निष्ठावान लेखणी निःशब्द... 

Sonawane
Sonawane

"अहो सर... डॉक्‍टर म्हणतात... यांचं हृदय बंद पडलंय...' हे आर्त स्वर कानावर पडले अन्‌ क्षणात पायाखालची जमीनच सरकली... हे असे वाक्‍य कधीच ऐकू येऊ नये असं सतत वाटायचं... जवळपास महिनाभरापासून दररोज दिवसातून चार-पाच वेळातरी कधी ख्यालीखुशाली, तब्येतीत सुधारणा तर कधी नाराजीच्या सुरात "मी कसं करू ओ सर... हे ऐकतच नाहीत... मला घरी घेऊन चल असं म्हणत्यात... तुमची आठवण काढत्यात...' ही वाक्‍यं सतत कानावर पडत होती... त्या माऊलीचा मोबाईलवरचाच हा संवाद... पण तो रविवारी संध्याकाळी पाचच्या सुमारास मात्र अखेरचा ठरला अन्‌ थंडावला... काय बोलावे सुचेना... कसा धीर द्यावा कळेना... संस्थेतील प्रमुख असलो तरी आयुष्यात पहिल्यांदाच मनानं खचलो... सहृदयी सहकारी म्हणून त्याची गेल्या दहा वर्षातील सोबत सोडवत नव्हती... दररोज त्या माऊलीला धीर देण्यासाठी होत असलेल्या संवादाला आता पूर्णविराम दिला गेला. 

कधीही दवाखान्याची पायरी न चढलेला आपला सहकारी विजयकुमार सोनवणे 23 जूनला सायंकाळी श्‍वसनात प्रचंड त्रास होऊ लागल्याने अचानक अस्वस्थ होतो. सहकारी पत्रकारांचे मोबाईल खणखणतात. कोरोनाच्या या महामारीत मदतीची शक्‍यता धूसर तरीही काही सहकाऱ्यांनी ऍम्ब्युलन्सने खासगी रुग्णालयात विजूला दाखल केले... त्या वेळी केलेली कोरोना चाचणी निगेटिव्ह आली. खूपच आनंद झाला... पण नियतीचं सारं काही ठरलेलं असतं, हे मात्र रविवारी संध्याकाळच्या त्या एका मोबाईल संभाषणातून समजलं... काय करावं सुचत नव्हतं... जगरहाट माहिती नसलेल्या पत्नी आरतीच्या जिवावर चार कच्ची-बच्ची सोडून विजू इहलोकाची यात्रा संपवून संसार अर्धवट टाकून निघून जातो... या साऱ्या वेदनादायी चित्रांची जुळणी कशी करावी अन्‌ काय करावं, या विचारानं डोकं सुन्न झालं होतं... 

गेल्या दहा वर्षांपासून आणि त्यापूर्वीही 2004-06 या कालावधीत दोन वर्षे "सकाळ'मध्ये असताना एक बातमीदार म्हणून विजूचं काम जवळून पाहिलं होतं. वेळेचं बंधन न पाळता अत्यंत जबाबदारीने, कामावर निष्ठा, प्रामाणिकपणा, नियोजनात हातखंडा, नीटनेटकेपणा, मोजक्‍या शब्दांतील अचूक कॉपी, सुसंवादात अग्रेसर, कोणत्याही उपक्रमासाठी सातत्याने आघाडीवर, विनातक्रार काम, "जिथं कमी तिथं आम्ही' असंच ज्याचं वर्णन करावं अशा विजूने सोडलेली साथ पाहता नियतीवरचा विश्‍वासच उडाला. दुप्पट पगाराचे आमिष असतानाही न बधलेल्या विजूची "सकाळ'वरची निष्ठा अवर्णनीयच. मुख्य बातमीदारपदी पदोन्नती दिल्यानंतरही डोक्‍यात साहेबी रुबाब कधीही जाणवू दिला नाही. शहर पानासाठी मुख्य बातमी नाही, संक्षिप्त कमी पडलंय, सिंगल बातमी नाही असं कधीही होत नसायचं... 

सोलापूर शहराला स्मार्ट सिटीचा दर्जा मिळण्यासाठी त्याने केलेली शिकस्त, अंधारात खितपत पडलेल्यांना, तसेच मदत मिळेल ही आशा सोडलेल्यांना, समाजातील दुर्लक्षित अशा घटकांना विजूने आपल्या लेखणीतून केवळ मदतच मिळवून दिली नाही तर त्यांच्या जीवनात आशेचा किरणही फुलवला. सहकाऱ्याचा वाढदिवस, पुरस्कार, सन्मान ही विजूसाठी पर्वणीच. सर्व सहकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या घेऊन संबंधिताला साजेसे एक पुस्तक देऊन गौरवणारा विजू पुस्तक प्रदर्शनाच्या स्टॉलवर नेहमीच असे. वाचनाचा व्यासंग, ग्रामोफोन रेकॉर्डचा संग्रह, विशिष्ट क्रमांकाच्या नोटांचा संग्रह, जुन्या गाण्यांची आवड, पत्नी आणि मुलांसह पुरस्कार व सन्मान स्वीकारणारा कुटुंबवत्सल विजू यापुढे सोबतीला नाही हे अजूनही स्वप्नवतच वाटते. पत्रकारितेतील महापालिकेचा "एनसायक्‍लोपीडिया' अशी आता कोणाची ओळख करून द्यावी? सोलापुरात कोणत्याही क्षेत्रातील मान्यवर आले की त्यांच्याशी संबंधित साहित्य घेऊन त्यांना भेटणे, त्यांची सही घेणे हा त्याचा आणखी वेगळा छंद! पत्रकारितेबरोबरच त्याने आपल्या समाजासाठी मोठंच योगदान दिलं. पण यासाठी "सकाळ'चा वापर कधी केला नाही. "सकाळ' वर्धापनदिन असो की सन्मानाचा प्रसंग, "सुटा-बुटातील विजयकुमार' असे चित्र आता नसणार. स्वातंत्र्यदिन, प्रजासत्ताक दिन, जयंती-पुण्यतिथी इतकेच काय स्थानिक स्वराज्य संस्था दिनासाठीही महापालिकेत हजेरी लावणारा हा निराळाच पत्रकार. पदाचा गर्व, कोणताही अभिनिवेश न बाळगता नवोदित पत्रकारांना, नव्या नगरसेवकांना मार्गदर्शन करतानाही त्याने कधीही "मोठे'पणा मिरवला नाही. सकारात्मक पत्रकारिता करताना स्टंटबाजीला त्याचा नेहमीच विरोध असे. सकाळी सात वाजताच औज बंधारा, उजनी जलाशय तर कधी हिप्परगा तलावावर रिपोर्टिंगसाठी तो असे, यातून त्याच्या कामावरचे प्रेम दिसून येते. 

सकारात्मक पत्रकारिता करताना सर्वसामान्यांसाठी झिजणारी विजूची लेखणी आता स्तब्ध झाली... निःशब्द झाली. मृत्यूनंतर अनेकांनी त्याचा फोटो, निःशब्द, निधन वृत्ताची लिंक असे स्टेटस ठेवले होते, हेच त्याच्या वादातीत व्यक्तिमत्त्वाचे रहस्य म्हणावे लागेल. 

- अभय दिवाणजी, 
सहयोगी संपादक, सकाळ, सोलापूर 

संपादन : श्रीनिवास दुध्याल 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com