कोरोना'सह' आणि कोरोना'नंतर'चे आपण

Aurangabad News
Aurangabad News

आता आजपासून आपला तिसरा लॉक डाऊन चालू होतोय. पहिला टप्पा लॉकडाऊन म्हणजे नक्की काय हे समजून घेण्यातच गेला. त्यात आपण वेग वेगळ्या पाककृती केल्या, तर कोणी घरकामात मदत केली. त्याचे फोटो फेसबुकला पोस्ट केले. त्याच दरम्यान माननीय पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे टाळ्या वाजवून या करोनायोध्यांचे आभार मानले, तर नंतर दिवे लावून आपली एकात्मता दाखवून दिली. 

कुठेतरी असे पण वाटत होते, की हे संपले पाहिजे लवकर; पण ते झाले नाही. मग आपण याकडे सकारात्मकतेने पहायला लागलो आणि बाकी सगळे, म्हणजे घरातली कामे, पाककृती यासोबत आपण आपल्या व्यवसायाला पूरक वेबिनार अटेंड केले, कोणी स्वतःच्या ज्ञानात भर पडेल, म्हणून काही ऑनलाईन कोर्स केले, कोणी फेसबुक लाईव्ह करून करमणूक केली. एव्हाना आपल्याला पेशंटची संख्या, ग्रीन झोन, रेड झोन, ऑरेंज झोन हे सगळे कळायला लागले. आणि  शासनाने तिसरा लॉक डाऊन घोषित करण्याआधीच आपण तो स्वीकारला होता. मी तर म्हणत आहे अधिक तर लोकांना हा लॉक डाऊन होणे किती गरजेचे आहे, याचा अंदाज आला होता आणि सगळे मनाने तयार पण झालो आहोत.

आता बाकी वेबिनार, सेमिनार, फेसबुक लाईव्ह, भांडीकुंडी घासतानाचे फोटो सेल्फी याचा कंटाळा आलाय; आणि आपण काही गोष्टी स्वीकारल्या आहेत आणि त्यानुसार आपले दैनंदिन काम चालू केले आहे. काय काय स्वीकारले आहे? तर आपण मुलांचे ऑनलाईन क्लास/शिक्षण स्वीकारले, मोबाईलमध्ये न्यूज पेपर वाचायला शिकलो, हायजीन कसे असते ते शिकलो, मी तर म्हणेन हात नक्की कसा धुवायचा, ते पण शिकलो. याआधी किती जणांना २० सेकंद आणि किती स्टेपमध्ये हात धुवायचे असते हे तरी माहिती तरी होते का? मला तरी नव्हते.

एकंदर या लॉकडाऊनमुळे आपल्यात आमूलाग्र बदल झालाय आणि तो  आपण स्वीकारला आहे.

आता उद्यापासून आपला तिसरा आणि निर्णायक लॉकडाऊन  सुरू होत आहे.

पण हे असे घरात कोंडून घेवून किती दिवस राहणार? लस येईल तेव्हा येईल. आता आपला व्यवसाय चालू झाला पाहिजे. नोकरीसाठी आता बाहेर जाता आले पाहिजे, असे सगळ्यांनाच वाटू लागले आहे. एकंदर काय, तर या करोनासोबत आपल्याला कसे जगायचे आहे, हे या तिसऱ्या लॉकडाऊन मध्ये शिकायचे आहे. माझ्या मते आता आपल्याला काही गोष्टी स्वीकाराव्या आणि अंगीकाराव्या लागतील.

त्यात प्रामुख्याने मास्कचा वापर अनिवार्य करावा लागेल. हे जपानमध्ये आधीपासून आहे. तिथे कायम मास्क वापरणारी आणि इन्फेक्शनपासून इतरांचा बचाव झाला पाहिजे, याची काळजी घेणाऱ्यांची संख्या भरपूर आहे तेच आपल्याला येथेही काटेकोरपणे पाळावे लागेल.

दोन माणसांमध्ये अंतर ठेवून वागणे (अर्थात शारीरिक अंतर). आता हे पण पाळावे लागेल. अनावश्यक गर्दी टाळावी लागेल. लग्नकार्य, उत्सवाला वेगळे स्वरूप येईल. कोणी लग्नाला किंवा एखाद्या समारंभाला आले नाही, तर कोणाला राग लोभ येणार नाही. ऑफिसमध्ये सुद्धा दोन डेस्कमधील अंतर बदलेल, बसमध्ये, रेल्वेमध्ये एकमेकाला रेटून होणारी गर्दी आपण कमी करू.

