Blog : मला आणखी 86 वर्षं गायचं आहे! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मला आणखी 86 वर्षं गायचं आहे!
मला आणखी 86 वर्षं गायचं आहे!

मला आणखी 86 वर्षं गायचं आहे!

काय तो उत्साह, काय तो जोश, काय ते दिसणं, काय ती उमेद !!... 'मला सतत कामात गुंतून घ्यायला आवडतं. एक क्षणदेखील मी शांत बसत नाही. गाणं, पेंटिंग, काही नवीन पदार्थ करत राहीन... काहीच काम नाही सुचलं तर कपाट आवरायला घेते... पण सतत कामात राहायला आवडतं...' उषाताई सांगत होत्या.. हो. उषा मंगेशकर !

येत्या 15 डिसेंबरला वयाची 86 वर्षे त्या पूर्ण करतायत... 14 नोव्हेंबरला लातूरच्या कार्यक्रमात मला त्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली... माझ्यासाठी तो सुवर्णक्षण होता... समृद्ध करणारा क्षण होता! उषाताई भरभरून बोलत होत्या. मनापासून बोलत होत्या. त्यांच्या गाण्याचा प्रवास... चित्रकलेचा प्रवास. पाककला... भटकंती... शॉपिंग... त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे असे कितीतरी पैलू उलगडत होते... मुलाखतीनंतर "शिवरंजनी'सोबत दीड तास गाणी गात होत्या... भक्तिगीते तरी होतीच पण एकापेक्षा एक सरस लावण्यांची बरसात होती... "माळ्याच्या मळ्यामंदी कोण गं उभी पासून म्यानातून उसळे तलवारीची पात'पर्यंत... काय गं सखू पासून ने मजसी ने परत मातृभूमीला पर्यंत...!

सोलापूरच्या "शिवरंजनी'च्या वादक आणि गायकांसाठी ही अपूर्व पर्वणी होती. लातूरला निघण्यापूर्वी सोलापुरात एक दिवस प्रॅक्‍टिस झाली. उषाताईंनी आपल्या अत्यंत अनौपाचारिक वागण्या- बोलण्यातून आमचं दडपण कुठल्या कुठे पळवून लावलं... त्यामुळेच लातूरचा बहारदार परफॉर्मन्स देता आला... समीर रणदिवे, उन्मेष शहाणे, विश्वास शाईवाले, उमेश मोहोळकर या "शिवरंजनी'च्या पिलर्सनी अफाट मेहनत घेतली. उमेश मोहोळकर, समीर रणदिवे, अविनाश इनामदार, सन्मित रणदिवे, समित येवलेकर, करण भोसले या वादकांनी दमदार साथसंगत केली. उन्मेष, विश्वास, सुहास सदाफुले, निखिल भालेराव, वीणा बादरायणी, अपूर्वा शहाणे या गायकांनी बहार आणली. सोबत खुमासदार निवेदन आणि प्रकट मुलाखत माधव देशपांडे यांचे तर हार्मोनियमवर नरेंद्र चिपळूणकर, सहगायिका नेहा चिपळूणकर, वादक आणि गायक राजेंद्र साळुंखे यांची साथ मोलाची होती.

उषाताईंसोबत दिलखुलास गप्पा आणि गाण्यांची ही मेजवानी म्हणजे लातूरकर रसिकांसाठी दिवाळीनंतरची दिवाळी होती... एकुणात, उषाताई मंगेशकर यांच्या दिव्य सहवासातील ती एक अविस्मरणीय संध्याकाळ होती !

- माधव देशपांडे, सोलापूर

loading image
go to top