हाऊ इज द जोश!

हाऊ इज द जोश!

काल एक व्हीडीओ पाहण्यात आला, एका विमानाच्या आत शूट केलेला, त्यात एक वयस्क जोडपं विमानाच्या गॅंगवेमधून बाहेर पडत होतं. विमानातले सगळे प्रवासी आणि कर्मचारी उभे राहून टाळ्या वाजवत होते. वुई आर प्राऊड ऑफ यू, जय हिंद म्हणत त्यांना अभिवादन करत होते. एक तरुण तर पुढे होऊन त्या महिलेच्या पायादेखील पडला. या काही सेकंदाच्या व्हीडीओने माझा दिवसभराचा शिण तर घालवलाच पण यापुर्वी कधीही न पाहिलेल्या त्या जोडप्याला पाहून मनाला एक वेगळीच उभारी मिळाली. त्या अभिमानानं डोळ्यात अश्रू तरळले. 

ते जोडपं माझं कोण लागत होतं? एका अर्थी कोणीच नाही. तरीदेखील त्या व्हीडीओने मला अंर्तबाह्य हलवून सोडलं, ते होते विंग कमांडर अभिनंदन यांचे आईवडिल. अभिनंदन ! ह्यावर्षीच्या प्रचंड राजकिय रणधुमाळी नंतर देखील कदाचित भविष्यात यावर्षाची ओळख आणि अभिमान ठरणारं हे नाव आहे. मिग- २१ विमान घेऊन त्यापेक्षा अतिप्रगत अशा F-16 ह्या विमानाची एका अर्थी शिकारच करत त्यानं आपल्या सरहद्दीचं रक्षण केलं, पण त्यात दुर्दैवानं तो युद्धकैदी झाला. ह्या आपल्या वीर मुलाच्या सुटकेच्या दिवशी त्याला घ्यायला जाणारे आईवडिल त्या व्हीडीओत दिसत होते. रोजच्या रहाटगाडग्यात पिचलेल्या असंख्य मनांना उभारी देण्याची किमया तो एक व्हीडीओ करुन गेला आणि ही किमया घडवली ती सोशल मिडीयानं.

येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ज्या सोशल मिडीयाचा माहिती नसलेला चेहरा किंवा तुलनेने कमी माहित असलेला चेहरा गेल्या काही लेखांमधून आपल्यासमोर मांडतोय, त्याच सोशल मिडीयाची ही झळाळती बाजू आज या आनंदाच्या क्षणी मांडाविशी वाटतेय.
१४ फेब्रुवारीला झालेल्या भयंकर अतिरेकी हल्ल्यानंतर देश हळूहळू सावरत होता. आपल्या नित्यनेहमीच्या गोष्टी पार पाडत होतो पण मनाच्या एका कोपऱ्यात कुठेतरी ह्या झालेल्या प्रकाराविषयी राग, खंत, वेदना डाचत होती. मनात बदल्याची ज्वलंत भावना घेऊन आपण सर्वच जण पुढे मार्गस्थ होत होतो. त्यातच २६ तारखेला पहाटे भारतीय हवाई दलाने धडक कारवाई करत अतिरेकी तळांना लक्ष केले. सकाळी ही बातमी विविध समाजमाध्यमांवर झळकली. प्रत्येक भारतीयाच्या मनातील आनंदाला पारावार उरला नाही. हा आनंद प्रत्येकजण समाजमाध्यमांवर व्यक्त करायला लागला. त्या दिवशी समाजमाध्यमांवर इतर कोणताही विषय चर्चेत नव्हता.

प्रत्येक जातीधर्माचे विविध राजकिय पक्षांचे आणि सर्वच विचारसरणीचे लोक सर्वप्रथम व्यक्त झाले ते आपल्या मनातील आनंद आणि अभिमान घेऊनच. त्यादिवशी समाजमाध्यमांचा एक वेगळाच चेहरा देशभरातून पहायला मिळाला. अगदी उघडपणे सत्ताधाऱ्यांना उठता-बसता जेरीस आणणारे विरोधी पक्षातील नेते आणि दिवसरात्र सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे पत्रकारदेखील या विषयाच्या खोलात शिरण्यापुर्वी त्याची कोणतीही राजकिय अथवा सुरक्षाविषयी मिमांसा करण्याच्या देखील आधी ताबडतोब  व्यक्त  झाले. अवघ्या देशातील समाजमाध्यमं आनंदून गेली होती. या सर्व प्रकाराची इतर कोणीतीही बाजू मेंदूने दाखवण्याआधीच मनातून आलेला आवाज प्रत्येकाच्या समाजमाध्यमावर उमटला आणि त्याचवेळी एक गोष्ट अधोरिखित करुन गेला की मेंदूपुर्वी मन व्यक्त करण्याचा जो आपला स्वभाव आहे, तोच या समाजमाध्यमांच्या यशाचं रहस्य आहे. अशा भावनिक क्षणी आपल्या एकसंध देशाचं मन या वॉल्सवरुन दिसलं.

