हिंदुस्तानी भाऊचा धुडगूस अन् बालिश मुलं...

Hindustani bhau
Hindustani bhauesakal

कोणातरी तथाकथित हिंदुस्तानी भाऊने इन्स्टाग्रामवर आवाहन केलं आणि राज्यभरात लाखो शालेय मुलं रस्त्यावर उतरली. ही मुलं बालिश बुद्धीची असल्याचं या घटनेनं दाखवून दिलं. तसं पाहता या वयात बुद्धी बालिश असणं स्वाभाविक मानलं जातं. त्यामुळेच या घटनेसाठी केवळ ही मुलं जबाबदार आहेत, असं म्हणता येणार नाही. मात्र, या घटनेनं अनेकांना विविध अंगांनी विचार करायला भाग पाडलं आहे. सोशल मीडियाचा गैरप्रकारे वापर कशारीतीने होऊ शकतो, याचं हे ज्वलंत उदाहरण मानावं लागेल. समाज माध्यमांची झिंग चढलेली ही बालिश मुलं कुटुंबांमध्ये, समाजामध्ये वावरण्याची किमान पात्रता तरी मिळवू शकतील का, हा पुढच्या काळात समाजशास्त्रज्ञांपुढचा सर्वांत मोठा प्रश्न असेल.

भाऊ आठवी नापास

समाज माध्यमांचा अतिरेकी वापर कशारीतीने होऊ शकतो, हे या घटनेने अधोरेखित केलं. कुठला तरी हिंदुस्तानी भाऊ चिथावणीखोर वक्तव्य करतो आणि लाखो मुलं त्याच्या आवाहनाला प्रतिसाद देत रस्त्यावर येतात, हे काही सदृढ भावी समाजाचं लक्षण खचितच नाही. मागे देखील ईशान्येतील राज्यात काहीतरी घडलं आणि विशिष्ट समाजानं प्रतिक्रिया देत इथं धुडगूस घातला. हिंदुस्तानी भाऊनं निमित्त शोधून काढलं ते दहावी, बारावीच्या ऑफलाइन परीक्षाचं. वास्तविक, हा तथाकथित भाऊ इयत्ता आठवी नापास आहे, हे नजरेआड करून चालणार नाही.

Hindustani bhau
काळ आला होता, पण वेळ आलेली नव्हती!

कोरोनामुळे (Corona) सर्वाधिक नुकसान झालं ते शैक्षणिक क्षेत्राचं. अगदी पूर्व प्राथमिकपासून ते पदव्युत्तरपर्यंतच्या शिक्षणाची वाताहत या काळात झाली. बरं, फक्त शिक्षण क्षेत्र कोरोनानं बाधित झालं का? तर नाही. समाजातील जवळपास प्रत्येक क्षेत्राला, प्रत्येक कुटुंबाला कोरोनाचा फटका या-ना त्या निमित्तानं बसला आहे. सर्वार्थानं हा कालखंड केवळ आपल्यासाठी नाही, तर संपूर्ण जगासाठी वाईट होता. त्यामुळे शाळांचं काय होणार?, परीक्षा कशा होणार? हे अनिश्चित राहणार, हे सर्वश्रुत आहे. जस जशी परिस्थिती सुधारत जाईल, तसं तसं सगळं खुलं होत जाईल, पूर्वपदावर येईल, हेदेखील गृहित धरायला हवं. अनेक अभ्यासक्रमांच्या परीक्षा मधल्या काळात ऑनलाइन झाल्या. शालेय आणि महाविद्यालयीन मुलं ऑनलाइनच्या एवढी आहारी गेली, की काही विशिष्ट (बालिश) मुलांना आता ऑफलाइन नकोसं झालंय. अर्थात, ही बाब सरसकट सगळ्यांसाठी लागू नाही. ऑनलाइनमुळे पटकन पुढच्या वर्गात चांगल्या मार्कांनी जातं येतं, याचं ‘गणित’ काहींना अवगत झालंय, त्यामुळे ऑफलाइन अशांना नकोसं वाटतंय.

वाचन, लिखाण, चिंतन, मनन ही तर जणू आता पुराणातील वांगी ठरू पाहत आहेत. त्यात सर्वाधिक अडचण होतेय ती म्हणजे लिखाणाची. तीन तास शंभर मार्कांचा पेपर सोडवायचा कसा? या विचाराने ही मुलं गर्भगळीत झाली आहेत. त्यावर मार्ग काढून लिखाणाचा वेळ वाढवून देण्याचंही ठरलं. शिवाय प्रत्येक विषयाचा प्रश्नसंच उपलब्ध करून दिला जाणार आहे. त्यामुळे एवढं केल्यानंतर पेपर सोडवायला काहीही हरकत नसावी. पण अडचण आहे, ती म्हणजे जर विषयांचं आकलनच झालेलं नाही, तर वेळ वाढवून देऊन आणि प्रश्नसंच देऊन तरी काय उपयोग?

या सगळ्या प्रकारात विद्यार्थ्यांचा सर्वस्वी दोष मानता येणार नाही. पालक आणि शिक्षकांनी ही बाब आधीच हेरायला हवी होती. मुलांची अभ्यासाची गोडी कमी होत असेल, ऑनलाइन अभ्यास उपयोगी पडत नसेल, तर अभ्यासात रस टिकवून ठेवण्यासाठी काय करायला हवं? याचा विचार आधीच व्हायला हवा होता. काही कल्पक शिक्षकांनी, शाळांनी हे उपाय योजले आहेत, हेदेखील नमूद करायला हवं. सगळ्यांनीच हा विचार वेळेपूर्वी केला असता, तर कदाचित हिंदुस्तानी भाऊचा आज वाढलेला उन्माद वाढला नसता, त्याच्या आवाहनाला असा बालिश प्रतिसाद या पिढीनं दिला नसता.

Hindustani bhau
‘आजच्या विद्यार्थी-चळवळी म्हणजे पक्षांच्या शाखा’

गेल्या दोन वर्षांत झालेलं शैक्षणिक नुकसान विद्यार्थ्यांनी शिक्षक आणि पालकांच्या मदतीनं भरून काढायला हवं. त्यासाठी अतिरिक्त श्रम घेण्याची तयारी ठेवायला हवी. उशिरा धावणाऱ्या गाड्या जशा वेळ भरून काढतात, तसाच वेळ या पिढीला भरून काढावा लागणार आहे. अन्यथा विद्यार्थ्यांचं केवळ शालेय अभ्यासक्रमात नाही, तर आयुष्याच्या अभ्यासक्रमात मोठं नुकसान होईल. काही नामांकित खासगी क्लासेसमध्ये प्रवेश घेतेवेळी दहावीला गेल्या वर्षी ६० टक्के मिळालेल्या काही विद्यार्थ्यांना २० टक्के फीमध्ये प्रवेश मिळाला, तर ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण असलेल्यांना पूर्ण फी भरण्याची वेळ आली. हे उदाहरण स्पष्ट करतं, की गुण नव्हे तर गुणवत्ता महत्त्वाची ठरते, आणि मेहनतीला पर्याय नाही. यशासाठी शॉर्टकट शोधणाऱ्या या पिढीला पुन्हा यशाच्या खऱ्या मार्गावर आणण्याचं काम जाणत्या लोकांना पुढच्या काळात करावं लागणार आहे, एवढं मात्र निश्चित...!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com