‘सकाळ’चा आज चाळिसावा वर्धापन दिन : हा स्नेहबंध अतुट राहो...

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 August 2020

कोल्हापूर ‘सकाळ’चा आज चाळिसावा वर्धापन दिन आहे. कोरोनामुळे दरवर्षी होणारे व्याख्यान आणि स्नेहमेळावा रद्द करण्यात आला आहे; परंतु कोरोनोत्तर (जग आणि जगणं) हा वैचारिक मेजवानी देणारा विशेषांक आज प्रसिद्ध करत आहोत.

हा स्नेहबंध अतुट राहो...
सकाळ’चा आज चाळिसावा वर्धापन दिन. चार दशकांची दमदार वाटचाल वाचकांच्या निःसंदिग्ध पाठिंब्याच्या बळावर ‘सकाळ’ पूर्ण करतो आहे, हा आनंदाचा, अभिमानाचा क्षण आहेच. तो तितक्‍याच जल्लोषात साजरा करण्याचाही क्षण आहे. दरवर्षी ‘सकाळ’चा वर्धापन दिन हा कोल्हापूरच्या सांस्कृतिक, सामाजिक जीवनातला एक सण बनून गेला आहे. यंदा पहिल्यांदाच वर्धापन दिनाचा सोहळा स्थगित करावा लागतो आहे. न दिसणाऱ्या नवकोरोना नामक विषाणूनं जगभरात जे थैमान घातलं आहे, याच्या दाहक झळा आता कोल्हापुरातही आपण अनुभवतो आहोत. अशा वेळी निश्‍चित औषध नसलेल्या आणि प्रतिबंधात्मक लसही नसलेल्या या विषाणूशी लढताना गर्दी टाळणं हा एक कळीचा उपाय उरतो.

‘सकाळ’चा वर्धापन दिन आणि वाचक, हितचिंतकांची न संपणारी गर्दी हे समीकरणच. यंदा असं एकत्र येणं समाज म्हणून परवडणारं नाही. याचं भान राखूनच वर्धापन दिनाचा जाहीर सोहळा स्नेहमेळावा आणि त्यासोबत जोडलेल्या व्याख्यानाचा कार्यक्रम स्थगित करावा लागला. त्यासाठीच हा संवाद. जे वर्षानुवर्षे आवर्जून भेटतात, ‘सकाळ’ कोल्हापुरात आवृत्ती म्हणून यायच्या आधीपासूनही वाचतात आणि वृत्तपत्र वाचायचं तर ‘सकाळ’च वाचेन असं ठामपणे सांगतात, अगदी किरकोळ त्रुटींसाठीही हक्कानं कान धरतात, अशा साऱ्या वाचकांना आज थेट भेटता येणार नाही. अर्थात, त्यामुळं ‘सकाळ’वरचा आपला स्नेह कमी होत नाही आणि ‘सकाळ’ची समाजाप्रतीची बांधिलकीही कमी होत नाही. किंबहुना ‘सकाळ’चं अशी बांधिलकी हेच तर वैशिष्ट्य आहे. हा स्नेहबंध अतुट राहो.
समाजाशी बांधिलकी जपताना समाजाच्या भल्याचं काय, समाजाला पुढं नेणारं काय, हाच ‘सकाळ’नं शास्त्रकाटा मानला. खणखणीत पत्रकारितेचा मानदंड

‘सकाळ’नं महाराष्ट्रात आणि कोल्हापुरातही उभा केला आहे. या वाटचालीत विश्‍वासार्हतेचा धागा सतत बळकट होत गेला, याचं कारण तो आमच्या मूल्यव्यवस्थेचा भाग आहे. बातमीसाठी सत्याचा शोध ‘सकाळ’पाशी येऊन थांबतो, असं जेव्हा चोखंदळ, विवेकी वाचक सांगतो तेव्हा याहून वेगळं प्रमाणपत्र कोणतं? माहितीच्या विस्फोटाचं युग आहे. माहितीचे असंख्य पुंजके आपल्या अवतीभोवती नकळतपणे तयार होतात. समाजमाध्यमांनी त्याची गती कैक पटींनी वाढवली आहे. अशा वेळी माहितीची सत्यासत्यता कमालीची महत्त्वाची ठरते. आज ज्या वातावरणात आपण आहोत तिथं कोणावर तरी निःशंकपणे विश्‍वास ठेवण्याचं मोल कल्पनातीत आहे. कदाचित लोकप्रिय प्रवाहांच्या विरोधात जाऊनही योग्य काय हेच मांडू, हा बाणा ‘सकाळ’नं स्थापनेपासून सांभाळल्यानं लोकांचा हा विश्‍वास आहे. ‘सत्याअसत्याशी मन केले ग्वाही’ हेच त्यामागचं सूत्र. प्रवाहपतित होण्यापेक्षा प्रसंगी झळ सोसून मूल्यांसाठी ठाम उभं राहण्याचा ‘सकाळ’चा वारसा वाचकांना भावतो. साहजिकच जे चुकतं त्यावर प्रहार करताना ‘सकाळ’ची लेखणी कधीच कचरत नाही.

