रान उठूदे आता...

asha mirge
asha mirge

अमरावती जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात एकीला पेटवले, एकीला अ‍ॅसिड टाकून, एकीवर उकळते तेल टाकून, एकीला चाकूने 16 वार करुन मारण्यात आले. या घटनांनी पिळवटलेल्या हृदयाच्या वेदना कमी होत असतानाच हिंगणघाटची घटना घडली. हिंगणघाटच्या बाजूच्या जिल्ह्यात सेवाग्राम, गाडगेबाबा, तुकडोजी महाराज; त्यापुढचा जिल्हा राजमाता जिजाऊंचा. अशा हिंगणघाटमध्ये ही घृणास्पद घटना घडत असेल तर आपण या आदर्शांकडून काय शिकलो, असा प्रश्न पडतो.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेमध्ये ‘आम्ही सर्व समान आहोत’ असे नमूद केले आहे. समता हे राज्यघटनेचे प्रधान तत्त्व आहे. असे असताना महिलांनी-तरुणींनी कोणते कपडे घालावेत, तिने कोणाशी बोलावे, किती वाजता घरी यावे याबद्दलचा पुरुषी मनुवाद अद्यापही सुरुच आहे. त्यापलीकडे जाऊन आता महिलांच्या आयुष्यात कोण असावा, तिने कोणावर प्रेम करावे हेदेखील एक पुरुष ठरवणार? मग भारतीय संविधानाचे काय? महिलांना दिलेल्या समान हक्कांचे काय? महिलांना त्यांच्या आई-वडिलांनी दिलेल्या स्वातंत्र्याचे काय? हे स्वातंत्र्य हिसकावून घेण्याचा हा प्रयत्न नाही का? मुलींनो, जर तुम्ही बाहेर जात असाल, लोकांना आवडत असाल तर तुमच्या आयुष्यात कोण असावं हे लोक ठरवतील आणि ते मान्य नसेल तर तुम्हाला जाळून टाकतील, मारुन टाकतील, हा दहशतवादापेक्षा भयंकर प्रकार नाही का? एक प्रकारे हा मुलींच्या आई-वडिलांनाच इशारा नाही का? अशा अनेक प्रश्नांचे मोहोळ हिंगणघाटच्या घटनेनंतर निर्माण झाले आहे. याची उत्तरे ‘सुजाण’ आणि ‘पुरोगामी’ म्हणवून घेणाऱ्या समाजाला शोधावीच लागतील. सर्वांत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे असे निर्घृण कृत्य करण्याची एखाद्या व्यक्तीची हिंमतच कशी होते? यामागच्या कारणांवर आणि ती होऊ नये यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे.
त्यादृष्टीने विचार करताना अगदी सूक्ष्म पातळीवर बदल करावे लागतील. घरामध्ये जेव्हा एखादा मुलगा ‘आई मला पाणी आण’ असे सांगतो तेव्हा आईने ‘तुला देवाने दोन हात-दोन पाय दिले आहेत, गरज असेल तर तुझे तू जाऊन पाणी आण’ असे सांगितले तर भविष्यात अशा प्रकारचे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होणार नाही. मध्यंतरी, हैदराबाद एन्काउंटरनंतर एका ज्येष्ठ पत्रकारांनी फेसबुकवर एक मार्मिक टिप्पणी करणारे स्वगत लिहिले होते. त्याचा मतितार्थ असा की, घरातला बाप जर ‘तुझ्या आईला काय विचारता, तिला काय अक्कल आहे’ असे म्हणत असेल तर त्या घरातील मुलगे स्रीला मानसन्मान कसा देतील? घराघरांमध्ये जेव्हा महिलेकडून एखादे काम