आता या दरम्यान अनेक सुरस किस्सेदेखील अनुभवायला मिळाले. या चोख हल्ल्याच्या काही वेळ आधीच पाकिस्तानातील एका ट्विटर हॅंडलने (आपण पाकिस्तानी वायुसेना आहोत असा दावा करत) `तुम्ही निश्चिंत झोपा आम्ही जागे आहोत’ असं ट्विट केलं होतं. या हल्ल्यानंतर लाखो भारतीयांनी याची खिल्ली उडवली आणि पाकिस्तानी नेटिझन्सनी कपाळाला हात मारुन घेतला. एका भारतीय ट्विटर हॅंडलने पाकिस्तानी पंतप्रधानांच्या एका ट्विटवर हल्ला झाला त्याच दिवशी संध्याकाळी आज रात्री तुमच्या वर हल्ला होणार आहे ; असा उपरोधिक रिप्लाय केला होता. हल्ल्यानंतर मात्र या माणसाला हल्ल्याची माहिती आधीच कशी मिळाली असे प्रश्न विचारले गेले. खरंतर असे अनेक ट्विटर हॅंडल गंमत म्हणून असे रिप्लाय नेहमीच करत असतात. त्यांचा उद्देश फक्त मनात येणारी भावना त्याचवेळी व्यक्त करणं आणि त्यातून गम्मत करणं एवढंचं असतं. या व्टिटमुळे मात्र एका गमतीशीर रिप्लायचे एका मोठ्या सुरक्षाविषयक प्रश्नातरुपांतर झाले. जे लोक या ट्विटर हॅंडलला पुर्वीपासून फॉलो करतायत त्यांना यामागची गंमत नविन नव्हती पण अशा तणावपूर्ण काळात मात्र त्या ट्विटची गंभीर दखल अनेकांनी घेतली. अशा गमतीशीर घटनांचा कळस तेव्हा झाला जेव्हा एका वृत्तसंस्थेचा पॅरिडी अकौंटने एक व्टिट केलं ज्यात म्हटलं होतं की पाकिस्तानने डागलेले मिसाईल्स त्यांच्याच एका शहरावर आदळले. हे ट्विट एका अतिशय नामांकित अशा आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्थेने घाईघाईत रिव्टिट केलं आणि एकच खळबळ उडाली. ज्याने हे रिट्विट केलं त्या कर्मचाऱ्याला या घाईचा आयुष्यभर पश्चाताप होत राहिल. पण एका गमतीशीर ट्विट ला गंभीर राजकीय मुद्दा बनवणारे आणि एका जबाबदार वृत्तसंस्थेने गम्मत म्हणून केलेले ट्विट खरी बातमी मानून लगेच पुढे सरकावणारे असे सारेच जण ह्या अत्यंत नाजूक समयी देखील नकळतच समाज माध्यमांवर विविध रंग उधळत होते.

