'संस्थाचालक उमेदवार नकोच!' कोकण शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांची मानसिकता elections Konkan teacher constituency director candidate! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

election voter

MLC Election: 'संस्थाचालक उमेदवार नकोच!' कोकण शिक्षक मतदारसंघातील शिक्षकांची मानसिकता

"कोकण शिक्षक मतदारसंघातील बहुतांश शिक्षकांची मानसिकता ही यावेळी संस्थाचालक उमेदवार आम्हाला नकोच, अशी बनली आहे. दडपशाही आणि गुंडगिरी करणारी लोक मैदानात असल्याने त्यावर कोणी उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्या मनातील ती खदखद आणि त्यातून निर्माण झालेल्या मानसिकतेचा अद्यापही संस्थाचालक उमेदवारांना अंदाज आलेला दिसत नाही"

कोकण शिक्षक मतदार संघात 30 जानेवारी रोजी मतदान होत असून यावेळी पहिल्यांदाच विविध राजकीय पक्षांनी प्रचारासाठी प्रचंड मोठ्या प्रमाणात जोर लावल्याचे चित्र पहायला मिळाले. मात्र, मतदार शिक्षक आणि त्यांच्या नेमक्या भावना काय आहेत, याचा अंदाज मात्र, राजकीय पक्ष आणि त्यांनी उभे केलेल्या उमेदवारांना अखेरच्या टप्प्यापर्यंत येऊ शकला नाही.

जुन्या पेन्शन योजनेच्या नावाने सगळ्याच पक्ष संघटनांनी गळा काढला असला तरी त्याहीपेक्षा शिक्षण क्षेत्रामध्ये निर्माण झालेल्या भ्रष्टाचार गैरकारभाराचा खूप मोठा प्रश्न शिक्षक मतदारांना सतावत आहे. त्यांना साध्या कामासाठी पैसे मोजून अधिकाऱ्यांकडे हेलपाटे घालण्याची वेळ येऊन ठेपली आहे.

राज्यातील शिक्षण क्षेत्र आणि त्यातील पावित्र्य हे काही मूठभर संस्थाचालक आणि प्रशासनातील अधिकारी या जोडगोळीने नेस्तनाबूत करून सोडले आहे. संस्थाचालक प्रशासन आणि अधिकारी स्तरावरील भ्रष्टाचारामुळे एकूणच शिक्षक आणि राज्यातील सरकारी आणि अनुदानित शिक्षणव्यवस्था संकटात सापडली असून त्याकडे एकाही पक्ष संघटनाने आणि त्यांच्या उमेदवारानी लक्ष दिलेले दिसत नाही.

शिवाय जे उमेदवार रिंगणात आहेत, त्यातील काही अपवाद वगळता एकही शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणता येणार नाहीत. ते मूळचे धंदेवाईक संस्थाचालक आहेत. त्यांना केवळ आमदराकी हवीय. काही मंडळी तर शिक्षकी पेशाला काळीमा फासून गडगंज संपत्ती कमवून संस्थाचालक बनलेली आहे. आणि कोकण शिक्षक मतदार संघात अशीच सर्वाधिक संस्थाचालक मंडळी मैदानात आहेत. ही सर्व बाब कोकणातील बहुतांश सुजाण शिक्षक मतदार ओळखून आहेत.

सरकारी शाळांचे वेतन, जमिनी लाटून अनेक प्रकारच्या सवलती घेऊन शिक्षकांच्या बोकांडीवर बसलेले संस्थाचालकच जर शिक्षक आमदार बनले तर आपल्या प्रश्नाचे काय होते, याचा अंदाज राज्यातील आणि कोकणातील सुजाण शिक्षक मतदाराला आला असल्याने ती आपली भूमिका नीट बजावतील असे वाटते.

शिवाय दगडापेक्षा विट मऊ असा पर्याय ही ते निवडतील. त्यामुळे लाखो रुपयांचे आमिष, गटबाजी, दबावतंत्र विविध तंत्राचा वापर कितीही झाला तरी त्याचा खूप परिणाम होईल, असे वाटत नाही.

