कलेची व्याप्ती..

art.jpg
art.jpg

सदर : निर्मितीचा सोहळा 

आर्किटेक्‍चर : वास्तुकला 
अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजांपैकी निवारा निर्माण करण्याची कला व शास्त्र म्हणजे वास्तुकला. थोडक्‍यात वास्तू वा इमारत बांधण्याची ही कला व शास्त्र. 
वास्तूची जडणघडण, शैली वा स्वरूप, तसेच त्याचा दर्जा सांगण्यासाठीही हा शब्दप्रयोग वापरला जातो. काळाच्या ओघात वास्तुकलेनेच चित्रकला, शिल्पकला, लॅंडस्केप आर्किटेक्‍चर या दृश्‍यकलांना जन्म दिला, असेही म्हणता येईल. वास्तुकलेच्या ढोबळ व्याख्येत नगररचना, शहर आराखडा, लॅंडस्केप आर्किटेक्‍चरप्रमाणे अगदी फर्निचर तयार करण्याचाही अंतर्भाव होऊ शकतो. सर्वसामान्यपणे वास्तूच्या आराखडण्याने बांधकाम व्यावसायिकांसाठी सुसाध्यता व किंमत तसेच वापरकर्त्यांसाठी सोयी, सुविधा व सौंदर्य यांचा मेळ घातला पाहिजे. 
आजच्या आधुनिक भाषेत ही अशी कला व ज्ञानशाखा आहे, जिच्या माध्यमातून आपण गुंतागुंतीच्या वस्तू वा यंत्रणा सूचित करणारा तसेच स्पष्टपणे दाखविणारा आराखडा तयार करू शकतो. नियोजित वास्तुशास्त्रात अवकाश, आकारमान, पोत, प्रकाश-सावली याबरोबर अमूर्त घटकांत फेरफार करून आकार व सौंदर्याचा मेळ घातला जाऊ शकतो. म्हणूनच उपयोगांवर व सुसाध्यतेवर भर देणारे अप्लाइड सायन्स व इंजिनिअरिंग विषयांपासून ते वेगळे वाटते. 

वास्तुविशारदाची भूमिका काळानुरूप बदलत असली तरी यशस्वी आराखडा तसेच निसर्गरम्य परिसर देण्यास त्यांचे कायमच प्राधान्य राहिले. नवीन बांधकाम साहित्य, तंत्र व वास्तुप्रकार या तीन मूलभूत गोष्टी आधुनिक वास्तुशैलीच्या निर्मितीत निर्णायक ठरल्या. वास्तूच्या बांधकामात वेग, यांत्रिक कुशलता, कार्यानुरूपात आली. निसर्गाशी नाते सांगणारी व अवकाशात आकारसौंदर्य निर्माण करणारी अभिनव वास्तुशैली उदयास आली. 

फोटोग्राफी - छायाचित्रण 
फोटो म्हणजे प्रकाश आणि ग्राफी म्हणजे आकृत्या काढणे म्हणूनच फोटोग्राफी म्हणजे प्रकाशाच्या सहाय्याने आकृती काढणे, थोडक्‍यात प्रकाशचित्रे. दृश्‍यप्रकाशाच्या मदतीने प्रकाशसंवेदनशील रासायनिक द्रव्यांच्या थरावर दृश्‍य चित्र निर्माण करणे म्हणजे फोटोग्राफी. अर्थात छायाचित्रण. छायाचित्रणात भौतिक व रसायनशास्त्राचा मिलाफ पाहायला मिळतो. छायाचित्रकाराच्या सर्जनशील दूरदृष्टीने काढलेली छायाचित्रे म्हणजेच फोटोग्राफी. ही कला, ज्याचे छायाचित्रण करायचे ती वस्तू, व्यक्ती, घटना वा दृश्‍य त्याचप्रमाणे छायाचित्रकारांचा त्यांकडे पाहण्याचा दृष्टिकोन, त्यासाठी लागणारा वेळ या सर्व बाबींवर अवलंबून असते. हवा तो परिणाम साधण्यासाठी छायाचित्रकाराचे कौशल्य व त्याचा कॅमेराही महत्त्वाचा असतो. फोटोग्राफी ही एक अशी कला आहे जी प्रत्येक गोष्टीकडे बघण्याची वेगळी नजर आपल्याला देते. फोटो काढताना भावनिक बंध निर्माण होत असल्याने आपण त्या गोष्टींच्या आणखी जवळ जातो. एरिअल फोटोग्राफी, आर्किटेक्‍चरल फोटोग्राफी, ऍस्ट्रोफोटोग्राफी, सॅटेलाइट फोटोग्राफी, पॅनोरानिक फोटोग्राफी, शास्त्रीय फोटोग्राफी, स्पोर्टस फोटोग्राफी, ट्रॅव्हल फोटोग्राफी, अंडरवॉटर फोटोग्राफी, अल्ट्राव्हायोलेट फोटोग्राफी, इव्हेंट वा वेडिंग फोटोग्राफी, लॅंडस्केप फोटोग्राफी, पोर्टेट फोटोग्राफी, फॉरेन्सिक फोटोग्राफी, कमर्शिअल वा प्रॉडक्‍ट फोटोग्राफी, फोटोजर्नालिझम फोटोग्राफी, आर्ट फोटोग्राफी इत्यादी छायाचित्रणाचे विविध प्रकार आहेत. योग्य कॉंपोझिशन, योग्य प्रकाशरचना तसेच उत्तम रंगसंगती छायाचित्रणात महत्त्वाची असते. कला, मनोरंजन, उद्योगव्यवसाय, उत्पादन व त्यांच्या जाहिराती, बहुसंवाद या व अशा अनेक क्षेत्रांत छायाचित्रणाचा वापर होताना दिसतो. ही सर्व कलेची व्याप्ती पाहता पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मतानुसार "कला हा कलाकाराच्या मनाचा खराखुरा आरसा असतो.' यात दुमत होणार नाही. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com