आजकाल कोणतीही घटना घडली की त्या घटनांचे सोशल मिडीयावर उमटणारे पडसाद हे जास्त महत्वाचे ठरतात. भारतावरील अतिरेकी हल्ला आणि यासंदर्भात घडलेली प्रत्येक गोष्ट ही या देशातील एक अत्यंत महत्वाची घटना होती. या घटनेवर देश कसा व्यक्त होतो हे पाहणे औत्सुक्याचे होतेच. जगाचं लक्ष लागून राहिलेल्या या सर्व घटना घडत असतानाच सोशल मिडीयावर एकसंध होऊन आपल्या सैनिकांच्या पाठिशी उभा असलेला आपला हा देश डोळ्यात भरुन राहिला. या निवडणुकीच्या काळात एरव्ही दररोज नकारात्मकता आणि अविश्वास या दोनच भावना आपल्यासमोर नाचत असताना आपल्या देशाचं हे समंजस आणि कणखर रुप पाहण्यात एक वेगळीच मजा येत होती. वर्षभर चालणाऱ्या निवडणुका आणि त्याच्या अवतीभवती घडणाऱ्या कडू-गोड आणि बहुतांशी तिखट घटना, आणि त्यांवर व्यक्त होणारे आपण सगळे या एका क्षणी खऱ्या अर्थाने भाव खाऊन गेलो. येणाऱ्या निवडणूक काळात या समाजमाध्यमांची नकारात्मक बाजूच कदाचित प्रकर्षाने आपल्या समोर येणार असली तरी या एका घटनेचा दाखला देत आपणच आपल्याला एका मजबूत आणि एकसंध राष्ट्राचं सर्टिफिकेट द्यायला हरकत नाही. आपल्या भावना व्यक्त करण्याच्या नादात,या एका यशस्वी आणि धडक कारवाईनंतर घरोघरी बसलेल्या अनेक पडदाविरांनी तर आपल्यावतीने युद्ध जाहिरदेखील करुन टाकले. त्याचवेळी पाकिस्तानात बसलेल्या तिकडच्या विरांनी देखील बदल्याची भाषा सुरु करत आपल्या स्क्रिनवर युद्धाचा एल्गार केलाच पण या सर्वामध्ये
पाकिस्तानातील काही लोकांनी अभिनंदनला सोडा अशीमागणी करणारे फलकदेखील झळकवले. आज आपण कोणत्याही राजकिय पक्षाचे आयटी सेल नाही तर या देशाचे आयटीसेल म्हणून मत मांडूया अशा स्वरुपाची भुमिका घेणारे राजकिय ट्विटर हॅंडलदेखील पाहिले. यातून एक गोष्ट प्रकर्षाने जाणवली ती म्हणजे सोशल मिडीयामुळे देशाच्या, पक्षांच्या राज्यांच्या सर्व सीमा बाजूला सारत माणूस म्हणून व्यक्त होण्याचे हे नवे स्वातंत्र्य आपल्या हाती आले आहे आणि त्यातून एक मोठं आणि आश्वासक चित्र निर्माण होतय.

असं म्हणतात सणवारी वाईटसाईट बोलू नये म्हणूनच आजचा हा लेख केवळ याकाळात दिसून आलेल्या प्रेमाचा, देशभक्तीचा आणि माणुसकीचा चेहरा जगाला दाखवणाऱ्या या सोशल मिडीयाचं मनापासून कौतूक करणारा. विंग कमांडर अभिनंदनसारखी मिशी ठेवणाऱ्या तरुणाचे फोटो व्हायरल होतायत. गावोगावी ढोलताशाच्या गजरावर नाचत आपल्या या वीरपुत्राचं कौतूक करणाऱ्या भारतीयांचे व्हीडीओ व्हायरल होतायत. एवढचं नाही तर पाकिस्तानातसुद्धा या घटनेवर आनंद व्यक्त करणारे संदेश व्हायरल होतायत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन माणूस म्हणून जगणाऱ्या आपल्यातील प्रत्येकाला अभिमान वाटावा असं हे चित्र आहे. या सगळ्या दरम्यान एका मित्रानं टिपण्णी केली होती, "पुर्वीपेक्षा आजकाल हे विषय लवकर लोकांपर्यंत पोचतायत आणि एक मोठी सकारात्मक ताकद पटकन समाजातून उभी राहते हे खरचं कौतूकास्पद आहे." समाजमाध्यम हा समाजाचा आरसा असतो आणि त्यात प्रतिबिंबीत होणारा आपला समाज आजही आपली सकारात्म बाजू टिकवून आहे. ती बाजू अनेक पटीने या माध्यमावर प्रतिध्वनीत होते हे आपल्या दृष्टीने अतिशय महत्वाचे आहे. चहाचा कप हातात घेऊन शत्रुला निडर मनाने आणि डोळ्यात डोळे घालून उत्तर देणाऱ्या आमच्या अभिनंदनचा व्हीडीओ आज घराघरात बघितला जातोय. देशप्रेमाची आणि शौर्याची भावना आमच्या आणि येणाऱ्या पिढीच्या मनात आणखी मजबूत करणारा हा व्हीडीओ माझ्यापर्यंत देखील आधी ट्विटर आणि मग व्हाटसऍप वरुन आला.
मी सुद्धा मग भारावून जात, मनापासून आणि प्रत्येक बोटात प्राण आणून माझ्या स्क्रीनवर जोरदार घोषणा दिलीच...
हाऊ इज द जोश? ... हाय सर.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com