चाहूल खुणा 

 Like the chaitra
Like the chaitra

झाडांना नटवून-सजवून, थरथरत्या देठांनी झाड अनिच्छेनेच सोडलंय जणू. तापत जाणारी जमीन पहाटे जेव्हा थंड होते, तेव्हा नव्या पानगळीने पुन्हा नवी कहाणी सांगायला सुरवात केलेली असते... ही चाहूल खूण... 

पाने गळताहेत! 
पिवळी होऊन, झाडाखाली... अज्ञाताने काही सांगायचं ठरवलंय! 

चैत्र चाहूल? 

त्या पानांत काही पाने दूरवरून येऊन मिसळून गेली आहेत. हिरवेपणा टिकवून ठेवलेली... निमुळती... वाऱ्यासोबत येऊन सायंकाळी या पानांबरोबरच पहुडलेली. मार्गशीर्षातील गारवा टिपून घेऊन, झाडांना नटवून-सजवून, थरथरत्या देठांनी झाड अनिच्छेनेच सोडलंय जणू. तापत जाणारी जमीन, पहाटे जेव्हा थंड होते, तेव्हा नव्या पानगळीने पुन्हा नवी कहाणी सांगायला सुरवात केलेली असते... ही युगानुयुगे चालणारी स्तब्ध, निश्‍चल, अबोल कहाणी... 

शेवग्याचे इवले-इवले पानांचे पिवळे ठिपके, बांबूच्या पानांचे वाळलेले, विखुरलेले खरखरीत अवशेष, धुळीच्या लोटांनी एक सार्वत्रिक ओळख निर्माण केलीय जणू. वर्षातून एकदा दिसणारा हा अनेखा मातकट रंग... पावसाळ्यात दडून गेलेला... 

नारळाच्या झावळ्यांपासून ते अमलताशच्या ओठेरी पानांपर्यंत, वडाच्या गच्च पानांच्या तळापासून ते जमिनीकडे झुकून बघणाऱ्या चाफ्याच्या पानांपर्यंत... सगळीकडे ही धुळीची मातकट चढाओढ. उंच फांद्यांच्या टोकाशी बोलणारे बुलबुल, जोडीने झर्रकन रेषा मारून भलतीकडेच झेपावतात... उमललेल्या कण्हेरीच्या झाडांना स्पर्शुन, गिरक्‍या घेत फेर धरून गच्च भरलेल्या आंब्याच्या झाडात गायब होतात... डोळे शोधत असतात आपले त्यांना. तेवढ्यात पलीकडील उंच इमारतीवर उतरलेली घार मान-चोच लीलया मागे फिरवून पंख साफ करीत असते. विस्कटून टाकत असते स्वत:ला. भटक्‍या कुत्र्यांनी वाळलेल्या पानांत पायाने केलेले खरखर आवाज. दूरवरून येणारे-बोलके आवाज-पक्ष्यांचे..! एकमेकाला हाक मारणारे... 

अंगावर आधीच चॉकलेटी वर्ख असणारा भारद्वाज पाण्याच्या शोधात असतो... 

समोरून उडालेला किडा, फुलपाखरू त्याकडे दुर्लक्ष 

करून भारद्वाज सैरभैर! सूर्य फिरेल त्या दिशेनं 

मलूल पडत जाणारी आंब्याची पानं... क्षणभरच 

बसलेला राघूंचा थवा- पुढच्या गावाला जातो असं म्हणून 

निघून गेलाय... 

दुपार अशी निघून जाते... चैत्राच्या तापत्या, बदलत्या ऋतूला सज्ज होताना, पुढं काय मांडून ठेवलंय, याचा अंदाज उघड्या खिडकीतूनही येतो... उष्णता जाणवू लागते. भिंतीच्या सांद्रीतून, लालसर मुंग्यांची रांग सरकताना, नुकत्याच पुसलेल्या काचेवर, धूळ पुन्हा जमताना, सृष्टीचं हे बदलतं रूप. काहीच अंशानं वाढलेलं हे तापमान, निसर्ग मात्र नम्रपणानं घेतोय, असं उगाचच वाटत राहतं. पिवळ्या पानांनी, झाडाचा निरोप घेताना पुन्हा येण्याचा निरोप दिलेला असेल... कारंज्याचं झाड नव्या कोवळ्या पालवीनं भरताना पाहून, या पानांनी आपलं तारुण्य आठवलं असेल की जुनी जाणती पानं अशीच दाटीवाटीनं कोसळताना, कारंज्याच्या नव्या पानांना त्यांचं भविष्य जाणवत असेल. 

सगळ्याचीच शेवटी माती होत असते. मूठभर असलेल्या खारोटीचे अचेतन शरीर जेव्हा पानांसोबत मातीत मिसळून जाते, तेव्हा पूर्ण हिरव्याकंच कारंजाच्या झाडावर, लखलखत्या डोळ्यांनी खारीचंच एक पिल्लू फांदीआड डोकावते. 

रंगपेटीतला हिरवा रंग घट्ट होत जातो. कागदावर उष्ण, पिवळा, रणरणता विटकरी, केशरी-लाल आपोआप उमटू लागतो... हेही रंगच असतात... अपरिहार्य. ते टाळून चित्र पूर्ण होत नसतंच. या रंगांतूनच कागद सजत जातो. दरवेळी- नव्याने काही उमजत जातं. दरवेळी नव्याने वाळलेल्या पानांतून, ढिगाऱ्यातून, जमीन नव्याने कात टाकते... पाने तिच्या कुशीत शिरून जातात... एकरूप होतात. शांत प्रवास हा. तापलेल्या हवेत, शुष्क-ओसाडपणा जरी वाढला असला तरीही या पानांचे जमिनीला बिलगणे... हा सृष्टीचाच नियम असतो. वाळलेला हिरवा रंग... आपल्या हक्‍काच्या कागदाची, तितक्‍याच शांतपणे वाट पाहत असतो. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com