आयुष्याचे ध्येय आणि स्पर्धा युग! 

Aim
Aim

आपले आयुष्यातील लक्ष्य, ध्येय आणि स्पर्धात्मक जीवन यामध्ये खूप फरक आहे. एके दिवशी एकदा कार रेसमध्ये जिंकलेल्या विजेत्याला प्रसारमाध्यमांनी प्रश्‍न विचारला, "तुम्ही एवढ्या कमी वेळामध्ये ही स्पर्धा कशी जिंकली?' तेव्हा तो म्हणाला, "मी माझ्याबरोबर स्पर्धा करणाऱ्या कारवर लक्ष ठेवून नव्हतो, तर माझे पूर्ण लक्ष माझ्या लक्ष्यावर, माझ्या अंतिम रेषेवर होते. ती रेषा कमीत कमी वेळामध्ये कशी पार करता येईल, हेच माझे लक्ष्य होते. हे मला माहीत नाही की माझ्याबरोबर कोण स्पर्धा करत होते; पण माझं लक्ष्य कमीत कमी वेळामध्ये अंतिम रेषा पार करण्याचे होते आणि ती मी केली, त्यामुळेच मी विजयी होऊ शकलो.' 

आज आयुष्यामध्ये स्पर्धात्मक जीवनाकडे खूप महत्त्व दिले जाते; परंतु आपल्या लक्ष्याकडे दुर्लक्ष केले जाते. जे लक्ष्य आपण आयुष्यात ठेवलेले आहे, ते आपण विसरून जातो. लोक काय म्हणतील? यावर जास्त भर दिला जातो. समाज याला आपलं करेल का, यावर जास्त भर दिला जातो. माझे मित्र काय म्हणतील? माझे नातेवाईक काय म्हणतील? हा समाज काय म्हणेल? यावर जास्त भर दिला जातो. मला माहीत आहे, प्रत्येक संस्कृती समाजप्रबोधनावर भर देते. परंतु तुमच्या लक्ष्यापासून दूर ठेवता कामा नये. तुमच्या मनात असलेले लक्ष्य, तुमचे ध्येय, तुमच्या आयुष्यातील गरज यावरच लक्ष्य ठेवायचे आहे. जर तो कारचालक स्पर्धात्मक करत बसला असता तर कदाचित तो जिंकू शकला नसता. कारण, तो दुसऱ्यांबरोबर स्पर्धा करत राहिला असता. आपले रेकॉर्ड आपणच तोडले तर त्यात नवल आहे. एखाद्याला 70 टक्के मिळतात आणि मला 75 टक्के मिळाले यावर खूश होण्याचा अर्थ नाही; कारण तुमची क्षमता 90 टक्के असू शकते. त्यामुळे लोकांच्या बरोबर स्पर्धा करण्यापेक्षा स्पर्धा स्वतःबरोबर करावी. महान बनायचं असेल तर प्रत्येक क्षण कष्ट करावे, आपल्या लक्ष्यापर्यंत पोचण्यासाठीचा प्रत्येक मार्ग हा आपल्या कष्टाने, प्रखर अभ्यासाने पूर्ण करावा. या जगात चुका भरपूर होतात. महान लोकांनीही आयुष्यात चुका केलेल्या आहेत; पण त्यातून त्यांनी शिकवण घेत, स्वतःला सुधारत नवीन पद्धतीने प्रयत्न केला आहे. त्यामुळेच त्यांनी इतिहास घडवला आहे. आयुष्यात इतिहास घडवायचा असेल तर दूरदृष्टी ठेवली पाहिजे. जिथे लोक विचार करत नाहीत तो विचार मनात आणावा आणि त्यावर काम करावे. नवीन विचारामुळे सर्व स्तरावर प्रगती होणार आहे आणि त्यातूनच नवा समाज आणि हे जग समृद्धीच्या मार्गावर जाणार आहे. त्यामुळे मनातील विचार आचरणात आणायचे प्रयत्न करावेत. असे अनेक लोक आहेत त्यांना समाजाने पहिले नाकारले आणि मग नंतर त्यांचेच गुण आज स्वीकारत आहेत. 

स्पर्धात्मक जीवनात अतिशय कष्ट करावे लागतात. अनेक लोक कष्ट करत असतात, परंतु घेतलेला निर्णय व त्यावर केलेली अंमलबजावणी, कष्ट, प्रयत्न यामुळे विजयी होता येते. आज आपण स्पर्धात्मक जीवनावर लक्ष्य ठेवून आपली चिंता वाढवत आहोत. प्रत्येकाला विविध समस्यांना समोरे जावे लागते; परंतु त्यातून बाहेर निघण्याचा मार्ग हा स्वतःला शोधावा लागतो. आपल्या ध्येयावर लक्ष ठेवले तर मार्ग आपोआप सापडत जातो. प्रयत्न, कष्ट आणि एकनिष्ठ नजर आपल्या लक्ष्यावर असली पाहिजे. महान लोकांनी कामे केली आहेत. त्या दृष्टीने स्वतःच्या लक्ष्य किंवा प्रेमापोटी केलेली आहेत. एखादी गोष्ट करायची तर त्यावर पूर्ण एकनिष्ठ लक्ष्य ठेवले पाहिजे तरच तुम्ही इतिहास बदलू शकता. 


वाघ शिकार करतो तेव्हा त्याचे पूर्ण लक्ष्य त्याच्या शिकारीवर असते. हरीण आपला जीव वाचवत पळत असतो, पण शेवटी वाघ शिकार करतो. कारण त्याचे लक्ष्य आणि एकाग्रता आणि दृढनिश्‍चय त्याला विजयी बनवते. जीवन-मरणाच्या या स्पर्धेत तोच विजयी होतो, ज्याचे लक्ष्य आणि त्यावर केलेले काम, प्रयत्न, कष्ट हे अपार असतात. पोटाची भूक, शिक्षण, नोकरी, व्यवसाय, शारीरिक आजार, आर्थिक दुर्बलता तसेच अनेक गरजा मागे पळत असतात. अशावेळी गरजांवर लक्ष देताना आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवला पाहिजे आणि त्यासाठी अपार कष्ट केले पाहिजेत. या जीवनाचा खेळ संपायच्या आधी आपण सकारात्मक जगले पाहिजे. आणि त्यासाठी पूर्ण प्रयत्न केला पाहिजे. 

स्पर्धात्मक जगात मनाची एकाग्रता, चुकांतून सुधारणे आणि नवीन मार्ग शोधणे यातूनच इतिहास घडणार आहे. आणि प्रत्येक पावलाला मिळणारा जो आनंद आहे, मनाला मिळणारे जे समाधान आहे आणि तुमचे ध्येय गाठल्यानंतरचा आनंद हा आपल्याला समाधान देऊन जाईल. त्यामुळे आयुष्याचा खेळ संपायच्या आधी आपल्या पुढे जा, स्वतःच्या पुढे जा, जगाच्या पुढे जा. प्रयत्न करावे तरच सुंदर आयुष्य बनेल, असे वाटते आहे. 

- ऋत्विज चव्हाण 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com