मित्रा, तू बोलायचं असतं...

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

माणसातल्या चैतन्य तत्त्वाबद्दल, जीवनाबद्दल, जीवनाच्या सौंदर्याबद्दल खूप काही वाचले आहे. ‘हे जीवन सुंदर आहे’ असं गाण्यातून ऐकत असतानाही आपल्यातीलच काहींना जीवनाचा एवढा कंटाळा का बरे यावा, हा प्रश्‍नही मनाला पडतो. समस्या, संकटे आणि माणसाचं आयुष्य हे दोन्हीही हातात हात घालून चालत असतात. जन्माच्या वेळेपासून सुरू झालेली ही संकटांची मालिका आयुष्यभर साथ देते. सुखाची सोबत काही काळाची असली तरी दुःखाच्या सोबतीचीही अनेकांना सवय लागलेली असते. संकटे आणि संघर्ष हेच खरे जगणे आहे. त्यामुळे जीवनाचा कंटाळा करायचा कशाला? लढायचं... पुढे जायचं... आणि जिंकायचं... 

आयुष्य संपविल्यानंतर सगळे प्रश्‍न सुटतात असे कधी होत नाही. प्रश्‍नांचे जाळे तसेच असते, केवळ तुम्ही त्या जाळ्यातून स्वतःची सुटका करून घेतलेली असते. प्रत्येकाला आपले दुःख मोठे वाटते. माझ्याच बाबतीत असं का घडावं, असा प्रश्‍नही ते विधात्याला नेहमी विचारत असतात. पण वास्तवात तसे काहीही नसते. जो तो ज्याच्या त्याच्या वाट्याला आलेली भूमिका निभावत असतो. पुढील प्रसंगात आपल्यासमोर काय वाढून ठेवले आहे, याची कल्पना भूतलावर वावरणाऱ्या कुठल्याही कॅरेक्टरला नाही अन् तीच खरी जीवनाची मजा आहे. एका लहानशी परी कागदावर एक रेष ओढून मला म्हणाली - काका, या रेषेला हातही न लावता तिला छोटी करून दाखवा बरं... तिला जिंकण्याचा आनंद देता यावा म्हणून मीपण विचार करू लागलो... थोड्या वेळानं ती म्हणाली - काय काका, सोप्पं आहे... असं म्हणून तिनं त्याच रेषेच्या बाजूला एक मोठी रेषा ओढली. जीवनात येणारी संकटंही अशीच असतात. पण त्यामुळे जीवनाचा अंत करायचा कशासाठी? सृष्टिचक्रात वावरणाऱ्या माणसात आणि प्राण्यात एक मूलभूत फरक आहे. तो कोणता, तर माणूस बोलू शकतो. आपल्या भावना मांडू शकतो. प्रश्‍न सांगू शकतो. मग शांत राहून, मनातल्या मनात कुढत राहण्यापेक्षा संवादाच्या माध्यमातून आपली समस्या मांडायला हवी. त्यातून नक्कीच मार्ग निघू शकतो. असाच एक किस्सा... शेतीचा हंगाम तोंडावर आलेला, पेरणीची तयारी तर करायला हवी. जवळ बैलजोडी नाही. ट्रॅक्टरने नांगरणी करावी तर तेवढे पैसेही नाहीत. मग करायचे काय, वडील आणि मुलाने स्वतःला नांगराला जुंपून घेतले आणि माऊली त्या दोघांच्या मागोमाग शेत नांगरू लागली. शेतातले हे चित्र कुणाच्या तरी कॅमेऱ्याने टिपले. पेपरात प्रसिद्ध झाले. अगदी दुसऱ्याच दिवशी या कृषिवलाच्या मदतीला अख्खा तालुकाच नव्हे, जिल्हा धावून आला. बैलजोडी मिळाली. समस्या सुटली. नांगरणीही झाली आणि अनेकांशी यानिमित्ताने ऋणानुबंध जुळले. प्रश्‍न मांडले तर कळतील. कदाचित सुटतीलही. मनातली व्यथा मांडायला आता तर खूपशी साधने हाती आलेली आहेत. मित्रा... गप्प राहू नकोस... बोल काही तरी... 
‘जन पळभर म्हणतील हाय हाय...’ ही अजरामर कविता प्रत्येकानं ऐकली असेल. माणसाच्या जाण्यानं जगरहाटी थांबत नाही. रोजचे व्यवहार तसेच कालसारखे सुरू राहतात. कुटुंबातील जाणारा माणूस निघून जातो; पण त्याच्यामागे खूप काही राहून जाते आठवणींच्या रूपाने. कुटुंबातील एखाद्याची अशी ‘एक्झिट’ उरलेल्यांसमोर प्रश्‍नांची मोठी मालिका सोडून गेलेली असते. कुटुंबाला किंवा कुटुंबीयांना तर पुढचं आयुष्य जगावंच लागतं पण ही उणीव कायमची राहून जाते. जगात सगळं काही दिसत असलं तरी आपली प्रिय व्यक्ती मात्र भिंतीवरच्या फोटोमध्ये असते, प्रत्यक्षात - वास्तवात नाही. सकाळी मुलीला शाळेत नेऊन घालणारा ‘बाबा’ आज या मुलीला कुठेच दिसत नाही. घरातील त्याची ती खुर्ची रिकामी असते. हँगरला त्याचे कपडे दिसतात, पण तो मात्र दूर कुठेतरी निघून गेलेला असतो. मूल रडायला लागले तर त्याला कडेवर भुर्र नेणारे हातही आता नसतात. कुठे मित्राच्या वाढदिवसाला बसल्याजागी केक मॅनेज करू शकणारा मित्र नसतो, तर कुठे सासऱ्यांना आवडीनं खाऊ घालणारी सून नसते. अशा एक ना अनेक दुःखद प्रसंगांतून राहिलेली माणसं काळ पुढे ढकलत असतात. जीवन जगत असतात. शेवटी एवढेच म्हणावे वाटते... 

ना होती ये परेशानीयाँ 
ना सहते दुनियाँ के गम 
सुलझ जाती मुश्‍किलें भी 
काश... 
अगर कुछ कहते 
आप और हम... 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com