म्हातारपणाची काठी : राष्ट्रीय निवृत्ती योजना

National-Pension-System.jpg
National-Pension-System.jpg
नाशिक : भारत सरकारने पुढाकार घेऊन सरकारी व खासगी दोन्ही प्रकारच्या नोकरदारांच्या निवृत्तिवेतनाच्या गरजेच्या पूर्ततेसाठी ही योजना आणली आहे. यामध्ये टीअर 1 आणि टीअर 2 असे दोन प्रकार आहेत. त्यांपैकी टीअर 1 विषयी आपण थोडक्‍यात जाणून घेऊ या. टीअर 1 नॅशनल पेन्शन स्कीम अकाउंट हे अगदी बेसिक लेव्हलचे पेन्शन अकाउंट असून, भारत सरकारतर्फे सादर केले गेले आहे. टीअर 1 एनपीएस अकाउंटची वैशिष्ट्ये : हे एक पेन्शन अकाउंट आहे. या अकाउंटमधून मुदतपूर्व पैसे काढून घेण्याची परवानगी आहे मात्र त्यासाठी लाभधारकाने किमान 15 वर्षे सलग यात पैसे भरलेले हवेत. तसेच काढून घेतलेले पैसे परत जसेच्या तसे अकाउंटमध्ये भरण्याची आवश्‍यकता असते. अगदी अकस्मात अडचणीच्या प्रसंगातच जसे की वैद्यकीय खर्च, मुलांच्या उच्चशिक्षणासाठी, मुलांच्या लग्नासाठी किंवा घराच्या खरेदी-बांधणीसाठीच्या परिस्थितीत अशा प्रकारे पैसे काढण्याची मुभा मिळते; परंतु ग्राहकांद्वारे काढली जाणारी रक्कम ही एकूण भरलेल्या रकमेच्या 25 टक्‍क्‍यांपेक्षा जास्त नसावी. जर लाभधारकाने या सेवेची 25 वर्षे पूर्ण केली असतील तर 50 टक्‍क्‍यांपर्यंत रक्कम काढण्याची सवलत आहे. या अकाउंटच्या पूर्ण कार्यकाळात एकूण तीन वेळाच रक्कम काढण्याची सवलत आहे. हे अकाउंट ग्राहकाच्या वयाच्या साठाव्या वर्षी मॅच्युअर होते व त्या वेळी जमाराशीच्या 60 टक्‍क्‍यांपर्यंत करमुक्त रक्कम काढता येते. उरलेल्या 40 टक्‍क्‍यांमधून नियमित पेन्शन मिळायला सुरवात होते. हे नियमित मिळणारे पेन्शन करपात्र आहे. यावर टॅक्‍स भरायला लागतो. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी असलेले एनपीएस अकाउंट मुख्यत्वेकरून सरकारी आणि खासगी बॉंड्‌समध्ये गुंतवणूक करण्यासाठी आहे. खासगी-गैरसरकारी लाभधारकांकरिता मिश्र गुंतवणूक पर्याय उपलब्ध आहेत, जसे की शेअर्स, एफडी, सरकारी-खासगी बॉंड्‌स व इतर काही पर्याय. सरकारी कर्मचाऱ्यांना आपल्या बेसिक पगार आणि महागाई भत्याच्या 14 टक्‍क्‍यांची रक्कम दर वर्षी या अकाउंटमध्ये जमा करावी लागते. सरकारतर्फे तेवढीच रक्कम कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये जमा केली जाते. खासगी लाभार्थ्यांना दर वर्षी किमान 250 रुपये एकरकमी किंवा वार्षिक एक हजार अशा रीतीने गुंतवता येतात. लाभार्थ्यांना आपले घर बांधायचे किंवा विकत घ्यायचे असल्यास एनपीएस अकाउंटमधून पैसे काढता येऊ शकतात. या खात्याला देशभरातून कोणत्याही भागातून व कोणत्याही एम्प्लॉयरच्या नोकरीत असताना हाताळले जाऊ शकते. एकच अकाउंट कायमस्वरूपी असते. त्यासाठी