डॉक्टरांची पुढची पिढी अन् संकटांचा डोंगर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

doctors

डॉक्टरांची पुढची पिढी अन् संकटांचा डोंगर

कोविड (Covid) काळानंतर सर्वांत महत्त्वाचं जीवनावश्यक क्षेत्र म्हणून वैद्यक क्षेत्रावर शिक्कामोर्तब झालं. जीवन वाचणं, हे सगळ्यात महत्त्वाचं असल्याची जाणीव अधिक प्रबळ बनली. त्यामुळे आता सर्वार्थानं पुढची अनेक दशक वैदयकीय क्षेत्र आणि आरोग्य हाच जगभरात प्राधान्यक्रमांमध्ये क्रमांक एकवर राहणार आहे. कोविड काळात आणि त्यानंतर आरोग्य क्षेत्रासमोर जशा संधी आहेत, तशी आव्हाने देखील मोठी आहेत. त्यातील प्रमुख आव्हान म्हणजे डॉक्टरांची सक्षम, सशक्त आणि गुणवान पिढी टिकवणे हे असेल. 

अगदी आत्ताआत्तापर्यंत डॉक्टरांची मुलं डॉक्टर, वकीलांची मुलं वकील, अभियंत्यांची मुलं अभियंते असा प्रघात होता, किंबहुना अजूनही आहे. पण यात एक महत्त्वाची साखळी तुटू पाहतेय, ती म्हणजे डॉक्टरांची. डॉक्टर मंडळींची मुलं पुढच्या काळात या व्यवसायाकडे वळण्यासाठी फारशी उत्सुक राहिलेली नाहीत. विशेष म्हणजे डॉक्टर्स देखील त्यांच्या मुलांना वैद्यकीय व्यवसायाकडे न वळण्याचा सल्ला देवू लागले आहेत. अगदी ठाशीव स्वरुपात हे दृश्य नसलं तरी डॉक्टरांच्या घरांमध्ये हा सध्या चर्चेचा आणि विचार मंथनाचा विषय आहे. या दिशेने होत असलेल्या मंथनात काही प्रमुख मुद्दे आहेत, जे विचार करण्याजोगे आहेत.

दीर्घ कालावधीचे अभ्यासक्रम या वैद्यक क्षेत्रासमोरचा कळीचा मुद्दा आहे. वैद्यकीय शाखेला प्रवेश घेतल्यानंतर स्पेशॅलिटी करुन बाहेर पडेपर्यंत सुमारे १२ तर काहीवेळा १४ वर्षांचा कालावधी उलटतो. एवढ्या काळात एखादा तज्ज्ञ वकील, अभियंत्याची थेट प्रॅक्टीस सुरु होऊन किमान ४-५ वर्षांचा कालावधी लोटलेला असतो. शिवाय ऐन तारुण्यातील एवढी वर्षे शिक्षणात घालवल्यानंतर प्रत्यक्ष प्रॅक्टीस सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची गरज भासते. आई-वडीलांनी बांधलेली हॉस्पिटल्स सगळ्यांकडे असण्याची शक्यता सर्वांबाबत शक्य नाही. त्यामुळे मोठाली कर्ज काढून हॉस्पिटल उभारणं एक दुसरं मोठं दिव्य डॉक्टर मंडळींचं सुरु होतं. त्यात खूप शक्ती, पैसा आणि श्रम खर्ची पडतं.

एवढं मार्गक्रमण केल्यानंतर अजून एका मोठ्या सामाजिक प्रश्नाला तोंड देणं उरतंच. ते म्हणजे डॉक्टरांवर होणारे हल्ले. कोण-कुठे-कधी एखादी व्यक्ती, संस्था, संघटना डॉक्टरांना टार्गेट करेल, हे सांगता येत नाही. यासाठी अत्यंत क्षुल्लक कारणही पुरेसं ठरतं. बरं सारासार विचार वैगरे अशा गोष्टी इथे लागू होत नाहीत. अशा घटना घडल्यास पुरेसं पोलीस दलाचं संरक्षण किंवा कायद्याची सक्षमपणे मदत डॉक्टर मंडळींना उपलब्ध होत नाही. अनेक वर्षे अभ्यास करुन, तारुण्य पणाला लावून, गुंतवणूक करुन व्यवसायात प्रवेश केलेल्यांना या सामाजिक संकटांचा मुकाबला करणं अत्यंत जिकीरीचं होऊन बसतं. सध्या कार्यरत असलेल्या सीनिअर डॉक्टर्सना देखील या प्रश्नानं सतावून सोडलं आहे. सेवा क्षेत्रात असूनही जर अशा प्रसंगांना सामोरं जावं लागत असेल, तर आपली पुढची पिढी या व्यवसायात नको, अशा भूमिकेप्रद काही डॉक्टर्स येत आहेत. त्यापेक्षा तुलनेने अधिक मानमरातब आणि पॅकेज अन्य क्षेत्रात कमी कालावधीत मिळत असेल, तर वैदयक क्षेत्रापासून दूर राहिलेलंच बरं, अशी मानसिकता वैद्यकीय व्यावसायिकांच्या कुटुंबांची होत आहे. आपल्या खंडप्राय देशात जर डॉक्टर्सना सन्मानाची यथोचित वागणूक मिळाली नाही, तर वाघ जसे नामशेष होत आहेत, तसे चांगले डॉक्टरही पुढच्या काळात नामशेष झाले, तर आश्चर्य वाटायला नको...