पुणे महापालिकेच्या सभागृहाची शान निवृत्त व्हायला नको ! 

मंगेश कोळपकर
Tuesday, 1 September 2020

महापालिकेच्या इतिहासात दुसऱया क्रमांकाच सर्वाधिक काळ नगरसचिव राहणारे आणि कार्यालयीन सभांचे तज्ज्ञ पारखी 34 वर्षांच्या सेवेनंतर महापालिकेतून निवृत्त झाले. सुमारे 12 वर्षे नगरसचिव या पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होते. महापालिकेच्या कामकाजात नगरसचिवपद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. नगरसचिव हे महापौर किंवा आयुक्तांनाही आदेश देऊ शकतात, इतकी त्या पदावर जबाबदारी आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभा, शहर सुधारणा, महिला बालकल्याण, नाव समिती आदींच्या कामकाजात नगरसचिवांची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते.

पुणे : वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे आणि स्वभावांचे नगरसेवक, कोणी उंचावून बोलणारे तर, कोणी अंगावर येणारे ...तर, काहीजण कायदयाची जाणीव देणारे....अशा अनेक भिन्न प्रकृतीच्या नगरसेवकांना मार्गदर्शन करीत (खरं तर समजावून सांगत) महापालिकेच्या कार्यालयीन सभांचे कामकाज चालविणे तसं अवघड काम, पण आपल्या मृदू आणि विनयशील स्वभावाच्या बळावर पण तितक्याच खंबीरपणे नगरसचिवपदाची जबाबदारी पार पाडणारे सुनील नारायण पारखी 31 ऑगस्ट रोजी निवृत्त झाले. मात्र, त्यांच्या निवृत्तीने सभागृहाची शान निवृत्त व्हायला नको, अशीच अपेक्षा आहे.
 
महापालिकेच्या इतिहासात दुसऱया क्रमांकाच सर्वाधिक काळ नगरसचिव राहणारे आणि कार्यालयीन सभांचे तज्ज्ञ पारखी 34 वर्षांच्या सेवेनंतर महापालिकेतून निवृत्त झाले. सुमारे 12 वर्षे नगरसचिव या पदाची त्यांच्याकडे जबाबदारी होते. महापालिकेच्या कामकाजात नगरसचिवपद अत्यंत महत्त्वाचे समजले जाते. नगरसचिव हे महापौर किंवा आयुक्तांनाही आदेश देऊ शकतात, इतकी त्या पदावर जबाबदारी आहे. महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समितीची सभा, शहर सुधारणा, महिला बालकल्याण, नाव समिती आदींच्या कामकाजात नगरसचिवांची अत्यंत महत्वाची जबाबदारी असते. सभेच्या अध्यक्षस्थानी महापौर असले तरी कामकाज हे कायद्यानुसार होईल, याची जबाबदारी मात्र, नगरसचिवांवर असते. सभागृहात पदाधिकारी, नगरसेवक, अधिकारी काय बोलतात..., कोणती आश्वासने देतात याच्या नोंदी ठेवून सभावृत्तांत तयार करण्याचे कामही त्यांच्याच अंतर्गत चालते. सभेमध्ये प्रश्नोत्तरे पाठविणे, त्यांची उत्तरे त्या-त्या विभागांकडून मागविणे आणि सदस्यांपर्यंत पोचविणे ही देखील त्यांचीच जबाबदारी. इतकेच नव्हे तर, सदस्यांच्या उपस्थितीची नोंद करून त्यानुसार कार्यवाही करणे, यावरही नगरसचिवांचाच अंमल असतो. 

अनेकदा एखाद्या ठरावावरून सभागृहात गोंधळ होतो. निर्णयावर एकमत होईल, असे दिसत नसल्यामुळे महापौर मतदान घेण्याचा आदेश देतात. त्यावेळी त्यांची नोंद घेणे आणि निर्णय घेणे, ही देखील नगरसचिवांचीच जबाबदारी. महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे अध्यक्ष, विषय समितीच्या सदस्यांची निवड, पीएमपीच्या संचालकांची निवड आदी निवडणुकाही नगरसचिवांच्याच देखरेखीखाली होतात. 

