"कला" एक प्रवास.. 

art.jpg
art.jpg

सदर : निर्मितीचा सोहळा 

या वेळेला आपण कलेच्या विविध प्रकारांवर प्रकाशझोत टाकणार आहोत. "कलेचे नानाविध प्रकार, कल्पनाशक्ती देई त्या आकार, कलाकृतीतून होई ते साकार..!', असे आपण म्हणत असतो, ऐकत असतो. मानवी समाज व संस्कृतीतील सर्जनशीलतेची वैचारिक व भौतिक अभिव्यक्ती थोडक्‍यात सांगायचे झाले, तर "कुठलीही कौशल्यपूर्ण क्रिया वा कृती म्हणजे कला!' ही कलेची ढोबळ व्याख्या म्हणता येईल. विविध कलाप्रकारांमुळे कलेचे हे क्षेत्र दिवसेंदिवस व्यापक होताना दिसत आहे. 

कलेच्या महत्त्वाच्या कलाप्रकारात सर्वप्रथम येते ती दृष्यकला. पूर्वी दृष्यकला चित्र व शिल्पकलेपुरती सीमित होती. पण आज मात्र त्याची व्याप्ती वाढल्याने उपयोजित कलांचाही (Applied Art) त्यात अंतर्भाव होऊ लागला आहे. वास्तुकला, कुंभारकाम, चित्रकला, चित्रपट, रंगकला, छायाचित्रण, शिल्पकला हे दृष्यकलेचे उपप्रकार. साहित्यात काव्य, कथा, कादंबरी, नाटक, काल्पनिक व ललित लिखाण येते, तर प्रायोगिक कला नृत्य, नाट्य, संगीताच्या अनुषंगाने व्यक्त होतात. छायांकन (फोटोग्राफी) अथवा चलचित्रणसारख्या (मुव्ही) काही कलात आपल्याला दृश्‍य व प्रायोगिक कलांचा संगम झालेला दिसतो. तर चित्रकथांमध्ये (comics) चित्र व लिखाणाचा संबंध येतो. दृश्‍यकला, प्रायोगिक कला व साहित्य हा ललित कलांचा व्यापक प्रांत असून, या कलांचे एकमेकांवर सतत परिणाम होत असतात. आदिमकालीन गुंफा, लेणी, भित्तिचित्रांपासून आधुनिक काळातील चित्रपटांपर्यंत कथाकथन, तसेच मानव जातीचे पर्यावरणाशी असलेले नातेसंबंध अधोरेखित करण्यासाठी कलेचा अत्यंत खुबीने वापर करण्यात आला. 

चित्रकला- सर्वांत प्राचीन व कलेचा मूलभूत प्रकार म्हणून चित्रकलेकडे पाहाता येईल. वैविध्यपूर्ण साधने व कौशल्य यांचा वापर करून रेखाटलेला आकार चित्र वा प्रतिमा म्हणजे चित्रकला. 
चित्रकला हा द्विमितीय फलकावरील दृश्‍यकलाप्रकार आहे. रेघ हा त्याचा महत्त्वाचा घटक असून, वस्तू वा विषयावर अवलंबून नसलेल्या आकाराचा स्वायत्त घटक म्हणूनही त्याकडे बघितले जाते. सर्व बारकाव्यांनी युक्त संचित रचना म्हणजे चित्रकला. चित्रकलेच्या माध्यमातून कलात्मक हेतू अभिव्यक्त करायला भरपूर वाव आहे. मुख्य भाग, अवकाश, मोकळी जागा, खोली भव्यता एवढेच नाही, तर गतीही आपण चित्राच्या माध्यमातून दाखवू शकतो. रेषेच्या ओघातून कलाकाराचे व्यक्तिमत्त्वही चित्रात साकारते. 
विविध प्रकारच्या उभ्या, आडव्या, तिरप्या, क्रॉस रेघा, बिंदू, तसेच त्यांची सरमिसळ करून चित्र काढले जाते. रेषेच्या विविध प्रकारच्या क्रीडांमुळे आकार तयार होतो. लाइन ड्रॉइंग, हॅचिंग, क्रॅस हॅचिंग, रॅन्डम हॅचिंग, स्क्रिबलिंग स्टिपलिंग, ब्लेन्डिंग ही याची काही टेकनिक्‍स आहेत. सर्वसाधारणपणे पृष्ठभागावर वेगवेगळ्या साधनांच्या सहाय्याने भार देऊन अथवा साधने फिरवून चित्र रेखाटले जाते. शिसपेन्सिल, शाईचे पेन, ब्रशेस, रंगीत खडू, तैलखडू वा पेन्सिल, मार्करस, कोळसाकांडी अशी अनेक साधने चित्रकलेसाठी वापरली जातात. हल्ली तर संगणकासारख्या डिजिटल माध्यमानेही चित्राला हवा तो परिणाम देता येतो. चित्रकलेचा उपयोग आकृत्यांच्या माध्यमातून स्पष्टीकरणासाठी (इलस्ट्रेशन्स), चित्रकथा (comics), तसेच ऍनिमेशनसाठीही केला जाऊ शकतो. चित्र म्हणजे शब्दांविना कविता असल्याने त्याचा आशय समजून घेण्यासाठी मनही कलासक्तच असायला हवे.  

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com