कोकण शिक्षक मतदार संघातील सुजाण शिक्षक मतदारांनी मागील ३० वर्षात केवळ शिक्षक आणि त्यांच्या प्रश्नाची जाण असलेल्या शिक्षकांनाच विधान परिषदेत पाठवण्याचा एक पायंडा निर्माण केला होता. तो मागील काळात झालेल्या 'दगाबाजी'मुळे तो खंडित झाला.

यामुळे पुन्हा आपल्यावर ती वेळ येऊ नये यासाठी कोकण शिक्षक मतदारसंघातील बहुतांश शिक्षकांची मानसिकता ही यावेळी संस्थाचालक उमेदवार आम्हाला नकोच, अशी बनली आहे. दडपशाही आणि गुंडगिरी करणारी लोक मैदानात असल्याने त्यावर कोणी उघडपणे बोलत नसले तरी त्यांच्या मनातील ती खदखद आणि त्या मानसिकतेचा अद्यापही संस्थाचालक उमेदवारांना अंदाज आलेला दिसत नाही.

मागील निवडणुकीमध्ये शिक्षकांचे दैवत म्हणून ज्यांची ओळख होती त्या स्वर्गीय रामनाथ मोते यांचा पराभव करणारी काही मंडळी यावेळी त्यांच्या नावाचा वापर करत असल्याने ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड या जिल्ह्यामध्ये मोते यांना मानणाऱ्या शिक्षकांमध्ये एक रोष आहे.

ज्यांना विधानपरिषदेमध्ये जाण्यापासून रोखण्यात आले त्यांच्याच नावाचा वापर करणाऱ्यांना यावेळी धडा शिकवण्याची नामी संधी आल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे वेळोवेळी संधीसाधूपणा करत आणि गरज पडल्यास कोणत्याही पक्षाच्या वळचणीला जाणाऱ्यांची संख्या ही यावेळी वाढली असल्याचे चित्रही पाहावयास मिळते.

कोकण शिक्षक मतदार संघात मागील दोन दशकात महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचा खूप मोठा धबधबा होता. याच संघटनेकडून या मतदारसंघात वसंतराव बापट, सुरेश भालेराव आणि रामनाथ मोते आमदार ही निवडून आले होते. मोते आणि बापट हे सलग दोन वेळा म्हणजे २४ वर्षे आणि भालेराव हे एक वेळा निवडून आले होते.

मात्र, मागील निवडणुकीत संघटनेच्या अध्यक्षांनीच केलेल्या चुकांमुळे ही जागा शेकापच्या बाळाराम पाटील यांच्याकडे गेली होती. मागील दहा वर्षात ज्या शिक्षक परिषदेला रस्त्यावर आणून सोडले, त्या अध्यक्षांना परिषद सोडण्याची नामुष्की या निवडणुकीदरम्यान ओढवली. आता ते भाजप शिक्षक आघाडीचे सदस्य असल्यासारखे सर्वत्र वावरत असल्याने शिक्षक परिषदेच्या मतदारांची एक वेगळी नाराजी या निवडणुकीत समोर येऊ शकते.

यावेळी आपल्याला भाजपकडून उमेदवारी मिळेल यासाठी पत्रकबहाद्दर आणि स्वार्थासाठी कोणालाही दगाफटका करणारे उमेदवारीचे बाशिंग बांधून बसले होते. परंतु त्यांना ऐनवेळी बाजूला करून भाजपने आयात उमेदवार केला. त्याचीही खदखद मतदानाच्या दिवशी मतपेटीतून बाहेर येईल, असे काहींना वाटते.

कोकण शिक्षक मतदारसंघ हा कायमच हाडाच्या शिक्षकाला शिक्षक उमेदवार म्हणून निवडून देण्यासाठी प्रसिद्ध आहे. मागील तीस वर्षातील इतिहास लक्षात घेता या मतदारसंघाने शिक्षक पेशाशी प्रामाणिक असलेल्या आणि शिक्षकांच्या प्रश्नाची जाण ठेवून त्यासाठी आपले आयुष्य समर्पित करणाऱ्या शिक्षकांनाच शिक्षक आमदार म्हणून निवडून दिलेले आहे. यावेळी या मतदारसंघातील बहुतांश शिक्षक मतदार हा वारसा जपतील की, नाममात्र अमिषाला बळी पडून संस्थाचालक आलेल्या धनदांडग्याना निवडून आणतील हे पाहावे लागणार आहे.