ते दोघे...

rishi kapoor irrfan khan
rishi kapoor irrfan khan

ऋषी कपूर आणि इरफान खान. दोन अत्यंत वेगळी माणसं. त्यांची सामाजिक, आर्थिक पार्श्वभुमी वेगळी. एकाला परंपरेने सिनेमासृष्टीचा समृद्ध वारसा लाभलेला तर दुसऱ्याचा वारसा त्याच्याबरोबरच सुरु झालेला. एक चाॅकलेट हिरो, दुसरा रुढार्थाने हिरो म्हणता येण्यातला नाहीच.  तरुणपणात मिळतील त्या भुमिका केल्या. हिरो म्हणता येईल अशा भुमिका तर आत्ता आत्ता मिळू लागल्या होत्या. पहिला चाॅकलेट बाॅय. पण आयुष्याच्या उत्तरार्धात सहनायक, खलनायक आणि चरित्र भुमिकाही साकारणारा... 

पण, हे दोघेही अतिशय वेगवेगळे असले तरी दोघेही अतिशय उत्तम अभिनेते होते हा  होता त्यांना जोडणारा समान धागा. 
आणि,  हे दोन उत्तम अभिनेते एकामागून एक जाणे, तेही कर्करोगानेच... हा एक अतिशय वाईट योग. 

इरफान.  या माणसाला सर्वात आधी  कोणत्या तरी समांतर सिनेमात पाहिलं होतं. पण तो जाणवला तो सलाम मुंबई मध्ये. इतरांना पत्र लिहून देणारा एक मुलगा होता तो त्यात. चाय पाव आणि सोला साल ही त्या सिनेमातली मुख्य कॅरेक्टर. पण हाफ पॅन्ट घातलेला किशोरवयीन इरफान लक्षात राहिला. 

नंतरही अनेक सिनेमातून तो भेटत राहिला. पण त्या त्या भुमिकात तो इतका मिसळून जायचा की त्यातला इरफान वेगळा काढूच शकता येत नव्हता. हल्ली हल्ली त्याच्या वेगळ्या संवादशैलीमुळे तो त्याच्या भुमिकांमधून इरफान म्हणून जाणवायला लागला होता. पण तरीही त्याची परकाया प्रवेशामधली सहजता त्या विशिष्ठ कॅरेक्टरला उंचीवर घेऊन जायचीच. 
 रोग नावाच्या चित्रपटातला त्याचा इन्पेक्टर आणि तलवार मधला तपास अधिकारी वेगवेगळा वाटतो तो त्यामुळेच.  पिकू चित्रपटातील ट्रॅव्हल्सचा व्यवसाय करणारा तरुण आपली वेगळी स्वभाववैशिष्ठ घेऊन येतो. अमिताभ सारखा महानायक आणि दिपीकासारखी गोड अभिनेत्री असतानाही त्याचे सटल विनोद त्याने मस्तच पोहचवले होते.

पानसिंग तोमरमध्ये खेळाडू ते डाकू असा मोठा प्रवास दाखवणंही सहज सोपं केलं होतं त्याने.  लंचबॉक्समधला नोकरी करून थकलेला आणि बिटविन द लाईन बोलणारा एक ख्रिश्चन गृहस्थही असाच लोभस होता.  नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा अर्थात NSD मधून तो अभिनय शिकला होता. पण मेथड अॅक्टरमध्ये तो एकसाची होण्याचा धोका असतो. विशिष्ठ प्रसंगात त्यांचं सादरीकरण कसं असेल हे आधीच सांगता येतं. पण इरफानच तसं नाही झालं. त्यातली उत्फुर्तता कायम जाणवत राहीली. अर्थात तो त्याच्या अभिनयशैलीचाही भाग असू शकतो.

ऋषी कपूर ने मात्र अभिनयाचं कोणतही शिक्षण घेतलं नव्हतं. तशी गरजही नव्हती म्हणा. त्याचे पिताश्री राज कपूर हेच विद्यापीठ होेते. त्यांच्याकडे तो शिकत होताच. असिस्टंट डायरेक्टर म्हणून. अगदी हिरो म्हणून काम करायला लागल्यावरही त्याची असिस्टंट डायरेक्टर म्हणून उमेदवारी सुरु राहिली होती. त्या काळात म्हणे कुणाचंही काहीही चुकलं सेटवर की राजजी डाफरायचे ते ऋषीवरच. पण असे टक्के टोपणे खाऊनच तो शिकत राहिला. 

पण या शिकण्यातून जे समोर आलं ते ग्रेट होतं. राज कपूरनी त्यांच्या काळात सहज सोप्या अभिनयाची वाट दाखवली होती. ऋषी नीे ती आणखी प्रशस्त केली.  संवाद असताना त्याचा चेहराही बोलेच पण सहकलाकारांच्या बोलण्यालाही त्याचा प्रतिसाद सहज सोपा असे. त्याची एक्स्प्रेशन्स पडद्यावरची असूनही नेहमीच्या जगातली वाटत असतं. या सहजतेमुळेच  की काय त्याला अभिनयसम्राट वैगरे कुणी कधी म्हटलं नाही. पण कोणताही आक्रस्ताळेपणा न करताही डोळ्यातून पाणी कसं काढता येतं ते त्याने चांदनीमध्ये दाखवलंच.  

