चला, ‘किफ्फ’च्या वारीला...

Kolhapur Film Festival
Kolhapur Film Festival

पन्नासहून अधिक चित्रपट आणि ६६ लघुपट... दिवस आठ.... हा बघावा की तो... दिवसातून जास्तीत जास्त चित्रपट पाहायचे... तीन की चार.... अशी चलबिचल कोल्हापूरकर चित्रपट रसिकांच्या मनात येत्या आठवड्यात चालणार आहे. बहुप्रतीक्षेत कोल्हापूर चित्रपट महोत्सव गुरुवारपासून (ता. १२) सुरू होणार आहे. १९ मार्चपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देश-विदेशातील, विविध भाषांतील, वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयघन मांडणीच्या चित्रकृती पाहण्याची संधी कोल्हापूरकर रसिकांना मिळणार आहे.

चित्रपट महोत्सव ही खरे तर चित्रकर्मी, समीक्षक अणि रसिकांसाठी एक पर्वणीच असते. एरव्ही आपण भारतीय चित्रपटांचा आस्वाद घेत असतो; मात्र या महोत्सवाच्या निमित्ताने जगभरातील अनेक देशांतील चित्रपट पाहायला मिळतात. त्यायोगे त्या त्या देशातील वेगळी कथा, संस्कृती, समस्या, रंग, रूप, वेशभूषा यांची अनुभूती घेता येते. सुरवातीच्या काळात यासाठी भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची (इफ्फी) वाट पाहावी लागायची आणि तो जेथे आयोजित होईल त्या गावी जावे लागायचे. नंतर मुंबई चित्रपट महोत्सवही (मामी) सुरू झाला. पुण्यासह इतर ठिकाणीही असे महोत्सव भरू लागले. दरम्यानच्या काळात इफ्फीही गोव्यात स्थिरावला. असे असले तरी कोल्हापुरातील सर्वच चित्रपटप्रेमींना ‘इफ्फी’, ‘मामी’ यांची वारी करणे शक्‍य होत नाही. त्यांची ही गरज ओळखून कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी गेल्या सात वर्षांपासून इथे हा चित्रपटांचा मेळा भरवते आहे. सुरवातीच्या काळात शाहू स्मारक येथे आणि मागील वर्षापासून आयनॉक्‍समध्ये त्याचे आयोजन होते आहे.

यंदाही महोत्सवातील कंट्री फोकस, डायरेक्‍टर फोकस, क्‍लासिक सिनेमा, वर्ल्ड सिनेमा, इंडियन पॅनोरमा या विभागांमध्ये अनेक लक्षवेधी व दर्जेदार चित्रपटांचा समावेश असणार आहे. कॅप्टिव्हज (हंगेरी) या उद्‌घाटनाच्या चित्रपटापासून फिरू लागलेली रिळे समारोपाच्या गोलेन्सा (इराण) या चित्रपटानंतर थांबणार आहेत. ‘हिज फादर्स व्हॉईस’ हा के. कार्तिकेयन दिग्दर्शित इंग्रजी चित्रपटही यावेळी रसिकांसाठी वेगळी भेट ठरेल. त्याशिवाय कर्क डग्लस व गिरीश कर्नाड यांना आदरांजली म्हणून त्यांच्या भूमिका असणारे चित्रपटही समाविष्ट असतील. याशिवाय १६६ प्रवेशिकांमधून दर्जेदार ६६ लघुपटांची निवड करण्यात आली आहे. माय मराठी हा मराठी सिनेमांचा वेगळा विभागही महोत्सवात दरवेळी असतो. यावेळी ‘मी पण सचिन’, ‘औषधांचे दिवे’, ‘रिवणावायली’, ‘सरगम’, ‘पुरुषा’, ‘दाह’, ‘धरण’ या चित्रपटांची वर्णी या विभागात लागली आहे. दरवेळी या विभागातील चित्रपट प्रेक्षक पसंतीच्या पुरस्कारासाठी निवडला जातो, हे या महोत्सवाचे वेगळेपण 
म्हणावे लागले.

चित्रपट महोत्सव आयोजन करणे हे काही येरागबाळ्याचे काम नव्हे; मात्र कलामहर्षी बाबूराव पेंटर फिल्म सोसायटी हे शिवधनुष्य पेलते आहे. यासाठी सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत जोशी, कार्यवाह दिलीप बापट आणि त्यांच्या टीमला दाद द्यावीच लागेल. फक्‍त त्यांच्या या प्रयत्नांना चित्रपट रसिकांनी प्रतिसाद देणे गरजेचे आहे. विशेषत: तरुणाईने अधिक रस दाखवणे अपेक्षित आहे. चित्रपट आणि महोत्सवाच्या भवितव्यासाठी ते आवश्‍यक आहे.
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com