मनातला कोरोना : भावनांच्या लाटा ओळखू या

curfew
curfew

आपल्याला सगळ्यांना कधी चिंता वाटते, कधी काळजी वाटते. पण या दोन्ही भावनात फरक आहे. भावना ही विचारातून येते. विचार म्हणजे आपण सतत मनाशी, मनामध्ये बोलत असतो. ज्याला स्व-संवाद (सेल्फ टॉक) म्हणतात. बोलणं (टॉक) आणि स्वसंवाद , अंतर्वाणी (सेल्फ टॉक) या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. आपल्या परंपरेनेही त्याला (अनुक्रमे) वैखरी आणि मध्यमा म्हटलं आहे. मनाच्या श्लोकात पुढे वैखरी राम आधी वदावा, असं म्हटलं आहे. राम वदायचा असेल, तर तो फक्त वाणीत येऊन चालणार नाही, तो अंतर्वाणीत आला पाहिजे, हे समर्थ रामदास स्वामींनी सांगितलंय.

स्वसंवादातून भावना निर्माण होतात. चिंतेच्यावेळचा (अँक्झायटी) आणि काळजीच्या (कन्सर्न) वेळचा आपला स्वतःशी संवाद, सेल्फ टॉक यामध्ये फरक असतो. स्वसंवाद चिंता आणि काळजीच्यावेळचा काय होणार, कसं होणार, काहीतरी होणार की नाही , असा चिंतेच्या वेळचा स्व संवाद असतो. सगळ्याचा शेवट प्रश्र्नचिन्हात होतो. तो अनिश्चितता दाखवतो. या सेल्फ टॉकमध्ये प्रश्नचिन्ह थांबतच नाहीत. आता पुढे काय होणार, वाईटच होणार रे. घडायचं ते घडणारंच रे, असा सेल्फ टॉक पुढे सुरूच राहतो. जो नकारात्मक असतो. प्रत्येक प्रश्र्नचिन्हाच्या पुढे एक नकारात्मक वाक्य येतं. प्रश्नचिन्हाच्या पुढे अधांतर नसतं, तर आता माझं काहीतरी वाईट होणार, ही नकारात्मकता असते. चिंतेच्या पातळीवर हे सगळं म्हणतो, तेव्हा त्यात खात्री दडलेली असते.

काळजीच्यावेळच्या सेल्फ टॉकमध्ये नकारात्मक, दुःखदायक परिणाम घडण्याची शक्यता गृहीत धरलेली असते. नकारात्मक परिणाम होण्याची शक्यता आहे, असं म्हणतो तेव्हा ती शक्यता कमी करण्यासाठी प्रयत्न करायला सुरवात करतो. वाईट परिणाम होणारच, अशी खात्री असते, तेव्हा आपण प्रयत्न करणंच सोडून देतो. म्हणजेच चिंता आणि काळजीच्या भावनेचा विचारांवर, वर्तनावर वेगवेगळा परिणाम होतो. मनातल्या कोरोनावर आपण हे सगळं ताडून पाहिलं, तर कळेल. मला आज बरेचसे फोन आले, त्यात मला कोरोनाचा संसर्ग होणार की नाही, अशी भीती व्यक्त करणारे फोन होते. होणारच, म्हणाऱ्यांमध्ये चिंतेची भावना होती. होणार की नाही, यामध्ये होईल किंवा नाही, अशा दोन्ही शक्यतांचा सूर होता. होणारच, म्हणताना त्यात नकारात्मक खात्री असते. आपलं मन कधी खात्रीच्या तर कधी शक्यतेच्या मागार्वर (ट्रॅक) चालतं. खात्रीच्या ट्रॅकवर मन सहजपणे जातं. आपल्याला त्याला शक्यतेच्या मागार्वर जाणीवपूर्वक खेचावं लागतं. कोरोनाच्यासंदर्भात विचार करायचा झाला, तर काळजीच्या भावनेने आपण ठरवू शकतो, की संसर्ग टाळण्यासाठी, बंधनं असली तरी आपण घरीच थांबू या. सामाजिक अंतर ठेवू या। काही ठिकाणी दुकानदारांनी नागरिकांना अंतरावर उभं राहता यावं , म्हणून गोल आखले. जे शक्य होतं, ते करणं ही चांगली गोष्ट आहे.