बारा अंकी क्रमांक असलेले पर्मनंट रिटायरमेंट अकाउंट नंबर (PRAN) कार्ड मिळते. एका व्यक्तीच्या नावाने एकच अकाउंट उघडले जाऊ शकते. टीअर 1 एनपीएस अकाउंटसाठी पात्रता : भारताचे नागरिक असलेल्या रहिवासी किंवा बिगररहिवासी व्यक्तींना एनपीएस खाते उघडता येते. या खात्यासाठी अर्ज करतेवेळी इच्छुकांची वयाची मर्यादा 18 ते 60 वर्षे यादरम्यान असणे आवश्‍यक आहे. आवश्‍यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे : खाते उघडण्याच्या नीट भरलेल्या अर्जासोबत अर्जदात्याचे ओळखपत्र, रहिवासाचा दाखला आणि जन्मतारखेचे प्रमाणपत्र लागते. खाते उघडण्यासाठी दोन पर्याय आहेत. एक म्हणजे जवळच्या एनपीएस सहाय्यता केंद्रात जाऊन प्रत्यक्ष अर्ज भरून खाते उघडू शकता. हे सहाय्यता केंद्र आपल्या नेहमीच्या बॅंकांमध्ये उपलब्ध आहेत. दुसरा मार्ग म्हणजे ऑनलाइनद्वारे enps.nsdl.com किंवा enps.karvy.com या दोन वेबसाइट्‌सवर जाऊन सर्व माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून खाते उघडू शकता. करांबाबत मिळणारा फायदा : कर्मचाऱ्यांद्वारे भरल्या जाणाऱ्या रकमेवर 80 सीसीडीच्या अंतर्गत करांमधून सूट मिळते. ही रक्कम बेसिक पगाराच्या दहा टक्के (+डीए) इतकी असावी. कर्मचाऱ्यांना एम्प्लॉयरकडून भरल्या जाणाऱ्या रकमेवरही सूट मिळते. ही रक्कमसुद्धा बेसिक पगाराच्या दहा टक्के (+डीए) इतकी असावी. या दोन्ही रकमांना एक-एक लाख रुपयांच्या एकूण मर्यादेपर्यंत सूट आहे. खाते बंद करण्याची प्रक्रिया : वर म्हटल्याप्रमाणे एनपीएस अकाउंट ग्राहकाच्या वयाच्या साठाव्या वर्षी मॅच्युअर होते त्यामुळे त्याआधी ते बंद करता येत नाही; परंतु काही विशिष्ट परिस्थितींमध्ये खाते बंद करण्याची विनंती मान्य केली जाऊ शकते. नॅशनल पेन्शन स्कीम हा सर्वसामान्य खासगी व सरकारी दोन्ही प्रकारच्या कर्मचाऱ्यांसाठी निवृत्तिवेतनासाठीचा एक चांगला पर्याय आहे. यामध्ये असलेले वैशिष्ट्य असे, की आपल्या पैशांची गुंतवणूक कोणत्या प्रकारे व कुठे करावी याचे नियंत्रण स्वतः खातेदारांच्या हातात असते. त्यामुळे कोणत्या ठिकाणी व कोणत्या मार्गाने चांगला परतावा मिळू शकतो याचा व्यवस्थित अभ्यास करून, व्यावसायिक मार्गदर्शन घेऊन स्वतः खातेदार आपले निर्णय घेऊ शकतात. उत्तम गुंतवणूक करताना विविध प्रकारच्या ऍसेट क्‍लासमध्ये पैसे गुंतविणे आवश्‍यक असते. एनपीएसच्या माध्यमातून इक्विटी म्हणजे शेअर बाजार, गव्हर्न्मेंट सिक्‍युरिटीज म्हणजेच जी सेक म्हणजे सरकारी कर्जरोखे व खासगी कारखाने खासगी कर्जरोखे म्हणजेच कॉर्पोरेट बॉंड या तिन्ही क्षेत्रांमध्ये पैसे गुंतविण्याची सुविधा असणारे हे एकच अकाउंट आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com