जैवविविधता दिन विशेषः कोरोना'त भेटलं शिवलं ! 

धीरज वाटेकर
गुरुवार, 21 मे 2020

"कोरोना'स्थितीत अनेकांना जैवविविधतेचे विविध नजारे पाहायला, कॅमेऱ्यात टिपायला, शब्दबद्ध करायला मिळत आहेत. असाच एक नजारा लॉकडाऊन एकमधील चैत्र पौर्णिमेच्या (7 एप्रिल) पूर्वसंध्येला अनुभवला. सन 1993 पासून जगभर जैवविविधतेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी 22 मे हा दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जैवविविधतेचा अनपेक्षित आलेला अनुभव.... 

सायंकाळचे सात वाजून गेलेले. ठिकाण कोकणातल्या खेड तालुक्‍यातील सोनगाव भोईवाडी धक्का (बंदर). गेल्या 12/15 वर्षांत खाडी किनाऱ्यावरच्या लोकांच्या हाताला फारशी न लागलेली शिवलं (तिसऱ्या / शिंपले) तुलनेने मोठ्या प्रमाणावर मिळू लागलेली. रामशेठच्या (रेडीज) दुचाकीवर पुढे अत्यावश्‍यक सेवा' असं ठळक शब्दात लिहिलेला कागद चिकटवलेला. 

पेढे - धामणदेवी - सोनगावच्या सीमा' खरंतर समजून न याव्यात इतक्‍या एकमेकांत मिसळलेल्या. पण आज रस्त्यात काठ्या आडव्या टाकून बंद करण्यात आलेल्या. निसर्गमार्गांवरून मुक्त विहरण्याची सवय असल्यानं काठ्यांनी बंद केलेल्या रस्त्याकडे पाहावेना. सोनगाव हद्दीत आल्यावर चालायला सुरुवात केली. सव्वासहा वाजता सोनगाव भोईवाडी धक्क्‌यावर पोहोचलो. आता खाडीपलिकडील समोरच्या डोंगरात भिले गावातील ब्राह्मणवाडी, भुवडवाडी, सुतारवाडी दिसू लागलेली. शहरातल्या वातावरणात वीजेच्या तारेवर एका सरळ रेषेत दिसणारी वेडाराघूची वसाहत पूर्वेकडच्या एका पर्णहीन झाडावर किलबिलाट करत होती. 

कोकणात खाडीकिनाऱ्यावरच्या धक्क्‌यावर उभे. खाडीत दूरवर 2/4 होड्या विहरताहेत. रासायनिक कंपन्यांच्या प्रदूषणाने बाधित झालेला हा परिसर असला तरी कोरोना लॉकडाऊनमुळे हवा - पाण्यातल्या प्रदूषणाची पातळी कमालीची घसरलेय. त्याच्या आनंदछटा निळ्याशार आकाशात पसरल्यात. पश्‍चिमेला सूर्यदेव अस्ताला निघालेत. बरोबर विरुद्ध दिशेस चंद्रमा पूर्णांशाने भेटीस आलेला. पावणेसात वाजता सूर्य अस्ताला गेला तशी चंद्राची माया अधिक जवळची वाटू लागलेली. परतीचं अंतर कापताना तिचाच आधार. मगाच दूरवर खाडीत विहरणाऱ्या 2/4 होड्या जवळ येऊ लागलेल्या. धक्क्‌यावरची लगबग वाढलेली. या बोटी शिवलं पकडायला गेलेल्या. गेल्याप्रमाणे त्यांना शिवल्या मिळालेल्या.

तरुण म्हणाला, पूर्वी 12/15 वर्षांपूर्वी या खाडीत आम्हांला शिवल्या भरपूर मिळायच्या. नंतर बंद झालेल्या. पण गेल्या दोन आठवड्यापासून पुन्हा मिळू लागल्यात.' त्याचं हे वाक्‍य ऐकून मी एकदम चमकलो. लॉकडाऊनमुळे निसर्ग चक्रातील जैवविविधता सध्या आनंदली आहे. निर्मनुष्य वातावरणात विहरते आहे. हे तश्‍यातलं. मगं शिवाल्यांकडं थोडं त्या दृष्टीनं पाहिलं. गावात, शिमग्याला आलेले चाकरमानी इथेच अडकलेले. अशांची संख्याही बरीच. समोरच्या बोटीत यांचीच उपस्थिती. होड्या धक्‍याला लागल्या. प्रत्येक होडीतली 4/2 माणसं बाहेर येऊ लागली. येताना त्यांच्या खांद्यावर शिवल्यानं भरलेली पोती होती. काहींच्या हातात शिवलं पकडायला लागणारं गोलाकार जाळं होतं. पोतं / पिशवी कमी पडल्यानं कोणी बोटीतच ठेवलेल्या शिवल्या घमेल्यातून धक्‍यावर आणण्यात व्यस्त. बाहेर आणलेल्या शिवल्या धक्क्‌यावर पसरल्या गेल्या. यातल्या तुटलेल्या हुडकून बाजूला काढण्याचं काम सुरु झालेलं. उरलेल्या किलोवर विकायच्या असलेल्या. किंवा घरात संपेपर्यंत खायच्या. 3 किलो हव्या असताना कुणाच्या खिशात सुट्टे पैसे नाहीत म्हणून 10 किलो घेतलेल्या. त्यांचा धंदा झाला. त्या शिवल्यांच दर्शन घेऊन निघालेलो. सायंकाळच्या प्रवासात वाशिष्ठी खाडी किनाऱ्यावरून, 5/6 किलोमीटरची पैदल झालेली. चंद्राच्या शीतल छायेतील पदभ्रमणाने, शिवल्यांच्या ताज्या दर्शनाने माझ्यातल्या शाकाहारी' अंतर्मनालाही नैसर्गिक उभारी मिळाली. 
 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या