वैशिष्ट्यपूर्ण मनोरंजनाचे ठिकाण : गोवा..! 

ऋत्विज चव्हाण
Wednesday, 13 January 2021

गोवन लोकांचे बोलणे, त्यांचे स्मितहास्य, सर्वांना प्रेमाने बोलून आपलेसे करणे हे मनाला खूप आल्हाददायक वाटत होते. तिथल्या लोकांनी सांगितले, की अनेक लोक ख्रिसमस व नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यामध्ये आले होते. तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. देशांतर्गत पर्यटनासाठी जी संधी मिळाली त्याचे सोने गोवा, गोव्याचे लोक, तसेच तिथल्या सरकारने करून दाखवले. मद्य विक्री जरी असली तरी पोलिस पर्यटकांना सुरक्षित वातावरण देतात. 

कोरोना महामारीमुळे टाळेबंदीची नामुष्की आपल्या सर्वांवर आली होती. सर्व पर्यटनस्थळे बंद होती. अशा परिस्थितीमध्ये गोवा राज्यही त्यास अपवाद नव्हते. टाळेबंदीपासून आजच्या दिवसापर्यंत गोव्याने पुन्हा मजल मारली आहे. अनेक लोकांना वैशिष्ट्यपूर्ण मनोरंजन करणारे गोवा राज्य पुन्हा सक्रिय झाले आहे. सहा महिने टाळेबंदीनंतर हळूहळू गोवा चालू झाले होते. अनेक गोष्टींना तोंड देत आज गोव्यामध्ये पुन्हा गर्दी पाहायला मिळाली. प्रचंड मोठी आर्थिक उलाढाल करणारे हे राज्य पर्यटनासाठी एक पर्वणीच आहे. 

टाळेबंदीनंतर थोडीशी काळजी घेत हॉटेल्स, रेस्टॉरंट व इतर गोष्टी चालू झालेल्या दिसून येतात. अनेक अडचणींना तोंड देत हॉटेल, रेस्टॉरंट तसेच पर्यटनाशी जोडलेले उद्योगधंदे पुन्हा चालू झाले आहेत. अनेक राज्यांमध्ये काही निर्बंध आहेत, त्यामुळे मनोरंजनासाठी पर्यटक गोव्याला पसंती देत आहेत. गोव्यामध्ये सुरक्षित वातावरण आहे, त्यामुळे अनेक राज्यांतून तसेच विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येथे येताना दिसतात. 

गोवा म्हटलं, की आधी आपल्या नजरेत येतात ते समुद्रकिनारे. समुद्रात पोहणे, खेळणे, आनंद घेण्यासाठी लोक उत्सुक असतात. स्वच्छ समुद्रकिनारे, पर्यटकांना सुरक्षा, मोकळे वातावरण आणि स्वच्छ हवा याचा अनोखा संगम पाहायला मिळतो. गोवा राज्य रेल्वे, विमानसेवा व रस्त्यांनी इतर राज्यांना जोडलेले आहे. तसेच अनेक देशांना जोडले गेलेले आहे. हिरवीगार झाडे, आल्हाददायक वातावरण, तेथील स्थानिकांची मृदू भाषा आणि प्रेमळ स्वभाव यामुळे लोक येथे आकर्षित होतात. 

आम्हालाही गोव्याला जायची संधी मिळाली तेव्हा आम्ही रोडने सहल करायची ठरवली. आम्ही विजयपूर, बेळगाव तसेच चोरला घाटवरून गोवा गाठले. प्रवास होता म्हणून आम्ही एक दिवस बेळगावमध्ये राहिलो. बेळगावचे सुप्रसिद्ध कुंदा घेऊन आम्ही उत्तर गोव्याकडे गेलो. गोव्यामध्ये उत्तर गोवा व दक्षिण गोवा असे दोन भाग आहेत. तरुण पिढी उत्तर गोव्यामध्ये राहण्यास पसंती देते, तर दक्षिण गोवा शांत आहे आणि अनेक सुंदर अशी स्टार हॉटेल्स तेथे आहेत. गोव्यामध्ये पोचताच सर्वांच्या खिशाला परवडेल असे हॉस्टेल, हॉटेल, होम स्टे अशा प्रकारे राहण्याची व्यवस्था आहे. स्टार हॉटेलही भरपूर आहेत. प्रत्येकाला साजेशे राहण्याची व्यवस्था असल्यामुळे अनेक प्रकारचे लोक इथे येतात. 

