राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या!

राजं, आम्हाला काय बी नग.. फकस्त त्या पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्या!

गभरात वेगवेगळ्या तारखेला अभियंता दिन (Engineer's Day) साजरा केला जातो. भारतात अभियंता दिन हा 15 सप्टेंबरला साजरा होतो. 15 सप्टेंबर हा प्रसिद्ध अभियंते आणि राजकीय व्यक्तिमत्व मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्मदिवस आहे. विश्वेश्वरय्या यांच्या कार्याची दखल घेत भारत सरकारने त्यांना 'भारत रत्न' पुरस्काराने गौरविले. तसेच, त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून त्यांचा जन्म दिन हा अभियंता दिन (Engineer's Day) म्हणून साजरा करण्याचे ठरवले. 

भदावती स्टील कारखान्याची निमिर्ती, म्हैसूर युनिव्हसिर्टीची स्थापना, कृष्णराजसागर धरणाची बांधणी, म्हैसूर बँक या अशा संस्था नि वास्तूचे ते शिल्पकार होते. आपल्या देशाला त्या काळात प्रगतीपथावर ठेवण्याचे महान कार्य त्यांनी केले. इंग्रजांची सत्ता असताना म्हैसूर राज्यातच नव्हे, तर त्यानंतर केंदीय सरकारातदेखील मोठमोठी जबाबदारीची नि महत्त्वाची पदे त्यांनी भूषविली होती. वयाच्या ९२ व्या वर्षी पाटण्याला जाऊन गंगेवर पूल बांधण्याच्या कामाची त्यांनी आखणी केली होती. कुठल्याही प्रकारचा थाटमाट न करता, ते साधेपणाने जगले. गोरगरीबांच्या हितासाठी, त्यांनी कितीतरी प्रकल्पांत स्वत:ला झोकून दिले होते. १५ सप्टेंबर १८६१ साली जन्मलेल्या या बुद्धिमान तंत्रशोधकाचे १४ एप्रिल १९६२ रोजी महानिर्वाण झाले. एका भारतीय इंजिनियरच्या गौरवार्थ हा आंतरराष्ट्रीय दिवस मानला जातो, ही किती गौरवाची बाब आहे.

सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या यांचा जन्म कर्नाटक राज्यातील म्हैसूर जिल्ह्यात एका तेलुगु कुटुंबात झाला. मोक्षगुंडम यांच्या वडिलांचे नाव श्रीनिवास शास्त्री तर आईचे नाव वेंकाचम्मा असे होते. त्यांचे वडील संस्कृत विषयाचे तज्ज्ञ होते. विश्वेश्वरय्या यांनी आपले प्रारंभिक शिक्षण आपल्या जन्मगावीच पूर्ण केले. मात्र, पुढील शिक्षणासाठी त्यांना बेंगलुरु येथील सेंट्रल काॅलेजला जावे लागले. आर्थिक टंचाईमुळे त्यांना आपल्या शिक्षणात संघर्ष करावा लागला. शिक्षणासाठी पैसे उभे करण्यासाठी विश्वैश्वरय्या यांनी खासगी शिकवणी घेणे सुरु केले. त्यातून मिळणाऱ्या आर्थिक मोबदल्यातून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले.

सर मोक्षगुंडम विश्वैश्वरय्या 1881 बीए परीक्षा प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. पुढे त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी म्हैसूर सरकारने उचलली. त्यांनी पुणे येथील सायन्स कॉलेजमधून अभियांत्रिकी विषयाचे शिक्षण पूर्ण केले. इथेही ते प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले. त्यांचे गुण आणि कौशल्य पाहून सरकारने त्यांना नाशिक येथे सहाय्यक अभियंता पदावर सेवेत दाखल करुन घेतले. स्वतंत्र्यपूर्व भारतात कृष्ण सागर धरण, भद्रावती आयरन अॅण्ड स्टील वर्क्स, म्हैसूर सैंडल ऑयल अॅण्ड सोप फॅक्ट्री, म्हैसूर विश्वविद्यालय, बँक ऑफ मैसूर अशा विविध इमारती आणि धरणं ही विश्वैश्वरय्या यांच्या कार्याची पावती ठरली. त्यांचे कार्य पाहून त्यांना कर्नाटकच्या विकासाचा भागीरत म्हणूनही ओळखले जाते.