स्मार्ट सिटीच्या ठरावावरून जून 2016 मध्ये महापालिकेत प्रचंड गोंधळ झाला होता. त्यावेळी उपसूचना स्वीकारण्यावरून मोठे मतभेद झाले होते. त्यावेळी नगरसचिवांचा अधिकार अंतिम असतो. तेव्हा त्यांना त्यावेळी व्यक्तिगत लक्ष्य करण्यात आले होते. तसेच जिल्हापरिषदेच्या सभागृहात झालेल्या सभेच्यावेळी काही सदस्यांनी त्यांना धक्काबुक्की केली होती. त्यावेळीही सौम्य स्वभावाच्या पारखी यांनी त्यांचा खंबीरपणा दाखवून दिला. चिडचिड झाली तरी, कनिष्ठ सहकाऱयांवर त्याचा परिणाम होणार नाही, याची काळजी घेतानाच सर्व कसे कायदेशीर होईल, यावरच पारखी यांचा कटाक्ष असे. नव्याने निवडून आलेल्या नगरसेवकांची शिकवणीदेखील ते घेत. त्यामुळेच सगळेच राजकीय पक्ष नव्या सदस्यांसाठी पारखी यांचा क्लास आयोजित करीत. शासकीय नोकरी अनेक अधिकारी करतात. परंतु, महापालिकेचे सभागृह ही शहराची शान असून ही पवित्र वास्तू आहे, अशी त्यांची श्रद्धा आहे. त्यामुळे सभागृहाचा दिमाख आणि लौकीक उंचावण्यासाठीच पारखी यांनी प्रयत्न केले, त्यामुळेच त्यांची नगरसचिवपदाची कारकिर्द उत्तरोत्तर उजळून निघाली. 

      जानेवारी १९८५ मध्ये महापालिकेच्या नगरसचिव विभागात कनिष्ठ लिपिक पदावर रूजू झालेल्या पारखी यांनी त्यानंतर कायद्याची पदवी घेतली. खातेतंर्गत परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर १९९१ मध्ये त्यांना समिती लेखनिक या पदावर बढती मिळाली तर २००३ मध्ये ते महापौरांचे स्वीय सचिव झाले. २००५ मध्ये उपनगरसचिव पदावर पदोन्नती झाली. तर १ जानेवारी २००९ मध्ये ते नगरसचिव झाले.

      नगरसचिव विभागातील दीर्घ अनुभव, सभा कामकाज नियमावलींचा अभ्यास आणि निष्पक्ष  कामकाज पद्धती यामुळे ते नगरसेवक आणि अधिकारी वर्गामध्ये नावाजले गेले आहेत. या अनुभवाच्या जोरावर त्यांनी अभ्यासपूर्वक नवीन सभा कामकाज नियमावली तयार केली आहे. ही नियमावली सध्या पक्षनेत्यांच्या बैठकीपुढे आहे. महापालिकेच्या स्थापनेनंतर १९४९ ते १९६५ दरम्यान अ.कृ. जाधव यांनी सलग १५ वर्ष नगरसचिवपदावर काम केले आहे. यानंतर पारखी हे  या पदावर प्रदीर्घ काम करणारे नगरसचिव ठरले आहेत.

       जुन्या शहराचा विकास आराखडा, जेएनआययूएम योजना, स्मार्ट सिटी प्रकल्पाला मंजुरी, चोवीस तास पाणी पुरवठा योजना, ११ गावांचा समावेश अशा शहरावर दीर्घकालीन परिणाम करणार्‍या योजनांना मंजुरीच्या सभा चांगल्याच गाजल्या. नव्याने समाविष्ट होणार्‍या गावांचा आणि नगरसेवकांची संख्या वाढेल याचा अंदाज आल्याने विस्तारीत महापालिका भवनमध्ये प्रशस्त सभागृह असावे यासाठी त्यांनी तत्कालीन महापालिका आयुक्तांकडे आणि पदाधिकार्‍यांकडेही पाठपुरावा केला होता. नवी मुंबई महापालिकेमध्ये नगरसचिवांची नियुक्ती करण्यासाठी इंटरव्यूव्ह आयोजित केले होते. इंटरव्यूव्ह घेणार्‍यांच्या पॅनेलमध्ये पारखी यांचा विशेष सहभाग करून घेण्यात आला होता.
-----------

इतर ब्लॉग्स