खूप गर्दी आहे... 

Its too crowded
Its too crowded

अनेक अनोळखी चेहरे. दाटीवाटी चोहिकडे. दिसेल तिकडे फक्त गर्दीच. बोलतात काही चेहरे. आपल्यालाही व्यक्त व्हावंच लागतं. मावळत जातो असाच दिवस. या गर्दीचा कंटाळा येऊनही काय उपयोग? त्यातील एक असतो आपणही. ही गर्दीच पाठलाग करत असते... दिवस मावळतो.. घरोघरी टीव्ही लागलेले असतात. तिथंही गर्दीच. चित्र, ध्वनी, वेग, भावना, व्यापाराची. अर्ध्यापाऊण तासाची हुकमी करामत. दिवसभराच्या गर्दीतून नव्या गोंधळातील अगतिक विश्रांती (?) आणि अशाच रात्री एखाद्या खोलीत, कुणीतरी शांतपणे समोरच्या पुस्तकात दंग झालेलं. तो किंवा ती. कुणीही. 

गर्दीतून बाहेर पडण्याचे मार्ग असतात... काही सरधोपट- हाताशी असतात; तर काही शोधावे लागतात. या खोलीतल्या पुस्तकप्रेमीनं त्याचा मार्ग शोधला. हा मार्ग केवळ करमणुकीचा नव्हे, तर चिंतनाच्या खोल तळ्यापर्यंत जाणारा. त्याची स्वतःची शोधयात्रा. 

त्याच्या किंवा तिच्या हातात प्रवासवर्णन आहे. दोनशे पानांचं! न पाहिलेल्या देशाचं वर्णन. प्रवास नव्हे फक्त. घटना नव्हेत फक्त. तर वाटचाल जिवंत करणारी पानं- देशाच्या सीमा बदलतात. माणसांचे स्वभाव नाहीत. जगभर भाषा अनेक असतात; पण डोळ्यांतील भावना- सुखदुःखे, संघर्ष एकसारखेच! 

प्रत्येक जण गर्दीत हरवलेला असतोच, तोही स्वतःचा शोध घेत असतोच. हे सांगणारं प्रवासवर्णन! डोळ्यांसमोर अक्षरे असतात, पण मन त्या देशात पोचतं. रंगबिरंगी निसर्ग, वस्त्रांचे पोत, तिथली झाडं, वाहनं, अगम्य भाषेतील चर्चा, भव्य इमारती या साऱ्या डोळ्यांसमोर येतात... पाहिलेल्या निसर्गापेक्षा वेगळं अप्रुप केवळ शब्दांतून समजतं. 

प्रवासवर्णन म्हणजे धावता आढावा नसतोच! बातम्या ऐकाव्या, बघाव्या तशा. मध्य पूर्वेतील पसरलेल्या वाळवंटाची धग स्पर्श न करता जाणवत जाते. तिथले उंट, खेचरे यांच्या पावलांपाठोपाठ आपली काल्पनिक पावले पडत जातात. बाजूच्या दगडामागून टकामका बघणारा वीतभर सरडा दिसतो, वाळूच्या गरम वाफांचा न दिसणारा आकार, हालचाल जाणवते. मग मिनार दिसतात. खजुराच्या झाडांचे उलटे कारंजे दिसतात... लिहिणाऱ्याची ताकद जेवढी, तेवढा वाचणाऱ्याचा प्रवास सुखद! भान खिळवून पानं उलटणारा! साम्राज्य निर्माण होत असतात. तलवारीच्या टोकावर इतिहास रचत रचत डोंगर, समुद्र, वाळवंटाच्या कुशीत प्रासाद बांधले जातात. भव्य. मग तिथे राजाचे पुतळे येतात, इमारती चिरेबंदी. झालेल्या युद्धाच्या स्मृती जागवणारे धारातीर्थी, लुटून आणलेल्या खजिन्यातून निर्माण झालेली संग्रहालये! संगमरवरी पुतळ्यातून, सोनेरी तावदानातून, कलात्मक शिल्परचनेतून उभी राहिलेली ही साम्राज्यं. इथं एकाच जन्मात सगळं अनुभवणं अवघडच! मराठी वाचकांना हा अनुभव देणारी प्रवासवर्णनं... निदान वाचून का होईना, एक सांस्कृतिक, जागतिक, वैचारिक भान येतच! इजिप्त, तुर्कस्तान, चीन या देशांची "सफर' घडविता घडविता, दहा दशकांपूर्वीचा संघर्ष, इतिहास, लढाया या समजत जातात... मानवी स्वभाव- मोह, लोभ, असूया, क्रोध एकच हे समजतं... 

जपानने जपलेलं व्यवस्थापन, राष्ट्रप्रेम किंवा तिबेटच्या गूढ पठारावरचं गुराख्यांचं विलक्षण संगीत, पॅरिसच्या पहाटेचं आनंदी वातावरण किंवा इजिप्तच्या आश्‍चर्याला ऊन, वारा, पावसात टिकवून ठेवणारी भव्यता... प्रवासवर्णनं ही एक लोलकासारखी पैलुदार असतात... कुठून लख्खकन्‌ किरण येईल आणि आसमंत झळाळून उठेल... याचा काही नेम असतो का? दगडांच्या प्रदेशातील व्याकुळता, समुद्रात राहणाऱ्या दर्यावर्दींचे स्वभावदोष, जगभराच्या कुटुंबव्यवस्था, भावभावनांचे जाळे, तरुणाईची स्वप्ने... देशादेशांतील नियमांच्या चौकटीत अडकलेलं अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य... सारं समजून घेता येतं... 

भाषा समृद्ध होत जाते ते निराळंच! जगभरचे शब्द... पदार्थांची नावं... बोलीभाषा यांची ओळख जशी होते, तशीच एक भावना ओळखीची बनते... "आपलेपणाची भावना!' साहेबाच्या देशात सगळंच आलबेल नसतं... आपल्यासारखीच तिथेही रुसवेफुगवे घेऊन जगणारी माणसंच राहतात, आळस, कंटाळा सार्वत्रिक असतोच, घरोघरी मातीच्याच चुली असतात.. फक्त आकार-उकार-प्रकार वेगळे! 

घराच्या लायब्ररीमध्ये पाच-दहा प्रवासवर्णनं जरूर असावीत... कंटाळा आला... की एखादं प्रवासवर्णन वाचायला सुरू करावं... बॅग न भरता, रिझर्वेशन न करता, दूरच्या प्रवासाला त्या लेखकासोबत निघावं.. कारण पुस्तकं केवळ पुस्तकं नसतात... जग जवळ आणणारी ती प्रवासी सेवा असते... 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com