आम्ही पोचताच समुद्रात पोहून आनंद घेतला. गोव्याला मासे खूप छान मिळतात, त्याचाही आनंद सर्व लोक घेतात. आम्ही शाक म्हणजेच समुद्र किनाऱ्यावरील रेस्टॉरंटमध्ये छान जेवण केले. अनेक प्रकारचे समुद्रातील मासे, खेकडे व इतर पदार्थांची चव चाखली. दुसऱ्या दिवशी लवकर उठून आम्ही दुचाकी वाहन भाड्याने घेतले, योग्य ते पेट्रोल घालून आम्ही सर्व किनारे फिरलो. सुंदरसे समुद्रकिनारे, सौंदर्याने नटलेले रस्ते व अनेक ठिकाणी खायची- प्यायची व्यवस्था होती. दुसऱ्या दिवशी आम्ही समुद्रामध्ये डॉल्फिन राईड घेतली. अनेक असे समुद्री खेळ जसे की पॅराग्लायडिंग, पॅरासेलिंग, मोटर बोट, मोटर स्कूटर अशा प्रकारचे अनुभव घेतले. सर्व अनुभव विविध प्रकारचे होते आणि मनाला आनंद देणारे होते. 

रात्री आम्ही कॅसिनोला गेलो. सुरक्षित वातावरणामध्ये कॅसिनोमध्ये खेळलो व मनोरंजनाबरोबर जेवणही केले. तिसऱ्या दिवशी किनाऱ्यावर जाऊन विरंगुळा केला. पावसाच्या हलक्‍या सरी येत होत्या. रात्रीच्या वेळी आम्ही टिटोजला गेलो. मनोरंजनासाठी हे एक सुंदर ठिकाण आहे. येथे संगीतावर अनेक लोक थिरकताना दिसतात. विदेशी पर्यटक कमी असल्यामुळे पाश्‍चात्य संगीताऐवजी हिंदी संगीत खूप होते. उशिरापर्यंत एकंदरीतच वातावरणाचा आनंद घेतला व पुन्हा विश्रांती घेतली. नंतर थोडी खरेदी करून पुन्हा समुद्रकिनारी गेलो. दुचाकीवर अगवाडा किल्ला पाहिला. संध्याकाळी बोटीवर गोवन मनोरंजनाचा अनुभव मिळाला. थोडे काजू जे की प्रसिद्ध आहेत आणि ड्रायफ्रूट घेतले. तीन- चार दिवसांच्या या सहलीमध्ये अनेक ठिकाणे पाहिली व छान अनुभव घेतला. 

गोवन लोकांचे बोलणे, त्यांचे स्मितहास्य, सर्वांना प्रेमाने बोलून आपलेसे करणे हे मनाला खूप आल्हाददायक वाटत होते. तिथल्या लोकांनी सांगितले, की अनेक लोक ख्रिसमस व नववर्ष साजरे करण्यासाठी गोव्यामध्ये आले होते. तेव्हा प्रचंड गर्दी झाली होती. देशांतर्गत पर्यटनासाठी जी संधी मिळाली त्याचे सोने गोवा, गोव्याचे लोक, तसेच तिथल्या सरकारने करून दाखवले. मद्य विक्री जरी असली तरी पोलिस पर्यटकांना सुरक्षित वातावरण देतात. गोव्यातील पणजी हा भागही फिरण्यासाठी आहे. अनेक चर्च, मंदिरे व स्थळे पर्यटकांना आकर्षित करतात. सर्वगुणसंपन्न अशा गोवा या ठिकाणी जाण्यासाठी लोक सदैव उत्सुक असतात. आम्ही तो अनुभव घेतला. जड मनाने गोवा सोडले. पुन्हा परत येताना कोल्हापूर मार्गे सोलापूरला आलो. आजही तिथला अनुभव आठवत आहे. जागतिक नकाशावर पर्यटकांना साजेशे असे व वैशिष्ट्यपूर्ण मनोरंजनाचे ठिकाण गोवा हे सर्वांचेच पसंतीचे आहे. आयुष्यात कधी ना कधी गोव्याचा अनुभव घ्यावा, असे वाटते. 

- ऋत्विज चव्हाण 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या