टोकिओ ऑलिंपिक नियोजित वेळेत होणार...?

संजय उपाध्ये
Wednesday, 18 March 2020

जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी टोकिओ ऑलिंपिक हे निर्धारित वेळेतच होईल, जागतिक ऑलिंपिक समितीशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, ऑलिंपिक पुढे ढकलणे किंवा रद्द करण्यात येणार नाही. सर्व तयारी वेगात सुरू आहे. त्यामुळे ऑलिंपिक हे होणारच. या संदर्भात शिंजो ॲबे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली.

    जपानमध्ये २४ जुलै ते ९ ऑगस्टदरम्यान २०२० चे ऑलिंपिक होत आहे. जगातील जवळजवळ सर्व देश या महाक्रीडा स्पर्धेत सहभागी होतात. ‘ऑलिंपिक’भोवती विशिष्ट असे वलय आहे. मात्र, याच ‘ऑलिंपिक’च्या इतिहासात अभूतपूर्व घटना घडताहेत. कोरोना व्हायरसचे सावट यंदा ऑलिंपिकवर पडल्याने जपान धास्तावला आहे. कारण, जपानमध्येच एक हजारपेक्षा जास्त जणांना कोरोनाची लागण झाली. आजपर्यंत २१ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे; तर टोकिओजवळ नांगर टाकलेल्या क्रूझ बोटीवर ७०० जण बाधित आहेत. त्यामुळे ऑलिंपिक निर्धारित वेळेत घ्यायचे की नाही, याबद्दल जोरदार चर्चा सुरू आहे.

जपानचे पंतप्रधान शिंजो ॲबे यांनी टोकिओ ऑलिंपिक हे निर्धारित वेळेतच होईल, जागतिक ऑलिंपिक समितीशी सातत्याने आम्ही संपर्कात असून, ऑलिंपिक पुढे ढकलणे किंवा रद्द करण्यात येणार नाही. सर्व तयारी वेगात सुरू आहे. त्यामुळे ऑलिंपिक हे होणारच. या संदर्भात शिंजो ॲबे यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दोन दिवसांपूर्वी चर्चा केली. ट्रम्प यांनी ऑलिंपिक स्पर्धा रद्द करावी आणि पुढील वर्षी ती घ्यावी, अशी सूचना जपानला केली होती. पण, ऑलिंपिक सुरक्षित आणि यशस्वी बनविण्यासाठी अमेरिका व जपान एकमेकास सहयोग देतील, असे ॲबे यांनी स्पष्ट केले. सर्वांत प्रथम आम्ही कोरोना व्हायरसला अटकाव करणार आहोत. त्यानंतर ऑलिंपिक निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी योजना आखली आहे. मी स्वतः फुकुशिमाला जाईन. आणि तेथून सुरू होणाऱ्या आलिंपिक मशाल रिलेमध्ये भाग घेऊन त्याचा साक्षीदार बनणार आहे.

दरम्यान, जपानच्या संसदेने आणीबाणी घोषित करण्याचे सर्व अधिकार ॲबे यांना देताना ठराव मंजूर केला आहे. जागतिक ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाख म्हणाले, ‘‘कोरोना व्हायरससंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेशी संपर्क साधून त्यांचा सल्ला घेण्यात येत आहे. त्यांच्या सल्ल्यानुसारच ऑलिंपिक घ्यायचे, रद्द करायचे याचा निर्णय घेतला जाईल.’’ दरम्यान, कोणत्याही ऑलिंपिकसाठी ग्रीस येथून मशाल आणली जाते. पण, १९ मार्चला ग्रीसमधील रिकाम्या स्टेडियममधून मशाल फुकुशिमाकडे रवाना करण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी स्टेडियममध्ये येण्यास मनाई केली आहे. हे सर्व असले तरी ऑलिंपिकसाठी जगभरातील ११ हजार खेळाडू, त्यांचा सपोर्ट स्टाफ, प्रेक्षक, पर्यटक टोकिओत दाखल होतील. त्यामुळे कोरोना वेगाने फैलावेल, अशी भीती जपानला आहे. ‘ऑलिपिंक’साठीचे मंत्री सेईको हाशिमोटा यांनी संसदेत सांगितले, की कोणत्याही परिस्थितीत ऑलिंपिक पुढे ढकलले पाहिजे. यंदाच्या शेवटी घेता येईल. कोरोना जगभर पसरण्यास जपानचे ऑलिपिंक कारण ठरू नये. त्यामुळे ऑलिंपिक निर्धारित वेळेत होणार नाही, याबद्दल प्रश्‍नचिन्ह आहेच.

‘ऑलिंपिक’वर एक दृष्टिक्षेप

ऑलिंपिक स्थळ - टोकिओ (जपान)
 कालावधी - २४ जुलै ते ९ ऑगस्ट (१७ दिवस चालणार)
 क्रीडाप्रकार - ३३ खेळांचे ३३९ प्रकार
 सहभागी देशांची संख्या - सुमारे २०६
 सहभागी खेळाडू - सुमारे ११ हजारांवर

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या