चाॅकलेटबाॅय म्हणून तरुणपणात तो टेचात राहिला. तो काळ मागे गेल्यावर सहनायकाच्या भुमिकेतही सहजतेने शिरला. चांदनीमध्ये विनोद खन्नासोबत तोडीस तोड वावरला. (अर्थात त्या सिनेमाची `हिरो ` श्रीदेवी होती!) सागरमध्येही कमल हसनची भुमिका भाव खाऊन जाणारी होती. पण तिथेही त्याने त्याच्या कॅरेक्टरला प्रेक्षकांची सहानुभूती मिळवून दिली. दामिनीमध्ये तर त्याच्या भुमिकेला ग्रे शेड होती. आपल्या बायकोच्या, मिनाक्षी शेषाद्रीच्या विरोधात उभा रहाणारा नवरा होता तो. तिची बाजू बरोबर आहे हे माहित असूनही. पण त्यातली त्याची तगमग त्याने अशी दाखवली की ढाई किलोच्या हातवाल्या सनी देओलसमोरही त्याचा बावन्नकशी अभिनय झळाळून निघाला.  

कधी कधी त्याची लिगसी त्याच्यावर अन्यायकारक ठरायची. त्याने सहज सुंदर अभिनय करणं यात फार वेगळं कुणाला वाटत नसेल कदाचित. कारण तो कपुर खानदा पुत्तर होता.  Son of a famous father, father of a famous son  असं त्याने त्याच्या सोशल मिडियावर लिहिलं होतं.  कुणाला त्यात त्याचं पिता पुत्र प्रेम दिसलं तर कुणाला त्यातून जाणवली त्याची वेदना.

पण तो मुहफट होता. त्याच फटकळपणा त्याच्या ट्विटमधून आणि त्याच्या एकूण वावरण्यातूनही जाणवला असेल त्याच्या सोबत असणाऱ्यांना. पण त्याच्या पडद्यावरच्या अवतारातून मात्र त्याचं अभिनेता म्हणून बहरणं जाणवत होतं. पाच पाच तास मेकअप करून साकारलेलं कपूर अॅण्ड सन्स मधलं कॅरेक्टर. 

अग्नीपथमधला रौफ लाला, स्टुडंट आॅफ द इयरमधला गे प्रिन्सिपल या भुमिका वेगवेगळ्या होत्या. त्यातून जाणवत होतं ते त्याची अभिनेता म्हणून भूक.   

ॠषी कपूरना चांगली गाणी मिळाली. अनेक सिनेमात त्याच्या हातात कोणते ना कोणते वाद्य होतेच. पण त्याच्या हातातले वाद्य शोभेचे नाही राहिले. इतर अभिनेत्यांसारखे मागे व्हायोलिन वाजत असताना हे मात्र तो आवाज त्यांच्याच गिटारमधून निघतोय असं दाखवत त्याच्या तारा खाजवण्यात मग्न असतात. 

ऋषीबाबत ते कधीच झालं नाही. त्याने प्रत्येक वाद्य आॅथेंटिकपणे वाजवलंय. मग ते गिटार असो, व्हायोलीन असो की डफली.  त्यासाठी त्याने घरचा अभ्यासही केलेला असे... कर्ज मध्ये तो व्हायोलिन वाजवणं खरंखरं वाटावं यासाठी त्यांनी व्हायोलीन वाजवताना पहाण्याचा अभ्यास केला होता. सागरमधलं ते गाणं आहे ना चेहरा है या चांद खिला है... त्यातला सुरुवातीचा पीस जो आहे तो संगीतकार प्यारेलाल यांच्या धाकट्या भावाने (गोरख शर्मा) वाजवला होता. त्या रेकाॅर्डिंगला ऋषी हजर होता. त्यामुळे त्या गाण्याच्या सुरुवातीला त्याने पडद्यावर वाजवलेली गिटार खूपच सुरात वाजते...! 

ऋषी हा देखणा, चाॅकलेटी हिरो. आहेरे वर्गाचा प्रतिनिधी. तर इरफान अर्थातच नाहीरे वर्गाचा. या दोघांनीही काळानुसार स्वतःत बदल केले, करत गेले. त्यामुळेच वेगवेगळ्या भुमिकांत ते सिनेमात दिसत राहिले. ऋषी पारंपारिक पद्धतीचा, बाॅय मिटस् गर्ल वाला हिरो तर इरफानला नव्या काळातला, समांतर हिरो. नाहीतर इरफानसारख्या चेहऱ्याच्या व्यक्तीला पुर्वी हिरो बनण्याची स्वप्न पहाण्याचाही नव्हता. पण आज नवाजउद्दीनही आपला हिरो ठरू शकतो.  ही बदलत्या सिनेमाची आणि प्रेक्षकांच्या बदललेल्या संवेदनांची खूण म्हणता येईल. अशा संवेदनशील रसिकांमुळेच आज समांतर सिनेमा मुख्य प्रवाहात येऊ शकला आहे. 

या दोन उत्तम अभिनेत्यांच्या जग सोडून जाण्यामध्ये  केवळ एक दिवसाचं अंतर असलं तरी या दोन नायकांमध्ये एका किमान एका पिढीचं अंतर होतंच. एक मागे पडलेल्या काळाचा प्रतिनिधी तर दुसरा बदलत्या मन्वतरांचा मशालजी. त्याने दाखवलेल्या प्रकाशातच नवाजउद्दीन सारखे चेहरे हिरो म्हणून पुढे येऊ लागले आहेत. 

या दोन वेगवेगळ्या काळाचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या कलाकारांचं जाणं चटका लाऊन जाणारच सच्च्या रसिकाला. कारण त्यांच्या कलास्वादाचा एक एक कालखंड या दोघांनी अविस्मरणीय करून ठेवलाय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com