करून घ्यायचे असेल, शरीराची भूक भागवायची असेल, तिचे दागिने मोडून मला हप्ता भरायचा असेल, कर्ज फेडायचे असेल तेव्हा फक्त तिला मानसन्मान देण्याचे नाटक केले जात असेल तर पुढच्या पिढीमध्ये काय संदेश जात असेल? लग्नासाठी मुलगी ‘दाखवण्याचा’ कार्यक्रम करताना तिला एखाद्या शोभेच्या वस्तूसारखे ‘सादर’ केले जात असेल आणि उपस्थित मंडळी तिला हात दाखव, चालून दाखव असे सांगत असतील, तिला साडीच नेसली पाहिजे, डोक्यावरुन पदर घेतला पाहिजे, पतीच्या डोळ्यात डोळे घालून उत्तर द्यायचे नाही असे उपदेश देत असतील तर बायको ही उपभोगाची वस्तू आहे, आपले अधिराज्य गाजवण्याची हक्काची जागा आहे असा त्या मुलाचा समज झाल्यास गैर काय? शाळेत शिकवणारा शिक्षक जेव्हा चुकून पदर पडलेल्या मुलीकडे किंवा वाकलेल्या तरुणीच्या छातीकडे पाहून शब्द विसरतात तेव्हा त्यातून विद्यार्थ्यांना कोणता ‘धडा’ मिळत असेल? स्री म्हणजे सापडेल तेव्हा ओरबाडण्याची, कुस्करण्याची वस्तू आहे हा संदेश अशा प्रकारे घरापासून शाळेपर्यंत मिळत गेल्यामुळेच हिंगणघाटसारख्या घटना घडतात हे लक्षात घ्यायला हवे.
मग ही परिस्थिती बदलायची कशी? तर घरातील मुलगा जेव्हा उठून थेट ब्रश करायला जातो तेव्हा ‘तुझी गादी तू उचलून ठेव आणि मग ब्रश कर. कोणी बाई, कोणी आई, कोणी ताई ती गादी गुंडाळणार नाही’ असे आई-वडिलांनी निःक्षून सांगितलं पाहिजे. अशाच प्रकारे लग्नासाठी मुलगी पाहण्याची वेळ येते तेव्हा ‘मला जगातील सर्वोत्तम बायको हवी’ असे मुलगा सांगतो तेव्हा ‘तू आधी सर्वोत्तम नवरा बन’ ही शिकवण आपण त्याला दिली पाहिजे. ती दिली जात नाही तोपर्यंत तो मुलगा सर्वोत्तम नवरा बनण्याचा प्रयत्न करणार नाही.
मुलाने आपले एखाद्या मुलीवर माझे प्रेम आहे असे सांगितल्यानंतर ‘कुठली मुलगी आहे सांग, तिला उचलून आणतो’ असे एखादा लोकप्रतिनिधी किंवा गावगुंड, सरपंच, आमदार सांगत असेल तर समाजधुरिणांनी त्याचे थोबाड फोडले पाहिजे. कारण जे लोकप्रतिनिधी तरुणपिढीचे लांगुलचालन करण्यासाठी आणि त्यांच्यापुढे आपली फुशारकी मारण्यासाठी म्हणतात तेच अनेक घरातील दादा-बाबा-मामा-काका आपल्या लाडक्या मुलाला म्हणताना मी पाहिले आहे. हे अत्यंत चुकीचे आहे. उलट तुला कुठलीही मुलगी आवडो, तिचा अनुनय कर; तू तिला आवडायला लाग, तिला कशा प्रकारचा नवरा-प्रियकर-माणूस आवडतो त्या चौकटीमध्ये स्वतःला बसव, त्यासाठी प्रयत्न कर आणि मगच तिच्याशी प्रेमाची स्वप्ने बघ’ असे बापाने मुलाला सांगायला हवे. त्या मुलीला युपीएससी झालेला मुलगाच नवरा म्हणून हवा असेल तर कर प्रयत्न आणि हो आयएएस असे बापाने म्हटले पाहिजे. जोपर्यंत मुलाला मुलगी आवडली म्हणून तिला उचलून आणणारा बाप, उचलून आणणारे मित्र, उचलून आणणारे