कोरोनाच्या काळात मात्र ही मनं कलुषित होतात की काय, अशी भीती होती; पण उशिरा का होईना, गावागावात विलगीकरण कक्षात चाकरमान्यांची घेतली जात असलेली काळजी पाहिली की, सकारात्मकता वाढीस लागते आणि ही भीती अनाठायी ठरत असल्याचा प्रत्यय येत राहतो. चाकरमानीसुद्धा आपली जबाबदारी समजून दक्षता समितीने शासनाच्या मार्गदर्शनाखाली आखलेल्या नियमांचे पालन करत आहेत. काही ठिकाणी विलगीकरण कक्ष असलेल्या शाळांचा परिसर चाकरमानी स्वच्छ-सुशोभित करत आहेत. यातून गाव आणि मुंबईचं नातं बहरत जाईल यात शंका नाही.