बदलत असलेली दोन गावं...

 सेंद्रिय भाजीपाला
सेंद्रिय भाजीपाला

     सध्या काहीअंशी आर्थिक हमी देणाऱ्या ऊस पिकाचा हिशेब मांडला तर आपण ऊस का पिकवतो, हा प्रश्‍न शेतकऱ्यांना पडल्यावाचून राहणार नाही. आज थोड्याफार फरकाने प्रत्येक पिकाचे गणित बिघडलेल्या स्वरूपात असलेले पाहायला मिळते. ही घडी बसविण्यासाठी शेतकरी, शेतकरी समूह, संस्था धडपडत आहेत. याच पार्श्‍वभूमीवर गडहिंग्लज तालुक्‍यातील ऐनापूर, कौलगे या गावांनी सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी मोहीम हाती घेतली आहे. या कार्यात त्यांना अभिनव ग्रामीण विकास संशोधन व सामाजिक संस्था मार्गदर्शन आणि मदत करतेय. बदल स्वीकारत असलेल्या या दोन गावांविषयी...

या दोन्ही गावांत विद्यमान सरपंचांनी शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. त्यातून शेतकऱ्यांच्या मानसिकतेत परिवर्तन होत आहे. ऐनापूरमध्ये ९०० हेक्‍टर क्षेत्र पिकाखाली आहे. हे सर्व क्षेत्र उसाने व्यापले आहे. यातून साधारण १०० हेक्‍टर क्षेत्रावर सेंद्रिय पद्धतीने भाजी घ्यायचा मानस अभिनव संस्थेसह ग्रामपंचायतीचा आहे. शेतकऱ्यांना लागणारी रोपे, खते, औषधं, विविध द्रावणं या गावातच तयार केली जाताहेत. यासाठी अभिनव संस्थेने शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले आहे. उत्पादन खर्च कमी करणे हा यामागचा हेतू आहे. सध्या गावात तीन शेतकरी गट तयार झाले असून, सात शेतकऱ्यांनी सेंद्रिय भाजीपाला घ्यायला सुरुवात केली आहे. विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी वांग्याच्या रोपांची मिरवणूक काढून लावणही करण्यात आली. यासाठी ग्रामपंचायतीने घेतलेला पुढाकार अनुकरणीय आहे. येथील सरपंचांनी तर, १५ व्या वित्त आयोगातील काही रक्कम सेंद्रिय शेती प्रसार, प्रचारासाठी राखीव ठेवली आहे. हा दृष्टिकोन निश्‍चितच सकारात्मक म्हणावा लागेल. कौलगे गावातही सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी तरुण पुढे आले आहेत. सेंद्रिय भाजीपाला उत्पादनासाठी महिलाही पुढाकार घेत असून, तशा गटाची निर्मिती केली जात आहे.

 सेंद्रिय शेतीचा प्रसार आणि त्यातून शेतकऱ्यांची उन्नती हे अभिनव ग्रामीण संस्थेचे उद्दिष्ट आहे. यातूनच आजरा, गडहिंग्लज, चंदगड तालुक्‍यात संस्था काम करतेय.गडहिंग्लजमध्ये लागणारा ८५ टक्के भाजीपाला बाहेरून येतो. आसपासच्या खेड्यांतून ३०० हेक्‍टर क्षेत्रावर सेंद्रिय भाजीपाल्याचे उत्पादन घेतल्यास शहराला चांगला माल उपलब्ध होईल, असे चित्र आहे. त्यासाठी संस्था धडपडत आहे. उत्पादित माल हा माफक दरात; पण ग्राहकांकडून मिळणाऱ्या मालाच्या ७० टक्के रक्कम शेतकऱ्यांना मिळावी, असे बाजारपेठीय गणित अभिनव संस्थेने मांडले आहे. विक्रीची साखळी मर्यादित केल्यामुळे माफक दरात सेंद्रिय उत्पादने विकता येतात, असेही संस्थेचे म्हणणे आहे. यासाठी संस्थेने गडहिंग्लजमध्ये विक्री केंद्र उभारले आहे. नवे बदल स्वीकारत शेती फायद्यात आणणे ही सध्याची गरज बनली आहे. यासाठी अशा प्रयोगांची संख्या वाढणे आवश्‍यक आहे. त्यासाठी समाजाकडून प्रोत्साहन मिळायला हवे, हेच खरे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com