हिरोजी इंदलकर यांचे बांधकाम कौशल्य 

हिरोजी इंदलकर हे छत्रपती शिवाजी महाराजांचे बांधकाम प्रमुख होते. त्यांनी शिवरायांच्या स्वराज्याची राजधानी रायगडचे बांधकाम अत्यंत मजबूत असे बांधले. आत्ताच्या कोणत्याही सिव्हील इंजिनिअरला लाजवेल असे बांधकाम कौशल्य त्यांच्याकडे होते. हिरोजी इंदलकर यांचे बांधकाम कौशल्य पाहून छत्रपती शिवरायांनी त्यांना अनेक किल्ल्यांच्या बांधकामाचे काम दिले. शिवराज्याभिषेकाच्या वेळेस खुद्द छत्रपती शिवाजी महाराजांनी हिरोजीस रायगडावरील इमारती, तळी, मनोरे, रस्ते, देवळे इत्यादी बांधकामे हाती दिले होते आणि त्याची जबाबदारी सोपविली होती. गड बांधण्याचे काम त्यांनी आपल्या देखरेखीखाली पूर्ण करून घेतले. त्यात त्यांनी वापी-कूप-तडाग, प्रासाद, उद्याने, राजपथ,स्तंभ, गजशाला, नरेंद्रसदन, बारा महाल अशा अनेक इमारती हिरोजींनी रायगडावर उभ्या केल्या. गड पाहिल्यावर छत्रपती शिवाजीराजे खुश झाले आणि महाराजांनी हिरोजींना विचारलं.. हिरोजी राजधानीचा गड तुम्ही बांधलात. हिरोजी तुम्ही आज काय मागाल ते आम्ही तुम्हाला खुशीन देवू. तेव्हा हिरोजी काहीच न बोलता उभे राहिले. महाराज म्हणाले, हिरोजी बोला. त्यावेळी हिरोजी इंदलकर म्हणाले, राजं आम्हाला काय बी नग, फक्त या गडावरील जगदीश्वर मंदिराच्या एका पायरीवर आमचं नाव कोरण्याची अनुमती द्यावी आणि राजांनी त्यांना एका पायरीवर नाव कोरण्याची अनुमती दिली. म्हणूनच त्यांनी पायरीवर आपले नाव कोरले आणि त्यात लिहिले की, हिरोजी इंदलकर महाराजांच्या सदैव तत्पर सेवेमध्येच असेल. त्या पायरीचा फोटोही इथे देत आहोत. हे सांगण्याचे कारण म्हणजे, इतिहासातही इंजिनिअरना किती महत्व प्राप्त होतं हे यावरुन नक्कीच स्पष्ट होतं.

आज संपूर्ण जगात झपाट्याने बदल होत आहेत. देशात अर्थव्यवस्था, शेती, उद्योग, शिक्षण आदी क्षेत्रात इंजिनिअरांनी आपले योगदान देऊन देशासह शहर, गावाचा कायापालट घडवून आणला आहे. भारताच्या प्रगतीमध्ये मोलाची कामगिरी इंजिनिअर बजावत आहेत. मीही कधीकाळी इंजिनिअर होण्याचं स्वप्न बाळगून वाटचाल सुरु केली होती आणि यात मला निश्चीत यश प्राप्त झालं आहे. आज मी सुध्दा अनेकांच्या स्वप्नातील घर घडविण्याचं काम करत आहे. यातून मलाही समाधान मिळते आणि घर मालकालाही. आज माझ्या करिअरच्या दृष्टीने मी अनेक घरं साकारली आहेत आणि साकारतोय.

-प्रवीण शेवाळे, सिव्हिल इंजिनिअर आडी (ता. निपाणी) 

आपल्या देशाच्या विकासात मॅकॅनिकल इंजिनिअरचे देखील मोठे योगदान आहे. भारताच्या इंडस्ट्रीयल व्यवसायात मॅकॅनिकल इंजिनिअरची भूमिका अग्रही असते. कन्स्ट्रक्शन, मशीन शाॅप, विविध गाड्यांचे पार्ट बनविणे, फॅब्रेकेशन, स्ट्रक्चर्स तयार करणे आदीत मॅकॅनिकल इंजिनिअर मोलाची भूमिका बजावत आहेत. आज भारतातील अनेक इंजिनिअर जगातील विविध भागातही आपला ठसा उमटवताना दिसत आहेत. मीही सध्या बेंगळूर (कर्नाटक) येथे कार्यात असून भारताचा विकास साधण्याचा प्रयत्न करत आहे, याचा मला नक्कीच अभिमान वाटतो.

-वैभव गुरव, मॅकॅनिकल इंजिनिअर आडी (ता. निपाणी)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com