लोक कोण आहेत? कुठून आले? ट्रक गेला कुठे? कोणालाच काही माहीत नसते. भ्रष्टाचाराची ही मोठी साखळी बलदंड आहे. निसर्गाने दिलेली, शहर उभारणी करताना लावलेली पर्यावरणप्रेमींनी जतन केलेली आणि आता मोठी झालेली, ही झाडे आता माफियांचे "लक्ष्य' ठरत आहेत. यामागे कोट्यवधींचा भ्रष्टाचार असणार हे उघड आहे. रस्त्यावरचे खड्डे बुजवायला तीन-चार महिने लावणाऱ्या नगरसेवकांना ही वृक्षतोडीची बाब माहीत नसेल का? 

कामाच्या शोधार्थ कित्येक मैलावरील गावाकडून आलेल्या इथल्या प्रत्येकाला या शहराने जगवलं आहे. त्यामुळे आता हे शहर आपलं मानून निसर्गसंपदा जगवण्यासाठी आपण साऱ्यांनीच पुढे यायला हवे. आता फक्त आपण एकच करूया, कोणीही झाड तोडत असेल, तर त्याला परवानगी विचारूया किंवा शंभर नंबरला याबाबत फोन करून कळवूया. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com