हवं परस्परावलंबन काळजीची भावना असते, तेव्हा आपल्या नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवर काम करायला, विचार करायला सुरवात होते. आता वीस दिवस घरात आहोत, त्याचा कृती कार्यक्रमच ठरवता येईल. परंतु, चिंतेची भावना असेल, तर वाटतं, सर्व घटक आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत. आपण कृती करत नाही. सुचतच नाही. अशावेळी माणूस दुसऱ्यांवर अवलंबून राहतो. त्यात कधी कुटुंबीय, नातेवाईक, देव आणि दैवही असतं. चिंतेत जणू परावलंबीत्त्व येतं. काळजीच्या भावनेत स्वतःची आणि दुसऱ्यांची अशी दोघांची काळजी घेतली जाते. परस्परावलंबन महत्त्वाचं. दुसऱ्यांवर अवलंबून राहणं (डिपेंडन्स) त्याचबरोबर माझं मला समजतं, मला कुणाची गरज नाही , अशी स्वतंत्र (इंडिपेंडन्ट) वृत्ती असणं आणि या दोन्हीच्या मधले परस्परावलंबन , हे तीनही ट्रॅक आपल्यामध्ये आहेत. कालच्या लेखात म्हटल्याप्रमाणे डिपेडन्स म्हणजे महाभयंकरीकरण, तर इंडिपेंडन्स म्हणजे महाक्षुल्लकीकरण करणं. जे आपल्यासाठी अयोग्य आहे. गरज आहे, ती परस्परावलंबनाची म्हणजे सामान्यीकरणाची,
नॉर्मलायजेशनची.

सेल्फ टॉकमधला उपयुक्त ट्रॅक ओळखू या. तो आहे काळजीचा. तो नियंत्रणाखाली असलेल्या घटकांवर काम करायला लागतो. वीस दिवसांचा अवधी आहे. बंधनं असली, तरी वेळेचा वापर कसा करायचा, हे ठरवता येईल. मला कोणाकोणाचं सहकार्य मिळेल, मी कामं शोधेन, छंदात रमेन, वेगळ्या अॅक्टीव्हिटी शोधायला मग सुरवात होते. त्यात घरातल्यांबरोबर टीव्ही. पाहणंही असू शकतं. अशाने चिंता कमी व्हायला मदत होते. म्हणून काळजीच्या ट्रॅकवर विचार करणं चांगलं. काळजी नियंत्रणाबाहेरील घटकांचंही भान ठेवते. नियंत्रणातील आणि नियंत्रणाबाहेरील घटकांचे परिणाम आणि पर्याय यांची वास्तवनिष्ठ सांगड घालता यायला लागते. कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो, हा परिणाम. पण, माझ्या आरोग्याची काळजी घेणं हा पर्याय सुचायला लागतो. परिणाम आणि पर्याय यामध्येही परस्परावलंबन आहे. काळजी करताना आपण उद्दिष्टाचं भान ठेवून असतो. सध्याची सुटी हा विराम आहे, मिळालेल्या वेळाचा वापर कसा चांगला करता येईल, हे पाहिलं पाहिजे. हा विराम आपल्याला ध्येयाकडे नेऊ शकतो, सावधपणे पुढे जाण्यासाठीचा आहे.

चिंतेच्या भावनेत वाईट घडण्याची खात्रीच असते. काळजीत फॅक्टर्स विदीन अवर कंट्रोलचा विचार असतो. निश्चित, नियंत्रणाखालील घटकांच्या माध्यमातून अपेक्षित परिणाम घडण्याची दाट शक्यता त्यात असते. शक्यता (पॉसिबिलीटी) आणि दाट शक्यता (प्रोबेबिलीटी) असा सकारात्मक विचार असतो. काहीजणांना आपल्याला संसर्ग होणारच नाही, अशी सुखद खात्रीच असते. ही सुद्धा हानीकारक भावना आहे. म्हणूनच सध्याचा जो थोडा वेळ मिळाला आहे, तो स्वसंवादाचा, सेल्फ टाॅकचा मागोवा घेण्यासाठी वापरू या. आपल्याच विचारांचा मागोवा घेऊ. एकदा या भावनांच्या लाटा ओळखता येऊ लागल्या, की कोणत्या लाटेवर स्वार व्हायचं, ते ठरवता येईल. तसं आपण केलं नाही, तर चिंतेची लाट विवेकाला गिळून टाकेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com