चेरी ब्लॉसम गेला; "समर' ही जाणार! : अनुभव सातासमुद्रापारचे

रवी-धनश्री शेळके, टोरांटो (कॅनडा)
Tuesday, 2 June 2020

टोरोंटो...कॅनडाची आर्थिक राजधानी. इथे एप्रिल-मेमध्ये फुलांच्या लयलुटीचा चेरी ब्लॉसम असतो. यंदा फुले फुलली मात्र टाळेबंदीने त्यांचे दर्शन ऑनलाईनच घ्यावे लागले.

टोरोंटो...कॅनडाची आर्थिक राजधानी. इथे एप्रिल-मेमध्ये फुलांच्या लयलुटीचा चेरी ब्लॉसम असतो. यंदा फुले फुलली मात्र टाळेबंदीने त्यांचे दर्शन ऑनलाईनच घ्यावे लागले. आता उन्हाळ्याचे वेध लागले आहेत. या काळात इथे उत्सवी वातावरण असते. मात्र टोरांटोवासीयांसाठी हा लाखो सावन...म्हणजे इथला "समर'ही टाळेबंदीतच जाणार असे दिसते. बेरोजगारीसह अनेक समस्यांमुळे इथल्या स्वच्छ सूर्यप्रकाशावर चिंतेचे सावट आहे. 

30 मार्चपासून इथे टाळेबंदी लागू झाली आणि अत्यावश्‍यक वगळता सारे काही बंद झाले. ओघानेच अनेक आव्हाने-बेरोजगारीच्या समस्या उभ्या राहिल्या. सरकारने तातडीने 25 टक्के पगाराचा वाटा उचलत स्थिती सावरण्याचा प्रयत्न केला आहे. इथे एम्पॉलयमेंट इन्शुरन्स स्कीम अंतर्गत नोंदणी होत असल्याने करदात्या नोकरदारांना मोठा आधार मिळाला. देशात जवळपास आजघडीला दोन मिलियन बेरोजगारांची नोंद झाली आहे. त्यांच्यासाठी सरकारने वेगळा फंड तयार केला आहे. एकूणच कल्पनातीत अशा अडचणी प्रत्येक क्षेत्रात उभ्या राहिल्या आहेत. रोजगाराच्या काही संधी आहेत त्या फक्त ऑनलाईनच. एकूणच साथ आणि नोकऱ्या याबाबत अनिश्‍चितकाळासाठीचा संभ्रम आहे. 

सरकारने आता कोरोनासोबत दीर्घकालीन लढाईची तयारी सुरू केली आहे. आता मोबाईल टेस्ट सेंटरद्वारे त्या परिसरात जाऊन संशियतांच्या चाचण्या होतील. सरसकट टाळेबंदी ऐवजी आता हॉटस्पॉट निश्‍चित करून रुग्ण तपासणी-चाचण्या होतील. इथली आरोग्य व्यवस्था दिलासादायक आहे. पूर्ण मोफत वैद्यकीय उपचार. ज्येष्ठांसाठी केअर सेंटर. मुलांसाठी डे केअर सेंटर असतात. सरकार ही सेंटर ताब्यात घेणार आहे. सर्वांना विमा संलग्न असे शासनाचे हेल्थ कार्ड असते. 

शाळा मार्चपासून बंद आहे आणि राज्यनिहाय त्यांचे स्वतंत्र वेळापत्रक आहे. आता बहुतांशी अध्यापन ऑनलाईनच आहे. त्यात मुलांसाठीची डे केअर सेंटरही आता बंद असल्याने मुलांना अभ्यास ही पालकांची मोठी जबाबदारी झाली आहे. सरकारने प्रत्येक मुलामागे 300 डॉलरची मदत दिली आहे. इथे शिक्षणाच्या निमित्ताने जगभरातून विद्यार्थी येतात आणि कमवा-शिका पद्धतीनुसार ते शिकतात. सध्याच्या आपत्तीत सरकारने या विद्यार्थ्यांनाही मदत दिलीय. पर्यटकांना व्हिसा मुदत वाढवून दिली आहे. 

आता टोरोंटा शहराला उन्हाळ्याचे वेध लागलेत. एरवी सारा परिसर बर्फाच्छादित असतो. आता बर्फ वितळून स्वच्छ सूर्यप्रकाश पडतोय. या काळात इथल्या बागा खुल्या होतात. या काळात जल्लोषी वातावरण असते. ऑगस्टपर्यंतचा सारा माहोल उत्सवी असतो, मात्र साऱ्यावरच पाणी पडेल. फुले फुलली...स्वच्छ सूर्यप्रकाशही आहे, मात्र भविष्याच्या चिंतेचे सावट आहे. नोकरी-व्यवसायानिमित्त जगभरातून लोक स्थिरस्थावर झालेत. साहजिकच सांस्कृतिक विविदता दिसते. ही सारी मंडळीच इथल्या लोकजीवनाशी एकरूप झालेली आहेत. "कोरोना' ने उत्सवच नव्हे तर जगणेच बदललेय. हा काळ किती हे सांगता येत नाही. आशादायक एकच की आता कोरोना रुग्णसंख्येचा आलेख उताराला लागला आहे. 

इतर ब्लॉग्स