esakal | मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…
sakal

बोलून बातमी शोधा

Bharati Pawar, Heena Gawit, Narendra Modi

मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

sakal_logo
By
डॉ. राहुल रनाळकर

मोदी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारात डॉ. भारती पवार यांनी स्थान पटकावून आपण डॉ. हीना गावित यांच्यापेक्षा सरस असल्याचं दाखवून दिलं. वास्तविक, ही स्पर्धा लावण्याचं तसं काही कारण नाही. पण, लोकांच्या दृष्टीने आणि राजकारणाचा विचार करता ही तुलना होणारच. दोन्ही आदिवासी बहुल क्षेत्राचं प्रतिनिधित्व करणाऱ्या खासदार आहेत. दोन्हींमध्ये बरंच साम्य आहे. या दोन्ही तरुण खासदार आहेत. शिवाय दोन्ही डॉक्टर आहेत. डॉ. भारती आणि डॉ. हीना यांना मोठा राजकीय वारसा आहे. (स्व.) ए. टी. पवार हे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते. ए. टी. पवार यांच्या कार्याची चर्चा आजही कळवण, सुरगाणा परिसरात होत असते, एवढं काम त्यांनी करून ठेवलंय. एटींचे पुत्र नितीन पवार विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार म्हणून वारसा चालवत आहेत. मूळच्या राष्ट्रवादीच्या या कुटुंबातील सून असलेल्या डॉ. भारती यांनी भाजपत प्रवेश करून खासदारकी मिळविली. आता त्या केंद्रात मंत्री झाल्या. डॉ. हीना गावित यांनाही वडिलांकडून राजकीय वारसा मिळाला. मूळचे राष्ट्रवादीचे असलेले डॉ. विजय गावित सध्या भाजपवासी आहेत. डॉ. हीना यादेखील भाजपच्या तिकिटावर खासदार बनल्या. त्यांनादेखील मंत्रिमंडळ विस्तारात मंत्रिपदाची आस होती.नंदुरबार जिल्हा हा काँग्रेसचा बालेकिल्ला आणि इंदिरा गांधी यांचाही आवडता जिल्हा. काँग्रेसच्या देशव्यापी प्रचाराची सुरवात नंदुरबारपासून व्हायची. त्यामुळे काँग्रेसचं नंदुरबारवर विशेष प्रेम. पंतप्रधान नरेंद्र मोदी मात्र हे चित्र बदलू पाहत आहेत. काँग्रेससाठी नंदुरबार महत्त्वाचं असेल, तर भाजपसाठी आता दिंडोरी, नाशिक महत्त्वाचं असल्याचं गेल्या काही निर्णयांतून प्रकर्षानं दिसून आलं. नाशिक जिल्हा झपाट्याने देशाच्या नकाशावर पुढे येत आहे. सुरत-चेन्नई ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे हे त्याचंच उदाहरण मानावं लागेल. जेव्हा हा ग्रीन फिल्ड-वे तयार होईल, तेव्हा नाशिकसाठी मुंबई, पुणे, धुळे यांच्यापेक्षाही सुरत अधिक जवळ येईल. हा महामार्ग बहुतांश दिंडोरीतून जाणार आहे. समृद्धी महामार्ग नाशिकमधून जात आहे. नाशिक शहरात पहिली टायरबेस मेट्रो येऊ घातली आहे. नाशिक-पुणे रेल्वेने जोडले जाईल. नाशिकची उर्वरित देशाशी एअर कनेक्टिव्हिटी अधिक बळकट होतेय. या सगळ्या पार्श्वभूमीवर नाशिकची केंद्रीय मंत्रिमंडळात निवड भाजपच्या पुढील मनसुब्यांची साक्ष देणारे आहे.


आदिवासी समाजासाठी मंत्रिपद देताना ते जर नाशिकशी जोडलेलं असेल तर भाजपसाठी ही दुहेरी फायद्याची गोष्ट म्हणावी लागेल. राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आलेल्यांना मानाचं पान देऊन राष्ट्रवादीत आजवर दुर्लक्षित राहिलेल्या नेत्यांसाठी देखील हा एक संदेश मानला जात आहे. नाशिक महापालिका आणि जिल्हा परिषद यांच्या निवडणुका पुढील वर्षी फेब्रुवारीत होत आहेत. भारती पवार यांना जिल्हा परिषदेचीही पार्श्वभूमी आहे. तर नाशिक महापालिकेत भाजपची सत्ता आहे. काहीही करून सत्ता टिकविण्याचे आव्हान भाजपपुढे आहे. भारती पवार यांच्या रूपाने दिंडोरी, नाशिकला मंत्रिपद लाभलंय. त्यामुळे केंद्राच्या माध्यमातून नाशिकसाठी ठोस विकासकामांचं नियोजन आगामी काळात नक्कीच होऊ शकेल. किंबहुना भाजपच्या माध्यमातून ते करण्यावर अधिक भर असेल. या निवडीमागील आणखी एक महत्त्वाचा संदेश म्हणजे गावित कुटुंबाला देवेंद्र फडणवीस आणि उत्तर महाराष्ट्रातील नेते गिरीश महाजन यांचं मन जिंकणं शक्य झालं नाही, जे डॉ. पवार यांनी साधलं. अर्थात, यापुढच्या काळात डॉ. भारती पवार या देशाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री झाल्याने उत्तर महाराष्ट्रातील आणि एकूणच देशातील आदिवासी समाजाला त्यांच्याकडून मोठ्या अपेक्षा असतील, यात शंकाच नाही.

loading image