Guru Nanak Jayanti 2023: मनं जुळतात तेव्हा भाषा अडसर ठरत नाही, जात-धर्मापलीकडच्या मैत्रीची गोष्ट!

धुप्पड आमच्या घरात वावरायचा तसाच मीही त्याच्या घरात सदानकदा जायचो.
Guru Nanak Jayanti 2023: मनं जुळतात तेव्हा भाषा अडसर ठरत नाही, जात-धर्मापलीकडच्या मैत्रीची गोष्ट!

श्रीरामपूरला सोमैया स्कूलमध्ये आठवीनववीत शिकत असताना रविंद्र धुप्पड हा माझा अगदी जवळचा मित्र होता. आम्हा दोघांत काहीही समान धागे नसताना आम्ही दोघे इतके जवळचे मित्र कसे बनलो याचे आज या क्षणाला आठवत नाही, मात्र त्याबद्दल आश्चर्य नक्कीच वाटते.

मी आमच्या शाळेजवळ राहणारा तर धुप्पड संगमनेर रोडवर चौगुले इमारतीत दुसऱ्या मजल्यावर राहणारा. त्याच्यामुळे मी आयुष्यात पहिल्यांदा इमारतीत फ्लॅट कसा असतो हे पाहिले. पुढचे आणि मागचे असे दोन दारे असलेल्या आमच्या घरात धुप्पडचा इथून तिथे सगळीकडे वावर असायचा.

आमच्या घरातील सर्वांशी म्हणजे दादांशी, बाईशी, सगळ्या भाऊ बहिणी आणि वहिनी यांच्याशी त्याचा मराठीत चांगला संवाद असायचा. आमच्या स्वयंपाकघरात लाकडी भूशाच्या शेगडीवरच्या पातेल्यांत काय शिजते आहे याचीही त्याला पूर्ण कल्पना असायची, पण त्यामुळे आमच्या संबंधात त्यामुळे काही बाधा आली नाही.

माझा सर्वांत थोरला भाऊ फ्रान्सिस धुप्पडला त्याच्या घरच्या नावाने किले म्हणूनच हाक मारायचा. शाळेतल्या इतर मित्रांप्रमाणे आम्ही मात्र त्याला त्याच्या आडनावाने हाक मारायचो.

धुप्पड आमच्या घरात वावरायचा तसाच मीही त्याच्या घरात सदानकदा जायचो. आपला स्वतःचा एक छोटासा कारखाना असलेले त्याचे पगडीधारी वडील माझ्यासमोर आपल्या दाढीचे केस कंगव्याने विंचरायचे आणि डोईवरचे लांब केस नीटपणे बांधून त्यावर पगडी घालायचे तेव्हा मी त्यांच्याकडे पाहात राहायचो.

त्यांच्या वरच्या मजल्यावर राहणारे धूप्पडच्या आत्याचे पती आणि त्यांची मुले मात्र केशधारी नव्हते. त्याबाबत धुप्पडने काहीतरी स्पष्टीकरण दिले होते ते आता नेमके आठवत नाही.

तोपर्यंत धुप्पडचा पगडी घालण्याचा धार्मिक विधी पार पडला नव्हता त्यामुळे तो आपल्या केसांच्या बुचड्यावर रुमालासारखे एक कापड बांधायचा. धुप्पडच्या अपरोक्ष त्याच्या लांब केसांवरून घरात कुणी काहीही टिपण्णी केली की मी जाम चिडायचो.

रविंद्रसिंग धुप्पड आणि माझी इतकी दोस्ती होती तरी त्याच्याबरोबर एकदाही रेल्वे पुलापलिकडे असलेल्या गुरुद्वारात जाण्याचा एकदाही प्रसंग आला नाही याचे मला आज आश्चर्य आणि खेदसुद्धा वाटतो.

धुप्पडइतकी आणि त्याच्यानंतर एकही शीख व्यक्ती माझ्या इतक्या जवळकीच्या नात्यात आली नाही. आतापर्यंत एकदाही मी गुरुद्वारात प्रवेश केलेला नाही. माझ्या ओळखीचे अनेकजण अमृतसर येथे सुवर्ण मंदिरात गेले तेव्हा पहिल्यांदा एखाद्या गुरुद्वारात गेले होते. खूप काही ऐकलेल्या लंगारचा एकदाही आस्वाद घेतलेला नाही.

इतर धर्मीय लोक शेजारी किंवा सहकारी असले तरच त्यांच्या लग्न वा इतर सुखदुःखाच्या समारंभात हजेरी लावता येते, अन्यथा इतरधर्मीय लोकांविषयी आपल्याला काहीही माहिती नसते. यासंदर्भात हे एक उदाहरण.

दर आठवड्यातून एकदा तरी धूप्पडची आई मला ताकाने भरलेले एक मोठे भांडे माझ्या घरी घेऊन जाण्यासाठी द्यायची. लोणी काढून झाल्यावर बाकी राहिलेले ताक विकायचे नसते अशी त्यावेळी प्रथा होती. आजही ताक पिताना मला धुप्पडची आठवण येतेच.

काही दिवसानंतर धुप्पड आणि त्याच्या काकांनी रेल्वे पुलापलिकडे असलेल्या सिंधी कॉलनीत समोरासमोर दोन दुमजली मोठ्या इमारती बांधल्या आणि ती दोन्ही कुटुंबे मग तिकडेच राहायला गेली. एकदोनदा मी त्याच्या त्या प्रशस्त घरात गेल्याचे आठवते. त्यानंतर धुप्पडचा आणि माझा संपर्क कमी होत गेला. गोव्यात फादर होण्यासाठी मी गेलो तसा श्रीरामपूरशी माझा संपर्क वर्षांतून एकदा कुटुंबीयांना भेटण्यापुरता राहिला. एकदोनदा धुप्पडला त्याच्या नेवासा रोडवरच्या कारखान्यात भेटल्याचे आठवते.

माझ्या थोरल्या भावाची मार्शलआप्पाची शिवसेनातील संबंधामुळे पुरती वाताहत झाली. त्याला आर्थिक दृष्ट्या सावरण्यासाठी मग धुप्पडने त्याला आपल्या कारखान्यात नोकरी दिली होती. पण मार्शलआप्पा तिथे फार दिवस टिकला नाही. खूप वर्षे झालीत, रविंद्रसिंग धुप्पड आणि माझा संपर्क राहिलेला नाही..

खुशवंत सिंग हे माझे आवडते पत्रकार आणि लेखक. त्यांच्यामुळे शीख समाजाच्या अंतरंगात थोडेफार डोकावता आले. विथ मलाईस टूवर्ड्स वन अँड ऑल या त्यांच्या लोकप्रिय सिंडीकटेड. साप्ताहिक सदर एकेकाळी तुफान लोकप्रिय होते.

आज सकाळी गुरु नानक जयंतीमुळे मित्रांबरोबर बोलताना शीख समाजाचा विषय निघाला आणि या आठवणी जागी झाल्या.

गुरू नानक जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा....

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com