मन हरलं तर तुम्ही जिंकू शकत नाहीत...!

- ऋत्विज चव्हाण, सोलापूर
शुक्रवार, 26 जून 2020

तुमचं मन जर हरलेलं असेल तर तुम्ही या जगात जिंकू शकत नाही. प्रथम पराभव हा मनातच होतो आणि मग या जीवनाची वाट चुकते. आजचा तरुण अतिशय संवेदनशील आहे. हार त्याला सहन होत नाही आणि जिंकायची ताकद नसल्याने आणि प्रयत्न कमी पडत असल्याने टोकाच्या भूमिकेवर जावे लागत आहे. 

एका दुपारी वाचन करत असताना अचानक एक बातमी ऐकली. एका प्रसिद्ध अभिनेत्याने आत्महत्या केली होती. झगमगत्या दुनियेचा एक तारा पडद्याआड गेला होता. मन सुन्न झाले, मनात अनेक प्रश्‍न उभे राहिले, त्याने असे का केले असावे? काय कारण आहे ? इतका प्रसिद्ध असताना टोकाचे पाऊल का घेतले असे नानाविध प्रश्‍न डोक्‍यात चालू होते, प्रश्‍नांनी गर्दी केली. 

आज माणूस अत्यंत तणावाखाली आहे. आज जर तुम्हाला काही करायचं असेल तर तणाव मुक्ती हा एकुलता एक पर्याय आहे. अत्यंत स्पर्धात्मक जीवन जगणारा माणूस आज तणाव नावाने ग्रस्त आहे. त्याचेच एक उदाहरण आपल्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. पैसा, गाडी, घर, बॅंकेत पैसा, प्रॉपर्टी, चकाचक रोशन दुनिया हे सर्व खालीच राहून जाणार आहे. राहणार आहे तो फक्त अंधारच. आपली जीवन ज्योत विझायच्या आधी जीवन जगणे शिकले पाहिजे. जीवनाचा प्रत्येक धडा, प्रत्येक पान नीट वाचले पाहिजे, त्याचा अभ्यास केला पाहिजे, यात आपण कमी पडत आहोत असे लक्षात येईल. 

गरज कितपत आहे हे जाणून घेणे अत्यंत आवश्‍यक आहे. काही लोक गरजांच्या पुढे जाऊन जीवन जगायचा प्रयत्न करतात आणि याचाच मानवी मनाला ताण होतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद मिळवायला शिकला पाहिजे. आपण विसरून जातो की आनंद मनात आहे. सर्व जग एकीकडे आणि आपले मन एकीकडे. हीच परिस्थिती आहे, अशावेळी स्पर्धात्मक जीवन जगण्यापेक्षा थोडा आनंदात क्षण घालवावे असेल, असे वाटते. 

आज बातमी एकताच मन सुन्न झाले. मनात थोडा अंधार झाला. विचारांनी काळोख गाठला. माझा कोणी नसताना त्याची एक्‍झिट चटका लावणारी होती. कुणाबरोबरही घडू शकते, कारण काहीही असू शकतं, याचा सर्वांवरच दूरगामी परिणाम झालेला दिसतोय. तुम्ही तुमचं मन जर हरलेलं असेल तर तुम्ही या जगात जिंकू शकत नाही. प्रथम पराभव हा मनातच होतो आणि मग या जीवनाची वाट चुकते. आजचा तरुण अतिशय संवेदनशील आहे. हार त्याला सहन होत नाही आणि जिंकायची ताकद नसल्याने आणि प्रयत्न कमी पडत असल्याने टोकाच्या भूमिकेवर जावे लागत आहे. 

व्यसनाधीन माणूस सुद्धा याला अपवाद नाही. व्यसनही माणसाला खात आहे. कुठली गोष्ट किती मर्यादेपर्यंत करायची याचा विचार प्रत्येकाने केला पाहिजे. आज तणावपासून मुक्त होण्यासाठी संगीत ऐकावे, आवडता छंद जोपासावा, प्राणीमात्रांवर दया करावी, समाजातील सकारात्मक गोष्टींवर लक्ष ठेवावे, तणावमुक्तीचे सर्व पर्याय खुले ठेवावेत. लहान लहान गोष्टी मजा करायला शिकावे, टीव्ही बघावा, नकारात्मक गोष्टींपासून लांब राहावे, असे अनेक पर्याय आहेत. योगा करावा, त्यामुळे मानसिक स्वास्थ्य चांगले राहते. अशा अनेक गोष्टी केल्याने मन सकारात्मक राहते. युवकांनी मोठ्यांचे मार्गदर्शन घ्यावे आणि लहानांना मदत करावी. तसेच थोरांनी, मोठ्यांनी लहानांना सांभाळून घ्यावे, तर सामाजिक व मानसिक स्वास्थ राहील आणि त्यांना मुक्त होईल. 

सर्वात महत्त्वाचं म्हणजे कुठलीच अपेक्षा करू नये, अपेक्षाभंग झाल्यावर जो ताण येतो तो घातक ठरू शकतो, या जगात अपेक्षा करणे घातक ठरू शकते. अपेक्षा करण्यापेक्षा प्रयत्न व भर द्यावा तरच तुमच्या आयुष्यातले ध्येय गाठता येईल. अंधारातून उजेडाकडे जाताना एक दिवा लावत जावा. लहान दिव्यापासूनच प्रकाश निर्माण होणार आहे. त्यामुळे अंधाराला न घाबरता आपल्या प्रयत्नांना आपल्यातील ऊर्जेला प्रोत्साहन द्यावे तरच एक सुंदर आयुष्य जगू शकतो. 

आयुष्य हे पाठ्यपुस्तकासारखे आहे, रोज एक पान वाचले तरी चालेल. कोणते वाचनाचा आनंद, त्यातून मिळालेला अनुभव, हे जीवन बदलू शकतो. रोज एक पान उलटत जावे, आयुष्य असेच आहे. मागचे पान अनुभव घेऊन जाते आणि आपल्या ज्ञानात आणि आपल्या मनात नवीन उमेद आणते. सध्याच्या तणावपूर्ण जीवनामध्ये पैशाची कमतरता, रोगराई, जीवनातील उतार-चढाव, येणारे दुःख यातून मार्ग काढतच आपणास पुढे जायचं आहे. प्रत्येकाने जाणले पाहिजे आयुष्य हे संघर्षमय असणारच आहे. प्रत्येक गोष्टीचा संघर्ष करायला जी मजा आहे. तो संघर्ष तुम्हाला आयुष्यात आनंद देईल. संघर्षातून आयुष्य समृद्ध होईल, प्रत्येक क्षण, प्रत्येक काळ हा विचारून येत नाही, पण सुखदुःखाच्या खेळामध्ये प्रकाशाचा एक किरण सुद्धा महत्त्वाचा ठरतो. जसे अंधारात दिवा लावला की भीती, काळजी हे सगळं निघून जाते आणि येतो तो उत्साह आणि एक नवीन उमेद. अशा जीवनात जीवन प्रवासात आपल्याला चालायचा आहे. अंधारातून वाट काढत आपले ध्येय गाठायचे आहे. कुठल्याही प्रकारे टोकाची भूमिका न घेण्याचा पण करायचा आहे तरच एक समृद्ध समाज निर्माण होईल. 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या