Farmers Diwali : उसवलं गणगोत सारं... आधार कुणाचा नाही | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Farmer

Farmers Diwali : उसवलं गणगोत सारं... आधार कुणाचा नाही

दिवाळी आलीये. तुम्हीपण दिवाळीची खरेदी केलीच असेल. पोरांना फटाके घेतले असतील, नवे कपडे घेतले असतील, फराळ बनवला असेल. नाही का? काहीजण दिवाळीच्या सुट्ट्याचा आनंद घेत असतील. राजकारण्यांचा तर वेगळाच आनंद. त्यावर तर काही बोलायलाच नको. कारण त्यांचा विषय एकदम ओक्के आहे. एकमेकांविषयी आरोप करायचे, टीका करायची, आपण कसे चांगले, ते कसे वाईट सांगायचं आणि फायद्याची बाजू दिसली की एकत्र यायचं अन् युती करायची... मतदारांची किंमत शून्य. एकदम ओक्के. पण दिवाळीच्या शुभमुहूर्तावर राज्यात वेगळ्याच प्रश्नांचा गोंगाट निर्माण झालाय. पावसामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्यात, त्या पुसायला कुणीच धजावत नाहीये, सरकारकडून आश्वासने दिले जातायेत, मदत जाहीर होतीये पण प्रत्यक्ष फक्त निराशाच पदरात पडतेय.

परवा परवा एक व्हिडिओ बघण्यात आला. एक शेतकरी वावरातील पाण्यात उभा राहून गाणं गात होता.... "आमचे दैव कसे फिरले, सोयाबीन पाण्यानं गेले..." ही कविता पाहून अनेकजण त्याच्या रचनेवर हसले, पण या गोष्टीचे गांभीर्य आपल्याला एसीच्या ऑफिसात बसून कळणार नाही. त्यासाठी वावरातील बांधावर जावेच लागेल. आज नगर जिल्ह्यातील एका कांदा उत्पादक शेतकऱ्याचा व्हिडिओ बघितला. त्याची तर आख्खीच्या आख्खी कांदा चाळ पुराच्या पाण्यात वाहून गेलीय. सगळीकडे पाण्यावर फक्त कांदेच तरंगताना दिसतायेत. सोयाबीन अन् कापसाचे तर सांगूच नका. मराठवाडा, विदर्भात जवळपास सगळ्याच शेतकऱ्यांच्या सोयबीनची अन् कापसाची ही स्थितीये.

कापूस ओला झाल्यामुळे पांढऱ्या सोन्याला दिवाळीच्या तोंडावर १० रूपये प्रतीकिलोचा भाव मिळालाय. सोयाबीनचा भाव ४ हजारावर आहे, पण ओल्या सोयाबीनला तर व्यापाऱ्याकडून अर्धचंद्र दाखवला जातोय. हे फक्त सोयाबीन, कापसाचेच नाही. द्राक्षे, मोसंबी, इतर फळबागा, भाजीपाला पिके, याचीही हीच परिस्थिती. ज्या शेतकऱ्याने स्वत:च्या लेकरासारखं पिकाला जपलं, त्यावर आपली स्वप्न रंगवली, या सगळ्या आशेवर या सुलतानी नैसर्गिक संकटाने पाणी फिरवलंय. दिवाळीला सासरहून माहेरी येणाऱ्या लेकीला, पोरांना कपडे घेण्याचं स्वप्न दूरंच पण निसर्गानं भर दिवाळीत शेतकऱ्यांच्या डोळ्यांच्या कडाला पाझर फोडलाय. वसुबारसेला गायी ओवाळायच्या सोडून कित्येक कुटुंबातील गायी मृत्यूमुखी पडल्यात.

