

जुन्या क्रिकेट मासिकांतील दुर्मिळ लेख, छायाचित्रे आणि ऐतिहासिक आठवणींचा खजिना जतन करताना मिळालेला अवर्णनीय आनंद. क्रिकेटच्या सुवर्णकाळात घेऊन जाणारा वैयक्तिक अनुभव आणि संग्रहाची अनोखी कहाणी.
esakal
नितीन मुजुमदार
परवा मला असाच भौतिक मूल्य शून्य असलेला आनंद मिळाला!!
झाले असे की माझ्याकडे बऱ्याच वर्षांपासून जुन्या इंग्रजी मासिकांतील क्रिकेटविषयक फोटोज,उत्तम लेख आदींच्या कात्रणांचे संग्रह होते.काही मित्रांनी दिलेले, जे की त्यांना त्यांच्या संपर्कातील ज्येष्ठ मंडळींकडून मिळाले होते,काही मी स्वतः जमविले होते.हा सारा ऐवज साधारण ७०/७५ वर्षांपूर्वी मुद्रित झालेला त्यामुळे नक्कीच खूप दुर्मिळ आणि म्हणूनच महत्वाचा! मात्र माझ्या कडे साधारण २० वर्षांपासून असलेला हा ठेवा अगदी सुरुवातीला मी खूप उत्साहात नजरेखालून घातला होता.आपल्याकडे खूप मौल्यवान ठेवा आहे या 'स्वान्त:सुखाय ' अनुभूती शिवाय मी त्या ठेव्याचा अजिबात वापर केला नव्हता. सोशल मीडियाच्या स्फोटात तरुणांबरोबर अस्मादिकांच्याही पिढीच्या attention span च्या पार ठिकऱ्या उडाल्या असाव्यात आणि त्यामुळेच पूर्वी होत असलेले serious reading आता कमी झाले आहे, हा सारा ऐवज हाताळतांना हे जाणवले तरीपण काहीशा जिद्दीने मी त्या अनमोल ठेवायचे sorting आणि preservation करायचे ठरविले.