चुकणारे कोण, कोणत्या पदावरचे, त्याचं स्थान याची भीडमुर्वत ठेवायची गरज उरत नाही. चांगल्याचा गुणाकार करावा, वाईटाचा बाकी निःशेष होईपर्यंत भागाकार, ही कार्यपद्धती वाचकांना भावली. रांगडा कोल्हापुरी माणूस ‘सकाळ’सोबत ठामपणे उभा राहिला तो याच गुणामुळं. ही खणखणीत पत्रकारिता आणि पंचगंगेच्या पाण्याचा चांगल्याच्या मागं ठाम उभं राहण्याचा गुण यातून ‘सकाळ’ आणि भवतालचा समाज यात एक अद्वैत फुललं आहे. म्हणूनच कोविडची साथ भरात असतानाही कित्येक वाचक विचारत होते, ‘यंदा वर्धापन दिनाला पाहुणा कोण?’ ‘व्याख्यान कुणाचं?’ हे वृत्तपत्र आणि वाचकांत साकारलेल्या अकृत्रिम जिव्हाळ्याचं निदर्शक. चार दशकांची वाट तुडवल्यानंतरच्या टप्प्यावर या जिव्हाळ्यासाठी आपले आभार मानायचाही आजचा दिवस आहे. 

पत्रकारितेला रचनात्मक सक्रियतेशी जोडण्याचा प्रयत्न गेली काही वर्षे ‘सकाळ’ करतो आहे. यात जे भवताली घडते ते मांडावं, त्याचा अन्वयार्थ लावावा, भलंबुरं समजावून सांगावं ही भूमिका कायमच आहे; मात्र समाजात काही चांगलं घडायचं तर प्रसंगी लोकांसह प्रत्यक्ष कृतीला उतरावं हे या वाटचालीचं सूत्र आहे. ते कोल्हापुरात पंचगंगेचं प्रदूषण, रंकाळ्याचं, ऐतिहासिक वारसास्थळांचं जतन, राधानगरी अभयारण्यातलं कचरा निर्मूलन ते शहराचं बजेट लोकसहभागातून मांडण्यापर्यंतच्या अनेक उपक्रमांतून प्रत्यक्षात आणतो आहोत. नियोजन ज्यांच्यासाठी त्यांचा त्यात सहभाग असेल तर ते यशस्वी होण्याची शक्‍यता अधिक असते. शिवाय समाजातील सामूहिक शहाणीव प्रश्‍नांना भिडताना अधिक उपयोगाची ठरते, हेही या वाटचालीत दिसलं आहे. समाजाचे प्रश्‍न मांडतानाच त्यांची उत्तरंही शोधली पाहिजेत आणि ती प्रत्यक्षात आणण्यासाठी कृतिशील व्हायला हवं, हीच ‘सकाळ’ची भूमिका आहे.

कोरोनाच्या प्रसाराच्या काळात सारं जग ठप्प झालं. काही न करणं हेच अधिक हिताचं, अशी भूमिका जगाला घ्यावी लागली. त्या अव्वल लॉकडाउनच्या काळातही माध्यमं थांबली नव्हती. ‘सकाळ’ही थांबला नाही. एक दिवसही वाचकांच्या सेवेत खंड पडता कामा नये, याची दक्षता आम्ही घेतली. याचं कारण कोरोनासारखी साथ येते तेव्हा समाजात एक गोंधळलेपण स्वाभाविक असतं. ते शासन-प्रशासनातही अनिवार्य असतं. अशा वातावरणात पहिला बळी सत्याचा जाण्याचा धोका असतो. याचं कारण चुकीची, दिशाभूल करणारी, अर्धसत्य माहिती किंवा धादांत असत्य प्रचार असं काहीही खपवलं जाण्याची शक्‍यता वाढते. तिथं पारंपरिक माध्यमांनी कमावलेल्या विश्‍वासार्हतेचा कस लागतो. वास्तवाचं भान वाचकांना देताना विश्‍वासार्ह माहिती आणि संकटाशी झुंजण्याचं बळ देण्याचा प्रयत्न ‘सकाळ’ करतो आहे. कोरोनाचा परिणाम नाही असं कोणतंही क्षेत्र उरलेलं नाही. या परिणामांचं आकलन करून घेताना ‘सकाळ’नं अनेक क्षेत्रांतील मान्यवरांसोबत डिजिटल माध्यमातून संवाद घडवला. बदलत्या जागतिक रचनेपासून आपल्या आसपासच्या उद्योग-व्यवसायांवर आणि रोजगारावर होणाऱ्या परिणामांपर्यंतचा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केला. हे पुन्हा आमच्या सकारात्मक सक्रियतेशी सुसंगतच.