काल मुख्यमंत्र्यांनी बोलताना प्रशासनाला लवकरात लवकर पंचनामे करून तातडीने मदत देण्याचे आदेश दिलेत. तर उपमुख्यमंत्र्यांनी उपग्रहाच्या माध्यमातून थेट शेताची माहिती मिळेल आणि त्यानंतर ऑटो पायलट मोडवर मदत दिली जाणार असल्याची घोषणा फडणवीसांनी केलीय. पहिल्या अतिवष्टीच्या काळातही मदतीची घोषणा सरकारने केली होती. पण एकाही शेतकऱ्याच्या खात्यावर मदत जमा झाल्याची माहिती अद्याप समोर आली नाही. बरं एवढीच अडचण नाहीये.. खासगी विमा कंपन्यासुद्धा राजकीय नेत्यांच्या अप्रत्यक्ष आशिर्वादाने शेतकऱ्यांना लुटायला तयार असतात. कितीही नुकसान झालं तरी टाळाटाळ करणे हा विमा कंपन्यांचा "जन्मसिद्ध हक्क" बनलाय. तर आता शेतकऱ्यांनी कुणाच्या तोंडाकडं बघायचं हा प्रश्न निर्माण झालाय.

Cotton Crop Damage

Cotton Crop Damage

हे झालंच पण लम्पीनेही अनेक दिवसांपासून शेतकऱ्यांना हैराण केलंय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज्यात सत्तांतर झालं पण या रोगावर कोणतीही ठोस उपाययोजना सरकारकडून केली जात नाहीये. लसी दिल्या जातायेत पण लसी दिलेल्या जनावरांना सुद्धा परत लम्पीची लागण होतेय. हे वास्तव आहे. लागण झालेल्या जनावरांना विलिगीकरणामध्ये ठेवण्यासाठी शेतकऱ्यांकडे जागा नाहीयेत. त्यामुळे एकाची लागण दुसऱ्या जणावरांना होतेय. कित्येक गायी मरतायेत. शेतकऱ्यांकडे या गायी खड्डे खोदून पुरण्यासाठी सुद्धा पुरेसे पैसे नसल्यामुळे उघड्या माळरानावर या गायी फेकून दिल्या जातात. ज्या गायीच्या पोटात ३३ कोटी देव आहेत असं मानलं जातं त्या गायींच्या मृतदेहाचे लचके कुत्रे तोडतायेत आणि आपले राजकीय मंडळी सत्तेसाठी हिंदुत्वाच्या गप्पा मारण्यात दंग आहेत. ही परिस्थिती आहे सध्या राज्याची. हे अवघ्या शेतकऱ्यांचं दुर्दैव आहे.

हे सरकार राज्याच्या हिताचे आहे असं सर्रास सांगितलं जातंय, घोषणा होतायेत, मदत फक्त जाहीर केली जातीय, तर एकीकडे अतिवृष्टी असून सुद्धा ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नसल्याचं राज्याच्या विद्यमान कृषीमंत्र्यांकडून सांगण्यात येतंय. तर दिवाळीच्या तोंडावर प्रधानमंत्री किसान सहायता निधीतून शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी २ हजार रूपये जमा केलेत. हा अट्टहास शेतकऱ्यांची सहानुभुती मिळवण्यासाठी की नेमकं कशासाठी? कारण हा हफ्ता कधीच वेळेवर जमा झालेला नाहीये. त्यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न असाये की शेतकऱ्यांनी या २ हजारांत कोणती दिवाळी साजरी करायची?

Crop Damage

Crop Damage

एसी असलेल्या ऑफिसात बसून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लिहणं, बेडवर झोपून शेतकऱ्यांचे प्रश्न वाचणं सोप्पये. शेतकऱ्यांचं दु:ख फक्त बोलून अन् लिहून कळणार नाही तर त्यासाठी पुराच्या पाण्यामुळे उध्वस्त झालेल्या पिकात चेहऱ्यावरील दु:ख लपवून शिरायची तयारी पाहिजे.

- दत्ता लवांडे (dattalawande9696@gmail.com)