संयमातून संधीकडे!

यशवंत केसरकर
Wednesday, 16 September 2020

कोरोनावर मात करायची असेल, तर तुमच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर पौष्टिक पदार्थ खावे लागतात. असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे.

कोरोना महामारीमुळे अनेक उलथापालथी झाल्या. मानवी जीवनावर मूलभूत परिणाम झाले. मानवी इतिहासामध्ये प्रथमच लोकांना अनेक दिवस घरी राहावे लागले. त्याचा व्यापार, उद्योग, नोकरी अशा घटकांवर परिणाम झाला. या काळात ज्यांनी धाडसाने व संयमाने उभे राहून संकटाचा सामना केला. त्यांना त्यातून बाहेर पडण्यासाठी थोडा फायदा झाला. मात्र, संकटाला घाबरून आततायीपणे चुकीचे निर्णय घेतलेले अनेक जण अडचणीत आले आहेत. 

त्यांच्यावर पश्‍चाताप करण्याची वेळ आली आहे. उदाहरण द्यायचे झाले, तर पोल्ट्री उद्योग हा त्याचा ढळढळीत पुरावा म्हणावा लागेल. कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेत सोशल मीडियावर अनेक अफवा, फेक न्यूज पसरवण्यात आल्या. यामुळे नेमके काय होते. याची शहानिशा न करता लोकांनीही त्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात केली. त्याचा फटका चिकन, अंडी यांच्या विक्रीवर झाला. मागणी कमी झाली. मालाचा उठाव होत नसल्याने पोल्ट्री व्यावसायिकांचे अनेक कोटी रुपयांचे नुकसान झाले. अनेक व्यावसायिकांनी अंड्यांचा नाश केला. नव्याने जन्मलेली कोंबडीची पिल्ले नष्ट केली. काहींनी कोंबड्या मारल्या, तर बॉयलर कोंबड्यांची नुकसान सोसत मातीमोल किमतीने विक्री केली. आज कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

कोरोनावर मात करायची असेल, तर तुमच्यामध्ये प्रतिकारशक्ती वाढवावी लागेल. प्रतिकारशक्ती वाढवायची असेल, तर पौष्टिक पदार्थ खावे लागतात. असा सल्ला डॉक्‍टरांनी दिला आहे. कोरोना संसर्गाच्या प्राथमिक अवस्थेत ही डॉक्‍टरांनी अंडी, चिकन आरोग्यदायी आहे. त्यामुळे प्रतिकारशक्ती वाढते. चिकन खाल्ल्यास त्यातून कोरोना होत नाही, असे सांगितले होते. मात्र, सोशल मीडियातून काहींनी चुकीचा संदेश पसरविला. त्याची शहानिशा न करता लोकांनी त्यावर विश्‍वास ठेवला. आज परिस्थिती बदलली आहे. संसर्ग रोखण्यासाठी व प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी अंडी, चिकन यांचे महत्त्व लोकांना पटलं आहे. अंडी, चिकनला मागणी वाढली आहे.

गेल्या अनेक वर्षांत अंड्यांचे भाव सर्वाधिक वाढले आहेत. त्याला कारण मागणी जास्त आणि पुरवठा कमी हे आहे. ज्या पोल्ट्री उद्योजकांनी संयम ठेवला. संकट दूर होण्याची वाट पाहिली त्यांनी संधीचा लाभ घेतला. त्यांना त्याचा फायदा आज होत आहे. असाच प्रकार टेक्‍स्टाईल, गारमेंट उद्योगात झाला. प्रारंभी त्यांचा व्यवसाय ठप्प झाला. कोरोना महामारीमुळे नवीन उत्पादने त्यांना मिळाली. मास्क, रूमाल, पीपीई किट यांची मोठी मागणी वाढली आणि या उद्योगाला काही प्रमाणात उभारी मिळाली.असं म्हटलं जातं की संकटासोबत संधीही येते. या संधीची वाट पाहण्याची आणि संयम ठेवण्याची गरज आहे. म्हणून संकटाला घाबरून जाऊन निर्णय घेतल्यास त्यातून नुकसानच अधिक होते. हे या दोन उदाहरणांवरून स्पष्ट झाले आहे. असं म्हणता येईल की यामुळे या उद्योगांना मिळालेला एक धडा आहे. भविष्यात एखादे संकट आले, तर घाबरून न जाता त्याचा धाडसाने मुकाबला केल्यास भविष्य आपलेच आहे, हे वेगळं सांगायची गरज नाही.

संपादन -  अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स