कोरोनाविषयीचा जागर सुरवातीच्या काळात आवश्‍यक होता. यात लढणाऱ्यांना बळ देण्याची आवश्‍यकताही होती. त्यासोबतच निरनिराळ्या टप्प्यांवर स्पष्ट भूमिका घेणंही गरजेचं होतं. ही जागल्याची भूमिका ‘सकाळ’नं निभावली. सुरवातीला कडेकोट लॉकडाउनसाठी जागर करतानाच एका टप्प्यावर ‘जगणं वाचवा आणि जगण्याची साधनंही’ असं स्पष्टपणे बजावलं. कोणत्याही कारणानं सारी अर्थव्यवस्था दीर्घकाळ कुलूपबंद करून ठेवणं भयावह आर्थिक परिणामांना निमंत्रण देणारं असल्याचं भान देण्याचा प्रयत्न केला. कोरोनाच्या काळातही गैरप्रकार करणाऱ्यांचे कारनामे चव्हाट्यावर आणले आणि या काळात ज्या निष्ठूरपणे स्थलांतरितांचा प्रश्‍न हाताळला गेला त्यावर कोरडेही ओढले. सोबत आवश्‍यक तिथं पूर्णतः शासनाला सहकार्याची भूमिकाही मांडली. 

कोरोनाच्या संकटातून कधी तरी सारे बाहेर पडूच; मात्र त्यानंतरचं जग पुरतं बदललेलं असेल. साहजिकच या बदलांचा अदमास घेत भविष्यवेधी मांडणी करणं हे ‘सकाळ’चं वेगळेपण. कोरोनापूर्व आणि कोरोनोत्तर अशी जगाची कालविभागणी होईल इतके हे परिणाम व्यापक असतील, असं सारे शहाणे सांगताहेत. उद्योग व्यापार ते कला साहित्यापर्यंत नवे प्रवाह यातून तयार होतील. खास करून अर्थव्यवस्थेतील काही काळासाठीचा गारठा आणि त्यानंतर अर्थव्यवस्थेची वाटचाल वेगानं डिजिटल मार्गावरून पुढं जाणं हे सर्वंकष बदलाचं निमित्त आहे. खाणंपिणं, शिक्षण, खरेदी ते नातेसंबंधांपर्यंत सर्वदूर असे परिणाम येऊ घातले आहेत. आतापर्यंतचा अनुभव, शिक्षण, कार्यपद्धती या बदलांना तोंड देताना कदाचित अपुऱ्या ठरण्याची शक्‍यता. तेव्हा या कोरोनोत्तर जगाशी जुळवून घेणं, कालसुसंगत राहणं हे प्रत्येकासमोरचं मोठंच आव्हान असेल. ‘सकाळ’च्या वर्धापन दिनाला एका विषयावर तज्ज्ञांच्या सहभागातून मांडणी करणारा विशेषांक हे नेहमीच आकर्षण असतं.

यंदा कोरोनोत्तर जगाचा धांडोळा घेणारा विशेषांक देत आहोत. माध्यम म्हणून त्याची केवळ मांडणी करून ‘सकाळ’ थांबत नाही. या बदलांवर स्वार होणारा माणूस घडवणं हे ध्येय समोर ठेवतो. त्यासाठी कुठं, काय बदललं पाहिजे, काय शिकलं पाहिजे, काय सोडून द्यावं लागेल, याचं मार्गदर्शन तज्ज्ञांच्या सहभागातून करायचा प्रयत्न करतो आहे. जगातील अर्थचक्राला मंदीच्या झळा बसतात तेव्हा आपला भवताल त्यापासून बाजूला राहू शकत नाही. त्यावर मात करण्याच्या पद्धती, कौशल्य आत्मसात करणं हाच त्यावरचा मार्ग असतो. तो शोधण्याची, त्यासाठी आग्रह धरण्याची ‘सकाळ’ची भूमिका असेल. 
तंत्रज्ञानाच्या अफाट गतीनं एक संक्रमण येतच आहे, कोरोनानं त्याची गती आणखी वाढवली. या बदलांना आत्मविश्‍वासानं सामोरं जायला सज्ज होऊया. त्यासाठी माध्यम म्हणून ‘सकाळ’ आपलं सामर्थ्य नक्कीच वापरेल. ‘सकाळ’शी आपलं स्नेहाचं नातं जडलं आहे, हा लोभ असाच राहो! चाळिशीत पाऊल ठेवताना समाजाच्या भल्याचं व्रत ‘सकाळ’ आणखी ताकदीनं निभावत राहील. आणि हो, गरज असेल तरच घराबाहेर पडा. गर्दी टाळा, सामूहिक दूरस्थतेचे, स्वच्छतेचे नियम पाळा. दिवस काळजी घ्यायचे आहेत; भीतीचे नक्कीच नाहीत!

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स