बुद्धपौर्णिमा विशेष : संस्कृत भाषेतलं समृद्ध बौद्ध साहित्य

Aurangabad News
Aurangabad News

गौतम बुद्ध हे महान भारतीय तत्त्वज्ञ व बौद्ध धर्माचे संस्थापक होते. सर्व सामान्यांना कळावे, म्हणून तथागत बुद्धांनी लोकभाषेत आपला उपदेश केला. हा धर्मोपदेशक प्रत्येकाने आपल्या भाषेत जाणून घ्यावे, असा बुद्धांचा आदेश असल्याने निरनिराळ्या भाषांमध्ये बौद्ध साहित्य उपलब्ध असलेले दिसते. बौद्धधर्माचे प्रमुख ग्रंथ पाली भाषेत आहेत. संस्कृतमध्ये देखील अनेक बौद्ध ग्रंथ आढळतात. महायान आणि वज्रयान पंथाच्या धार्मिक साहित्याची भाषा संस्कृत आहे.

गौतम बुद्धांचे पहिले चरित्र संस्कृतमध्ये लिहिले गेले. इ.स. पहिल्या शतकातील संस्कृत कवी, नाटककार तत्त्वज्ञ अश्वघोष यांनी 'बुद्धचरितम्' हे संस्कृत महाकाव्य लिहिले. बुद्धचरिताचे मूळ अठ्ठावीस सर्ग होते. त्यापैकी सध्या चौदाच सर्ग उपलब्ध आहेत. यात बुद्धांच्या जन्मापासून तर बुद्धत्वप्राप्तीपर्यंतची कथा आहे. इतर बुद्ध चरित्रात जी अतिरंजित चमत्काराची वर्णने असतात, तशी यात नाही. चीनी प्रवासी इत्सिंगच्या मते बुद्ध चरित त्या काळी खूप लोकप्रिय होते.

या व्यतिरिक्त अश्वघोषांनी सौन्दरनंद, शारिपुत्रप्रकरण, वज्रसूची, गण्डीस्तोत्रगाथा, सूत्रालंकार हे संस्कृत ग्रंथ लिहिले आहेत. सौन्दरनंद हे १८ सर्गांचे काव्य आहे. बुद्धांनी नंद या आपल्या सावत्र भावाचे धर्मांतर कसे केले, हा या काव्याचा विषय आहे. शारिपुत्रप्रकरण ह्या नाटकात शारिपुत्र आणि मौद्गल्यायन यांचे बुद्धांनी घडवून आणलेले धर्मांतर दाखविले आहे. अश्वघोषाचा प्रभाव उत्तरकालीन साहित्यकारांवरही झाल्याचे दिसते.

हीनयान पंथाचा प्रसिद्ध ग्रंथ महावस्तू पाली मिश्र संस्कृतमध्ये आहे. ह्याचप्रमाणे ललितविस्तर ह्या नावाचा ग्रंथ प्राकृत-संस्कृतमिश्र भाषेत असून, ह्यात धर्मचक्रप्रवर्तनापर्यंतचे बुद्धचरित्र आहे.

अनेक बौद्ध संस्कृत ग्रंथातून तत्कालीन वेगवेगळ्या बौद्ध पंथांची विचारसरणी कळण्यास मदत होते. नागार्जुनाची मूलमध्यमककारिका व त्यावर चंद्रकीर्ती यांनी लिहिलेला प्रसन्नवदा हा टीका ग्रंथ माध्यमिकांचे तत्वज्ञान सांगतात. लंकावतारसूत्र, असंगाचे योगाचार-भूमि-शास्त्र, वसुबंधूची विंशतिका व त्रिंशिका हे ग्रंथ विज्ञानवादाचा पुरस्कार करतात. स्फुटार्था अभिधर्मकोशव्याख्या व अभिधर्मदीप हे ग्रंथ वैभाषिक व सौत्रांतिक ह्या संप्रदायांची तात्त्विक विचारसरणी समजावयास उपयुक्त आहेत.

सर्वास्तिवादी व मूलसर्वास्तिवादी ह्या संप्रदायांचे काही ग्रंथ संस्कृतमध्ये लिहिले गेले होते. सर्वास्तिवाद्यांचे त्रुटित प्रातिमोक्षसूत्र, त्रुटित महापरिनिर्वाणसूत्र, तसेच मूलसर्वास्तिवाद्यांचे प्रतिमोक्षसूत्र व विनयपिटकातील काही परिच्छेद हे संस्कृतमध्ये आहेत. 