सॅनिटायझर हा आपल्या जीवनाचा अविभाज्य घटक बनला आहे. प्रत्येक गोष्टीला हात लावल्यावर हात सॅनिटाईझ करावे लागतील. मी परवा एकाकडून ऑस्ट्रेलियामध्ये ऑफिसमध्ये वर्क डेस्क कसा असतो ते ऐकले, ते आपल्यालाही स्वीकारावे लागेल. ऑफिसमध्ये आल्यावर डेस्कवर एक सॅनिटायझर ठेवलेले असते. त्याने आधी हात धुवून घ्यावे लागतात, मग बाजूला वेट वाईप्स असतात, त्याने पूर्ण डेस्क आपण पुसून घ्यायचा. अगदी कीबोर्ड, माऊस, लॅपटॉपची स्क्रीन बाकी जे काही डेस्कवर असेल ते साफ करून काम चालू करायचे. तिथेच छोटी डस्टबीन असते. त्यात ते वाईप्स टाकायचे. किती प्रसन्न वाटत असेल ना काम करायला? बरं त्या डेस्कवर बसून जेवण चहा-नाश्ता असे काहीही करायची परवानगी नसते. त्यासाठी वेगळी जागा असते. ही गोष्ट आपल्याला स्वीकारावी लागेल. त्यानुसार भविष्यात तरतूद करावी लागेल.

अनावश्यक प्रवास टाळणे हा पण एक मोठा बदल असणार आहे. अनेक कंपन्यांची कामे घरी बसून विनासायास होऊ शकतात. हे या लॉकडाऊनमुळे लक्षात आले आहे. यामुळे इंधन, ट्रॅफिक आणि कंपनीचे बरेचसे ओव्हरहेडस कमी झाले आहेत. बऱ्याच कंपन्या हेच कल्चर स्विकारण्याची शक्यता नाकारता येत नाही. याची पण आपल्याला सवय करावी लागेल.

फिटनेसची संकल्पनाही बदलली आहे. एकाने सांगितले, की माझ्या घराचे मुख्य दारापासून घराच्या दुसऱ्या टोकापर्यंतचे अंतर साधारण 25 मीटर आहे. तिथे मी रोज ऐंशी फेऱ्या मारतो, तर माझे चार किलोमीटर चालून होते. अशा प्रकारे रोज सकाळी उठून जॉगिंग पार्कमधील किंवा रस्त्यावर होणाऱ्या गर्दीला पण पर्याय मिळाला ना? आपण अशा प्रकारेही फिटनेसकडे लक्ष देऊ शकतो. माझी एक मावशी तर सांगत होती, मी रोजच्यासारखे शूज वगैरे घालून घरातच वॉक करते.

जेवणाच्या बाबतीतही पौष्टिक जेवणाकडे आपला कल वाढला आहे. बाहेरचे, उघड्यावरचे खाणे पूर्णतः बंद झाले आहे. घरच्या घरीच चांगले चांगले पदार्थ आपण खात आहोत. फिटनेसकडे लक्ष देत आहोत. सॅनिटायझेशन आपण काटेकोरपणे पाळत आहोत. परिणामी छोट्या मोठ्या (कसं तरी होतेय सारखे) आजाराचे प्रमाण कमी झाले आहे. डॉक्टरकडील (करोनाशिवाय) पेशंटची कमी झालेली संख्या हे तेच दाखवून देत आहे.

अशा अनेक गोष्टींची मानसिक तयारी आपल्याला या तिसऱ्या लॉक डाऊनमध्ये करायची आहे आणि हे स्वीकारावे लागणार आहे. 

एकंदर काय तर कोरोनासहित आपल्याला जगायला शिकणे गरजेचे आहे. लस येईल, आपल्या शास्त्रज्ञांना त्यात यश येईल, तोपर्यंत आपण हे स्वीकारून काम चालू केले तर बंद पडलेले अर्थचक्र पुन्हा चालू होईल. एकंदर काय तर कोरोना आता आपल्याला तूर्तास स्वीकारावा लागेल.

तुम्हाला अजून काही सुचते आहे? नक्की सांगा, या निमित्ताने आपण सोबत मिळून कोरोनासह सुरक्षित जगण्याची नवीन नियमावली तयार करू या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com