गरज ‘अर्थ’प्रबोधनाची!

Dhangar brothers live Bee economic research article by sachin charati
Dhangar brothers live Bee economic research article by sachin charati

रानावनात राहणाऱ्या डंगे धनगर बांधवांचं जगणं अजूनही निसर्गाशी एकरूप आहे. निसर्गात होणाऱ्या बारीकसारीक बदलांच्या निरीक्षणामधून आलेल्या शहाणपणातून त्यांचं निसर्गाशी सहजीवन तयार झालं आहे. पावसाबाबतही त्यांचा ठोकताळा प्रचलित आहे. तो मधमाश्‍यांच्या वर्तणुकीशी जोडला गेला आहे. साधारण मार्चपासून मधाचा हंगाम बहरतो. मॉन्सूनची पहिली सर येईपर्यंत, म्हणजे जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत मधकाढणी होते.

दरम्यानच्या काळात पाऊस जर लांबणार असेल, तर मध नेहमीपेक्षा जास्त घट्ट होतो. याचा अर्थ मधमाश्‍यांनी आपला मुक्काम वाढवला आहे. त्या काळात पुरेल असे मधाचे नियोजन (संचय) त्यांनी केले आणि पाऊस लवकर येणार असेल, तर माशा मध पातळ तयार करतात. जेणेकरून तो संपवून त्या पुढच्या प्रवासाला जायला मोकळ्या. या अनुमानावर मग धनगर बांधवांचा पुढचा जीवनक्रम चालतो. अर्थात, हे निरीक्षणातील ठोकताळे आहेत. मॉन्सून लहरी आहे, हेच वास्तव आहे. तरीही हवामानातील बदलातून मधमाशा वर्तन बदलतात. त्याचा आधार धनगर बांधव घेतात आणि पर्यायाने आपणही.


मधमाशा काय... आपण काय... भोवतालच्या बदलांचा परिणाम आपल्या वर्तणुकीवर होतो. अपवाद नेमस्तांचा आहेच. आता या सगळ्याची उजळणी करायचं कारण म्हणजे रिझर्व्ह बॅंकेचा वार्षिक अहवाल. या अहवालामध्ये भारतीय कुटुंबांनी कर्जाचे प्रमाण कमी करत वित्तीय साधनांत बचत वाढवल्याचा प्राथमिक निष्कर्ष मांडला आहे. मागील वर्षभरातील अर्थव्यवस्थेचा दर दशकातील नीचांकी असल्यामुळे लोकांचा बचतीकडे कल वाढला असल्याचे अहवालात नमूद केले आहे. २०१९-२०२० या आर्थिक वर्षात बचतीचा दर विवेकी खर्चाच्या ७.६ टक्के होता. त्या आधीच्या वर्षी बचतीचा दर ६.४ टक्के होता. म्हणजे यंदा १.२ टक्‍क्‍याने हा दर वाढला आहे. अनेकांनी ही बचत भविष्यातील संभाव्य आव्हानात्मक दिवसांच्या बेगमीसाठी राखून ठेवल्याचे हा अहवाल सांगतो. ग्राहक आपल्या विवेकी खर्चामध्ये कपात करत असून बचतीचे प्रमाण वाढवत असल्याने बाजारात वस्तूंची मागणी घटेल, अशी शक्‍यताही अहवालात व्यक्त केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा ग्राहकांचे कर्ज घेण्याचे प्रमाण कमी झाले असून लोकांचा कल खर्चापेक्षा संचयनाकडे वाढल्याचे अहवाल सांगतो. गुंतवणूकदारांचा कल जोखीम टाळण्याकडे असून सध्या ते सुरक्षित गुंतवणुकीला प्राधान्य देत असल्याचे अहवालातून सांगितले आहे. सेवानिवृत्ती योजनांमध्ये ही बचत रक्कम संक्रमित झाल्याचेही निरीक्षण अहवालाने नोंदविले आहे.


एकंदर संभाव्य आव्हानात्मक दिवसांच्या बेगमीसाठी लोक बचत करत असल्याचा जो मुद्दा या अहवालाने मांडला आहे, तो अस्थिर अर्थस्थितीत लोकांच्या वर्तणुकीत झालेला बदलच म्हणावा लागेल. पण गुंतवणूकदारांचा कल जोखीम टाळण्याकडे आहे हे हा अहवाल सांगतो तेव्हा समाजात अर्थसाक्षरतेबाबत अधिक प्रयत्न करण्याची गरजही जाणवते. कारण अपुऱ्या माहितीमुळे पर्याय खुंटतात. हे खुंटलेपण योग्य आणि विश्‍वासार्ह माहितीतूनच नष्ट होऊ शकते. यासाठी लोकांचे ‘अर्थ’प्रबोधन होणे आवश्‍यक आहे. कारण जास्त जोखीम- जास्त लाभ, हा अर्थशास्त्राचा नियमच आहे. फक्त ही जोखीम माहितीपूर्णतेतून असावी इतकेच. शिवाय जोखीम पत्करण्याजोगी अर्थव्यवस्थेतील स्थिती पोषक असावी, हे ओघाने आलेच.

संपादन - अर्चना बनगे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com