esakal | पंकजा मुंडेंना डावलायचे अन् त्यांच्याच समर्थकांना कुरवाळायचे
sakal

बोलून बातमी शोधा

पंकजा मुंडेंना डावलायचे अन् त्यांच्याच समर्थकांना कुरवाळायचे

पंकजा मुंडेंना डावलायचे अन् त्यांच्याच समर्थकांना कुरवाळायचे

sakal_logo
By
दत्ता देशमुख : सकाळ वृत्तसेवा

बीड : राज्यात भाजपमध्ये मासलिडर कोण असा प्रश्न आला तर राजकारण कळणारे आणि विरोधी पक्षातलेही पटकन पंकजा मुंडे हे उत्तर देतील. पण, व्यक्ती महत्वाला भाजमध्ये स्थान नाही म्हणतानाच केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस याला अपवाद ठरतात. पण, या रांगेत कोणी येऊ नये म्हणून पंकजा मुंडेंच्या समर्थकांना कुरवाळायचे आणि त्यांना डावलायचे अशी खेळी सुरु आहे.

महाराष्ट्रात भाजपला केवळ दिवंगत लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांनी बहुजन चेहरा मिळवून दिला. महाराष्ट्रात भाजप म्हणजे मुंडे - महाजनांचा पक्ष म्हणले जाई. भाजपला तळागळात नेऊन पोचविण्यात त्यांचे योगदान कोणालाही मान्य करावे लागेल. पण त्यांचे भाषणापुरते नाव घेत त्यांचे महत्व हळुहळु कमी करण्याचे प्रयत्न मागच्या सहा वर्षांपासून सातत्याने होत आहेत. दरम्यान, लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांच्या दुर्दैवी निधनानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे त्यांचा राजकीय वारसा आला. त्यांनी राज्यात संघर्ष यात्रा काढली. भाजपात पक्ष आणि पद काढल्यानंतर कोणाच्या नावाने लोक जमतात हे दिवंगत मुंडेनंतर केवळ पंकजा मुंडेंनी सिद्ध करुन दाखविले. बीड, लातूर, पुणे, परभणी, अहमदनगर, नाशिक, बुलढाणा आदि. जिल्ह्यातील काही मतदारसंघात पंकजा मुंडे यांची ताकद निर्णायक आहे. पण, भाजमधील धुरीणांनाच्या डोळ्यात हीच बाब खुपली. म्हणूनच सत्ता आल्यानंतर पंकजा मुंडेंना महत्वाची खाती दिली तरी त्यांचे महत्व कमी करण्याचे विविध डावपेच आखले जाऊ लागले.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळात महाराष्ट्राचे आठ मंत्री, पाहा कुणाकडे कोणतं खातं?

‘जमवून व जुळवून न घेणे’ हा पंकजा मुंडेंचा ‘विक’ पॉईंट आहेच. म्हणूनच देवेंद्र फडणवीस आणि पंकजा मुंडे यांच्यात वरकरणी सर्वकाही सुरळीत दिसत असले तरी तसे नाही हे अधुन मधून सिद्ध होते. दरम्यान, पंकजा मुंडे यांचा विधानसभेला पराभव झाला असला तरी ६९ मतदार संघांत त्यांच्या सभा झाल्या आणि त्यांच्या पराभवानंतर भाजपचे विजयी झालेले शंभरांवर आमदार त्यांना भेटले. म्हणजेच त्या मासलिडर आहेत आणि त्यांना वंजारी व ओबीसी समजाची साथ असल्यावर शिक्कामोर्तब झाले. मात्र, भाजपला ‘हो ला हो’ म्हणणारे हवेत व्यक्तीविशेष नकोत हे नवे समिकरण झाले आहे. त्यात पंकजा मुंडेंना अॅडजस्ट होता आले नाही.

पुर्वीचा मंत्रीपदाचाही अनुभव नसताना देवेंद्र फडणवीसांना थेट मुख्यमंत्रीपद भेटले म्हणजेच त्यांच्यावर नेतृत्वाची मर्जी आहे ही बाब लक्षात घेण्याऐवजी कधी गोपीनाथगडावर तर कधी भगवानभक्तीगडावर गर्दी जमवून माझ्यामागे जनशक्ती आहे हे पंकजा मुंडे दाखवून देत. मग, याला उतारा म्हणून भाजपने हळुहळु त्यांचे भक्तच दुर करण्याचे नवे तंत्र आणले. यातून अगोदर भागवत कराडांना खासदार, रमेश कराडांना आमदार आणि आता कडी म्हणजे कराडांना केंद्रात मंत्री केले. पंकजा मुंडे जरी नाराज झाल्या तरी त्यांचे भक्त कुरवाळायचे आणि समाजाला स्थान दिल्याचा संदेश द्यायचा अशी ही खेळी आहे.

हेही वाचा: मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार, खातेनिहाय मंत्र्यांची यादी

आता कुठला राजकीय निर्णय घ्यायची योग्य वेळ आहे असे राज्यात वातावरण नाही हे लक्षात आलेल्या भाजपने या निमित्ताने पंकजा मुंडे यांना चांगलेच कोंडीत पकडले आहे. त्यामुळे आतातरी अॅडजस्टमेंट, जुळवून आणि जमवून घेणे ऐवढेच त्यांच्या हाती आहे. त्याच वेळी ग्राऊंडवरील नाळ तुटणार नाही आणि एखाद्या भक्ताचे दैवत बदलले तरी समाज दुरावणार नाही याची काळजी पंकजा मुंडे यांनी घेणे गरजेचे आहे.

loading image