गावगुंड, लोकप्रतिनिधी समाजात आहेत तोपर्यंत असे विवेक नगराळे पैदा होतच राहतील. हिंगणघाटमधील या विवेकला जर घरातूनच मुलींकडे, महिलांकडे सन्मानाने पाहायचे ही शिकवण दिली गेली असती आणि आपल्याला कुणीही आवडले तरी त्या व्यक्तीला-तरुणीला आपण आवडलो नाही तर तो नकार पचवायचा, ही शिकवण दिली गेली असती तर आज त्या प्राध्यापक तरुणीच्या आयुष्याची राखरांगोळी झाली नसती ! पण या विवेकला माहीत होते, की ही तरुणी गरजू आहे, तिला नोकरीसाठी-शिक्षणासाठी रस्त्यावरुन पायी जावे लागणार आहे, शिक्षणासाठी गावात राहावे लागणार आहे; तिच्या या मजबुरीचाच या नराधमाने गैरफायदा घेतला.या घटनेनंतर अनेकांनी या दोघांचे अफेअर होते, तो तिचा बॉयफ्रेंड आहे अशी कुजबुज सुरू केली. पण प्रेम प्रकरणातील तरुण प्रेयसीला भेटायला जाताना पेट्रोल घेऊन जाईल का? तिला पेटवेल का? नाही. याचाच अर्थ त्या तरुणीने आपला नकार आपल्या देहबोलीतून, कृतीतून अथवा अन्य मार्गांनी त्या नराधमापर्यंत पोहोचवला होता. तो न पटल्यामुळे आणि न पचल्यामुळे या नराधमाने तिला पेटवून दिले.दिवसाढवळ्या घडणाऱ्या अशा घटना रोखायच्या असतील कौटुंबिक संस्कारांखेरीज लोकसहभाग असणारे पोलिसिंग अत्यावश्यक आहे. समाजातील प्रत्येक माणूस हा पोलिस असला पाहिजे. त्याचबरोबर पोलिस प्रक्रिया, तक्रार प्रक्रिया, न्यायालयीन प्रक्रिया ही गतिमान झाली पाहिजे. मानवाधिकारांच्या आणि कायद्यातील कलमांचा पळवाटा म्हणून वापर करून घेणाऱ्यांपेक्षा पीडितेच्या उद्ध्वस्त झालेल्या आयुष्याला प्राधान्य देणारी असली पाहिजे. अन्यथा, उशिरा न्याय म्हणजे न्याय नाकारणे हे लक्षात ठेवले पाहिजे. विश्वास नांगरे पाटील यांच्यासारखा पोलिस अधिकारी विनयभंग करणाऱ्या आरोपीला रिकॉल केस करून १५ दिवसांत शिक्षेपर्यंत पोहोचवू शकतो; मग अन्य पोलिस असे कृतीतत्पर का दिसत नाहीत? त्यामुळे लोकसहभाग असणारे पोलिसिंग अत्यंत गरजेचे आहे.
याखेरीज जनतेचा सामूहिक दबावही गरजेचा आहे. रस्त्यावरुन जाणाऱ्या मुलींकडे, महिलांकडे अश्लील नजरेने पाहिल्यास, विकृत चाळे केल्यास, त्यांची छेड काढल्यास, त्यांच्यावर घाणेरड्या कमेंटस् केल्यास जवळचा दुकानदार, रस्त्यावरुन जाणारा माणूस आपल्या कानशिलात लगावू शकतो, पोलिसांच्या हवाली करू शकतो ही भीती जोपर्यंत या गावगुंडांच्या, रोडरोमिओंच्या मनात निर्माण होणार नाही तोपर्यंत मुली सुरक्षित नाहीत. एखाद्या मुलीला काही जण त्रास देत असतील तर तिथे उद्या माझीही आई-बहिण-मुलगी असू शकते हे प्रत्येकाला वाटले पाहिजे. यासाठी माध्यमे, सामाजिक कार्यकर्ते, स्वयंसेवी संस्था, लोकप्रतिनिधी, पोलिस यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणावर प्रबोधन केले पाहिजे.