महायान पंथाचे अष्टसाहस्त्रिका प्रज्ञापारमिता, गंडव्यूहसूत्र समाधिराजसूत्र व सद्धर्मपुंडरीक हे संस्कृत ग्रंथ प्रसिद्ध आहेत. सद्धर्मपुंडरीक ह्या ग्रंथाला चीन व जपानमध्ये फार मोठे महत्त्वाचे स्थान होते. तसेच लंकावतार सूत्र, सुवर्णप्रभास, समाधीराज, कारंडव्यूह, तथागतगुह्यक, दशभूमिश्वर, रत्नकूट हे सूत्रग्रंथ देखील विशेष प्रसिद्ध होते.

अवदान साहित्यातील अवदानशतक, दिव्यावदान यांसारख्या संस्कृत ग्रंथांत बुद्धाच्या मागील जन्मातील सद्‍गुणांचे वर्णन आहे. कल्पद्रुम अवदानमाला, अशोकावदानमाला, द्वाविन्शात्यावदानमाला असे अनेक संस्कृत अवदान ग्रंथ आहेत. क्षेमेंद्र कवीची अवदान कल्पलता हा ११ व्या शतकातील ग्रंथ तिबेटमध्ये लोकप्रिय होता.

अभिधर्म साहित्यातील अनेक ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत. वसुबंधूचा अभिधर्मकोश व त्यावरील त्याचे स्वतःचे भाष्य, असंगचा अभिधर्मसमुच्चय, घोषकाचे अभिधर्मामृत, महाकात्यायानाचे प्रज्ञाप्तीपद हे यातील काही प्रमुख ग्रंथ.

बुद्धांच्या अनेक जन्मातील कथा सांगत त्याद्वारे शिकवण देणारे साहित्य म्हणजे जातक कथा. आर्यशूर द्वारा रचित जातकमाला आणि हरिभट्ट द्वारा रचित जातकमाला हे ग्रंथ संस्कृतमध्ये आहेत.

तांत्रिक बौद्ध संप्रदायाचे वाङ्मय संस्कृत भाषेत असून श्री गुह्यसमाजतंत्र हा त्यांचा ग्रंथ प्रमुख म्हणून गणला जातो. ह्याशिवाय अद्वयवज्रसंग्रह, सहजसिद्धि, हेवज्रतंत्र, मंजुश्रीमूलकल्प वगैरेंसारखे अनेक ग्रंथ संस्कृतमधून आहेत. 

आचार्य शांतिदेव यांचा बोधिचर्यावतार हा ग्रंथ ७व्या शतकात फार प्रसिद्ध होता. बौद्धाचार्य कमलशील यांचे भावनाक्रम, बोधिचित्तभावना, मध्यमकालोक, श्रद्धोत्पादप्रदीप, मध्यमकालोक, तत्त्वसंग्रहपञ्जिका, आर्य सप्तशतिका प्रज्ञापारमिता टीका असे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत.

बौद्ध धर्मातील अनेक स्तोत्र आणि मंत्र संस्कृतमध्ये आहेत. राहुलभद्र यांनी रचलेले प्रज्ञापारमितास्तोत्र, नागार्जुन रचित धर्मधातुस्तव, मातृचेतद्वारा रचित शतपंचाशिका आणि चतुःशतक, आर्यदेव द्वारा रचित चतुःशतक ही काही उदाहरणे.

अनेक संस्कृत ग्रंथांनी बौद्ध वाङ्मय समृद्ध केले होते. या ग्रंथांची तिबेटी, चीनी आणि इतर विदेशी भाषांत भाषांतरे झाली. काळाच्या ओघात अनेक मूळ संस्कृत ग्रंथ नष्ट झाले. परंतु भाषांतरित ग्रंथांवरून आपल्याला मूळ संस्कृत ग्रंथसंपदेचा अंदाज लावता येतो. तिबेटी भाषेत ‘कांजूर’ व ‘तांजूर’ असे दोन मोठे ग्रंथसंग्रह असून त्यांत साडेचार हजाराच्यावर ग्रंथ आहेत. ह्यांत प्रामुख्याने मूळ संस्कृत ग्रंथाची भाषांतरे आहेत. चिनी भाषेतही असे २,००० च्या वर मूळ संस्कृत ग्रंथाची चिनी संस्करणे आहेत. बौद्ध वाङ्मयात संस्कृत बौद्ध ग्रंथांचे महत्वपूर्ण स्थान आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com