उद्धव ठाकरेजी, शेतकऱ्यांचा पुळका आताच कसा आला?

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

उद्धव ठाकरेजी गेली पाच वर्षे झाली राज्यातील शेतकरी दारिद्र्यात खितपत पडले आहेत. शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न उग्र रूप धारण करत आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेले नाहीत, उलट त्यामध्ये वाढ होत गेली आहे. गेल्या चार वर्षातच बारा हजार शेतकऱ्यांनी शेतीच्या नापिकीला कंटाळून आत्महत्या केल्या आहेत. शेतकऱ्यांच्या कोणत्याही शेतीमालाला भाव मिळालेला नाही. 17 जून 2017 रोजी राज्य शासनाने कर्जमाफी केली मात्र अद्यापही राज्यातील सुमारे तीस लाख पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळालेली नाही. 34 हजार कोटी माफी केली असताना केवळ 19 हजार कोटींची कर्जमाफी झालेले आहे , यावर आपण कधीच कडक शब्दात बोललेले ऐकीवात नाही.  

विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आत्ताच तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कसे काय बोलू लागला आहात. शेतकऱ्यांना पिक विमा मिळालेला नाही, मुंबईत कार्यालय असणाऱ्या कार्पोरेट कंपन्यानी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात पिकविम्यात लूट केलेली आहे हे गेली तीन वर्ष चालू असताना अचानक आताच तुम्हाला साक्षात्कार कसा काय झाला. तिकडे राज्यातील शेतकरी दुष्काळाने ग्रस्त आहे, त्याला खायला अन्न नाही, प्यायला पाणी नाही, जनावरांना चारा नाही, टँकर माफीयाने उच्छाद मांडला आहे, चारा छावण्यात घोटाळे होत आहेत. या प्रश्नाकडे तुम्ही करड्या नजरेने कधीच बघितले नाही याचे मला आश्चर्य वाटते.

विधानसभेच्या निवडणुकीची चाहूल लागली सत्तेच्या लोण्याचा गोळा मटकविण्यासाठी जास्त जागांची गरज वाटू लागली तशी अचानक तुम्हाला शेतकऱ्यांची आठवण झाली ही तुमची सवय तशी जुनीच आहे. लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर तुम्ही गर्जना केली “पहिले मंदिर फिर सरकार “ आणि जागावाटप पूर्ण होताच तुमची भूमिका बदलली “पहले सरकार फिर मंदिर” आता निवडणुका आल्या की पुन्हा तुम्ही एकमेकासोबत भांडत बसणार आहे. वारकरी पंढरीच्या वारीला जात असतो. चंद्रभागेच्या वाळूत जेवणाचं गाठोडे सोडून सगळे वारकरी जेवायला बसलेले असतात. इतक्यात कुत्र्यांचा कळप त्वेषाने भांडत भांडत तिथे येतो. भोळेभाबडे वारकरी भांडण सोडवायला म्हणून कुत्र्यांच्या दिशेला जातात. अचानक भांडणारी कुत्री एक होतात आणि जेवणाच गाठोड घेऊन पळून जातात. वारकरी आपल्याच कर्माला दोष देत उपाशी राहतात तशी अवस्था शेतकऱ्यांची झाली आहे.  

दोघात भांडायचं व निवडणुका जिंकायच्या आणि पुन्हा सत्तेचे गाठोडे घेऊन पळून जायचं हा डाव आता शेतकऱ्यांच्या लक्षात आला आहे. एकीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही. विजेचा प्रश्न आ वासून उभा आहे. दुष्काळाने शेतकरी होरपळत चालला आहे. सिंचन योजना जशाच्या तशा आहेत, राज्यामध्ये भ्रष्टाचार बोकाळला आहे. शेतकऱ्यांची दिवसाढवळ्या लूट सुरू आहे, या प्रश्नावर आपण कधीच बोलला नाहीत. नेमके निवडणुका डोळ्यासमोर ठेवूनच या शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आपणाला कंठ फुटलेला आहे. पाच वर्षात शेतकऱ्याचे किती प्रश्न सोडवलात, किती शेतकऱ्यांना न्याय दिलात या प्रश्नांच उत्तर तुम्हाला द्यावच लागेल. कृषी क्षेत्राचा आर्थिक प्रगतीचा वेग वजा आठ टक्यांपर्यंत खाली घसरला आहे. म्हणूनच शेती क्षेत्राची ही दुरावस्था झालेली आहे. अर्थात याला जबाबदार ना महाराष्ट्रातील जनता आहे ना महाराष्ट्रातील शेतकरी सरकारच फसलेलं धोरण हेच एकमेव कारण आहे. त्यामुळे तुम्हाला जबाबदारी टाळता येणार नाही. तुम्हीही या सरकारचे भागीदार आहात हे उभ्या महाराष्ट्रातील शेतकरी जाणतो आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com