महिलांना मानसन्मान देणे, तिची सुरक्षा राखणे, त्यांच्यासाठी सुरक्षित-भयमुक्त वातावरण निर्माण करणे हे माझे काम आहे याची जाणीवजागृती शालेय पातळीपासून करावी लागेल. अशा घटनांविरोधात स्वतःहून पुढे येऊन आवाज उठवला पाहिजे, तक्रार केली पाहिजे, त्या व्यक्तीला जाब विचारला पाहिजे याचे प्रशिक्षण समाजातील प्रत्येक पुरुषांना-मुलांना द्यावे लागेल. आज ५०-५५ वर्षांचे पुरुषही एखाद्या पानटपरीपाशी थांबून वयात येणाऱ्या मुलींकडे पाहून त्यांच्यातील लैंगिक भावना जागृत कशी होईल, उद्दिपित कशी होईल असे हावभाव करत असतात. अशा विकृतांना वेळीच चाप लावण्याचे काम समाजाने केले पाहिजे. अन्यथा, या हैवानांच्या, वासनांध पशूंच्या तावडीत कुणाचीही चिमुरडी, तरुणी, महिला सापडू शकते हे विसरता कामा नये. म्हणूनच मानसन्मान मिळणे हा माझा अधिकार आहे मुलींना आणि मुली-महिलांना सन्मानाने वागणूक देणे हे माझे कर्तव्य आहे हे मुलांना शाळांमधून शिकवले गेले पाहिजे. अशा प्रकारचे प्रबोधन करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांना, सामाजिक कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना बक्षिसे, पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिले पाहिजे. प्रसंगी आर्थिक पाठबळ दिले पाहिजे. कारण ते समाजातील सर्वच महिलांच्या सुरक्षेसाठी झटत असतात.
आपल्या लहानपणी मूल्यशिक्षण हा विषय अभ्यासक्रमात नव्हता. घरातूनच ते शिक्षण मिळायचे. आता तो अभ्यासक्रमात अनिवार्य विषय बनला आहे. तशाच प्रकारे महिला सक्षमीकरण आणि सुरक्षा हा विषयही शाळांमधून शिकवला गेला पाहिजे. नुकत्याच निवर्तलेल्या विद्या बाळ, डॉ. नीलम गोऱ्हे, मी आणि अन्य काहींनी मिळून याचा अभ्यासक्रमही लिहून ठेवला आहे. महिलांना मानसन्मान देणे, स्रीच्या शीलाची जपणूक करणे, ती नाही म्हणत असेल ती गोष्ट न करणे, तिचे अधिकार देऊन तिचे संरक्षण करणे हे प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे या गोष्टी अशा अभ्यासक्रमातून शालेय विद्यार्थ्यांना-मुलग्यांना शिकवल्या गेल्या पाहिजेत.
शेवट करताना मला विश्वास नांगरे पाटलांनी मांडलेला मुद्दा मांडावासा वाटतो. ते म्हणाले की, दहशतवादाच्या विरोधात, दरोड्यांच्या विरोधात आपण रान उठवतो, तसं महिला सुरक्षेसंदर्भात आपण रान उठवत नाहीये. एखादी घटना घडली की, समाज अस्वस्थ होऊन पेटून उठतो; पण काही दिवसांनी शांत होतो. वास्तविक, चहूबाजूंनी रान उठवलं गेलं पाहिजे. राजकारणी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, सर्व जातीधर्मातील सुजाण नागरिक यांनी रान उठवायला हवे. त्यामुळे निर्भया, हैदराबाद, हिंगणघाट यांसारख्या घटनेनंतर ‘आता काय तरी झालं पाहिजे’ असं म्हणायचे आणि काही दिवसांनी मूक होऊन जायचे, ही वृत्ती आता सोडायला हवी. अन्यथा, मुलीला जन्म देताना, तिला शिकवताना प्रत्येक आई-बापाचं काळीज कापतच राहील. असे विवेक नगराळे आजूबाजूला फिरत राहिले तर स्रीभ्रूण हत्या कशा थांबतील?

(-लेखिका राज्य महिला आयोगाच्या माजी सदस्या आहेत)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com