बिबट्याने गावाकडे धाव घेतली..! पळा... पळा... पळा..!!

treecutting
treecutting

कदाचित लेखाचे शीर्षक वाचून कुठंतरी लिहिताना गडबड झाली की काय, असं वाटलंही असेल; कारण आपल्यावर लहानपणापासून "डोंगराला आग लागली पळा, पळा, पळा' असंच बिंबवलेलं आहे. पण कधी कोणी "डोंगराला आग लागली विझवा, विझवा, विझवा' असं म्हणलंच नाही. आम्ही कायम पळतंच राहिलो. मुळात प्रश्न डोंगराचा नाही, डोंगरावर असलेल्या झाडांचा आहे. आग डोंगराला नाही तर त्या डोंगरावर असलेल्या झाडांना लागलेली आहे, हे आम्हाला सांगितलंच गेलं नाही. मग त्यात आणखीन एक भला मोठा प्रश्न डोळ्यासमोर उभा ठाकतो, की मग ही आग कोणी लावली? आपण तर नाही बाबा? हो ना? 

संत तुकाराम महाराज आपल्या ओवीतून म्हणतात, "वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे', इंदिरा संत म्हणतात, "जरि वेधिले चासून दूर जाण्यासाठी, या वृक्षांची मजला सांगत'. माणूस हा असा प्राणी आहे, की आजच्या धावपळीच्या जगात वास्तव्य करत असताना त्याला हवापालटासाठी, या धकाधकीच्या जीवनातून शांतता मिळवण्यासाठी तो निसर्गाच्या सान्निध्यात जाऊन त्या निसर्गासोबत तो स्वत:ला एकरूप करतोच करतो, पण अशाच उपकारकर्त्या वृक्षांचा बेसुमारपणे ऱ्हासही त्याच्याच हातून होत आहे, हे ही तो याची देही याची डोळा पाहात आहे. पण कृतीत त्याच्या हातून काहीच होत नाही. 

माणसाने बेसुमारपणे जंगलतोड करून त्याची नापीक वाळवंटे बनवली आहेत. इथे एक म्हण आठवते After man the desert (पाऊल नि वाळवंटाची चाहूल). तसे पाहता आपल्या पूर्वजांनी वृक्षांना खूप महत्त्व दिले आहे. तुळस, वड, पिंपळ, उंबर यांची मनोभावे पूजाही केली आहे. तुळस, बेल, दुर्वा, धोतरा या व अन्य अशा वनस्पतींना देवतांच्या पूजेला वाहून त्यांना देवतांचे स्थान दिले आहे. वने, वनस्पती हे आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. ती एखाद्या खनिज संपत्तीसारखे विस्कळित होणारे धन नाही. 

आज पृथ्वीची अवस्था वृक्षतोडीच्या भडिमाराने दिवसेंदिवस बिकट होत चाललेली दिसत आहे. ऑक्‍सिजनचे प्रमाण समतोल राखणे कठीण झाले आहे. आपल्या आजोबा - पणजोबांच्या काळात पृथ्वीचा सुमारे 60 टक्के भाग वनांनी व्यापलेला होता. आता बापाच्या लेकराच्या काळात पृथ्वीचा केवळ 21 टक्के भागातच वने आहेत. निसर्गाच्या साखळीत इतकी गुंतागुंतीची चक्रे आहेत, की माणसाला ती चक्रे निर्माण करणे तर सोडाच, पण ती चक्रे मोडली तर दुरुस्त करणेही जमण्यासारखे नाही. म्हणून प्रचंड प्रमाणात वाढलेल्या वृक्षतोडीमुळे एक दिवस ही पृथ्वी रसातळाला जाईल, अशी भीती निर्माण झाली आहे. 

आज जंगलतोडीचे दुष्परिणाम निर्माण झाले आहेत. बेसुमार जंगलतोडीमुळे प्राणीही बेघर झाले आहेत आणि ते मानवी वस्त्यांमध्ये आसरा शोधत आहेत. त्यामुळे आज अनेक ठिकाणी मानवी वस्त्यांत बिबट्या घुसल्याच्या घटना नेहमीच घडत आहेत. आज फक्त एक - दोन बिबट्यांच्या भीतीमुळे माणूस भीतीच्या सावटाखाली राहून जगतो आहे; पण तो हा विचार करत नाही, की त्या बिबट्यांना बेघर कोणी केलं? आज फक्त मानवी वस्त्यांकडे धाव घेणारा बिबट्या असा एकच प्राणी आपल्याला दिसत आहे. असे असंख्य प्रमाणात जीव-जंतू व प्राणी झाडा-झुडपांमध्ये आपले आयुष्य निरागसपणे जगत आहेत. त्यांना वृक्षांच्या सान्निध्यात राहू द्यात. जर अशीच वृक्षतोड चालू राहिली तर मग विचार करा, त्या असंख्य जीव-जंतू व प्राण्यांनी आपल्या गावाकडे धाव घेतली तर...? 

चला, मनामध्ये झाड लावूया ! 

- नितीन कदम, 
माढा, (स्वयंसेवक, इन्स्पायर फाउंडेशन इंडिया, माढा) 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com