esakal | रेमेडेसिव्हिर आणि बरंच काही...
sakal

बोलून बातमी शोधा

remedesivir Injection

रेमडेसिव्हिर आणि बरंच काही…

sakal_logo
By
डॉ.राहुल रनाळकर

सध्या सर्वत्र ऐकू येणारी नावं म्हणजे रेमडेसिव्हिर, ऑक्सिजन, बेड्स, व्हेंटिलेटर, ॲडमिशन वगैरे वगैरे. या नावांमध्ये सर्वाधिक चर्चेतील आणि मागणी असलेलं नाव म्हणजे रेमडेसिव्हिर… या इंजेक्शनमुळे अनेकांचे प्राण वाचत आहेत, तर अनेकांना प्राण गमवावेही लागत असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील काही तज्ज्ञांचं म्हणणं आहे. खरंच जर रेमडेसिव्हिर रुग्णांसाठी जीवनदान ठरलं असतं, तर यूके, यूएसने हे इंजेक्शन का नाकारलं… हा प्रश्‍न अनुत्तरितच आहे.

रेमडेसिव्हिरबाबत अनेक व्हिडिओ, क्लीप्स, उपयोग आणि खासकरून दुष्परिणाम समाजमाध्यमांवर विपुल प्रमाणात उपलब्ध आहेत. या इंजेक्शनचा अजिबात उपयोग होत नाही, असं सांगणारेही तज्ज्ञ आहेत. पण, काहीही असलं तरी संपूर्ण उत्तर महाराष्ट्रात रेमडेसिव्हिर इंजेक्शनच्या मागे धावणाऱ्या जनतेला पाहून अतीव दुःख होतं. अगदी गल्लीबोळातील काही तथाकथित डॉक्टर सरसकट रेमडेसिव्हिर घेऊन या, असं कोविड रुग्णांच्या नातेवाइकांना सांगत आहेत. त्यामुळे खानदेशातील तिन्ही जिल्ह्यांतून नागरिकांचे जथेच्या जथे रेमडेसिव्हिरच्या शोधार्थ नाशिकमध्ये डेरेदाखल होत आहेत. या इंजेक्शनसाठी रुग्णांच्या नातेवाइकांनी उत्स्फूर्त आंदोलनही केलं. त्यानंतर नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हा प्रशासनाने नियंत्रितरीत्या इंजेक्शनचं वितरण सुरू केलं. नाशिक महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी थेट रेमडेसिव्हिर उत्पादक कंपनीकडे ऑनलाइन पेमेंट जमा करून २० हजार इंजेक्शन बुक करून त्याची पहिली खेप मिळविली. जळगावचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत, धुळ्याचे जिल्हाधिकारी संजय यादव आणि नंदुरबारचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भारूड हे इंजेक्शन गरजू रुग्णांपर्यंत पोचविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. हे स्तुत्य प्रयत्न आहेत. तथापि, बाधित होणाऱ्या रुग्णांची संख्या आणि उपलब्ध असलेल्या इंजेक्शनची संख्या यांची काहीकेल्या सांगड बसत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कोरोनाबाधितांसह मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने चिंतेत भर पडत आहे. मात्र दुसरीकडे रेमडेसिव्हिरच्या फारसं मागे न लागता कोविड रुग्णांवर काही डॉक्टर समर्थपणे उपचार करत आहेत, या डॉक्टरांची संख्याही मोठी आहे. कोरोनाच्या काळात हिंमत सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. कुणीतरी म्हटलंच आहे, ‘हिम्मते मर्दा तो मदते खुदा...’ फार भीतीच्या अधीन झालात, हात-पाय गाळून बसलेल्या व्यक्ती आणि कुटुंबांवर संकटाची छाया अधिक गडद होत आहे. त्यामुळे या संकटाशी धीराने मुकाबला करायला हवा. उपचार करणाऱ्या डॉक्टरवर विश्‍वास ठेवून पुढे गेल्याशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही. त्यामुळे डॉक्टर आणि त्यांच्या टीमशी उत्तम संवाद साधत उपचारांद्वारे हे संकट नक्कीच दूर होऊ शकते. या सगळ्यांमध्ये संचारबंदीचे नियम पाळून शासनाला पर्यायाने आपल्या स्वतःला मदत केल्याशिवाय अन्य मार्ग नाही. संचारबंदीबाबत उलटसुलट चर्चा करून किंवा कोणीही नियम पाळत नाही. हे सांगत नियमांची पायमल्ली करणारे अनेक लोक दिसून येतात. कोणी नियम पाळावे अथवा पाळू नये, मी नियम पाळणार हा निश्‍चय सुज्ञ नागरिकांनी केला, तर त्यामुळे कुटुंब वाचण्यास मदत होणार आहे.

कोरोना संक्रमणाच्या काळात सगळी व्यवस्था तोकडी पडत असल्याची चिन्हं दिसू लागली आहेत. अनेक ठिकाणी परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं विदारक चित्र आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत आणि यंदाच्या परिस्थितीत अजून एक मूलभूत फरक दिसून येत आहे, तो म्हणजे स्वयंसेवी संस्थांचा. गेल्या वर्षी ज्या प्रमाणात समाजातील विविध स्वयंसेवी संस्था कोरोना रुग्णांना दिलासा देण्यासाठी सक्रिय होत्या, त्याच्या दोन-पाच टक्केही संस्था यंदा सक्रिय नाहीत. ही स्थिती नेमकी कशामुळे निर्माण झाली, याचा शोध समाजात सक्रिय असलेल्या विविध स्तरांवरील ज्येष्ठांनी आणि या संस्थांना पाठबळ देणाऱ्या व्यक्तींनी घ्यायला हवा. आताच्या काळात तर स्वयंसेवी व्यक्ती आणि संस्थांची खूप मोठी गरज आहे. समाजासाठी, गरजू जनतेसाठी धावून जाण्यासाठी यासारखी अन्य दुसरी वेळ असू शकत नाही. अजय बोरस्ते यांच्या नेतत्वाखालील बालगणेश मंडळासारख्या काही छोट्या संस्था सक्रिय असल्याचे दिसते, पण विविध समाजांच्या आणि अन्य एनजीओ दुसऱ्या लाटेत जणू गायब झाल्या आहेत, त्यांनी आता समाजासाठी मैदानात उतरण्याची वेळ आली आहे. महापौर सतीश कुलकर्णी योग-प्राणायाम आणि योग क्रियांच्या प्रचार-प्रसारचं काम करत आहेत, तेदेखील स्तुत्य आहे. आता गरज आहे, ती म्हणजे राजकारणविरहित समाजासाठी काम करण्याची आणि सर्व संबंधित सरकारी यंत्रणांनी आणि समाजासाठी झटणाऱ्या अन्य संस्थांनी समन्वय साधून गरजूंना उपचार मिळण्यासाठी धडपडण्याची, कारण प्रत्येक जीव महत्त्वाचा आहे.