Gajab Tichi Adaa Review: विचारवाही देखणी ‘अदा’कारी

गजब तिची अदा’ हे नाटक शांती आणि अहिंसेचा जागर करत ठाम भूमिका घेऊन उभे राहिले आहे.
Gajab Tichi Adaa Review: विचारवाही देखणी ‘अदा’कारी

Gajab Tichi Adaa Marathi play review

आपले वर्चस्व अबाधित ठेवण्यासाठी जगभरात वेगवेगळ्या ठिकाणी युद्ध सुरू आहेत. रशिया-युक्रेनच्या संघर्षात लाखो बळी गेले. अफगाणिस्तान उद्ध्वस्त झाले. या पार्श्वभूमीवर मराठी रंगभूमीवर आलेले ‘गजब तिची अदा’ हे नाटक शांती आणि अहिंसेचा जागर करत ठाम भूमिका घेऊन उभे राहिले आहे. कलावंतांनी समाजहिताची भूमिका घेणे अलीकडच्या काळात दुर्लभ होत असताना प्रा. वामन केंद्रे यांच्या या नाटकातील स्त्री कलाकारांनी अहिंसास्त्र उगारून युद्ध ‘लढवणाऱ्या’ मानसिकतेवर प्रहार केला आहे.

प्रयोगशीलता
प्रयोगशीलता sakal

एकीकडे बहुतांश व्यावसायिक नाटके दिवाणखान्यात अडकली असतानाच, मराठी रंगभूमीवर पुन्हा एकदा वेगळी प्रयोगशीलता रुजवण्यासाठी वामन केंद्रे यांची ही ‘अदा’कारी महत्त्वाची आहे. रंगमंचावर दोन्ही बाजूंनी पायरीगणिक उंच होत गेलेला आडवा चबुतरा आणि राजवाड्याचे स्तंभ नाटकातील आशय-विषयाची आणि आचार-विचारांचीही फुटपट्टी आहे. याच सूचक राजवाड्याच्या साक्षीने हे नाट्य घडत जाते. नेपथ्याचा पसारा टाळून फक्त लेव्हलच्या माध्यमातून उभारलेला राजवाडा नाटकाचा केंद्रबिंदू आहे. या नेपथ्य संकल्पनेसाठी नावेद इनामदार यांचे कौतुक केलेच पाहिजे.

आपले श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी सैनिकांच्या बळावर युद्ध खेळत राहतो.
आपले श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी सैनिकांच्या बळावर युद्ध खेळत राहतो. sakal

पडदा उघडतो तेव्हा तालबद्ध नृत्य आणि गाण्याच्या माध्यमातून ‘ऐका अनोखी कहाणी...’ हे गाणे रसिकांना ठेका धरायला लावते. लोककलेच्या साजशृंगारातून सुरू होणारी गोष्ट नृत्य-गीत-संगीतातून प्रवेशागणिक उत्सुकता वाढवते. ही कथा एका महत्त्वाकांक्षी राजाची आहे. राजेशाही टिकवण्यासाठी तो सैनिकांच्या बळावर एकेक राज्य जिंकत जातो. आपले श्रेष्ठत्व टिकवण्यासाठी सैनिकांच्या बळावर युद्ध खेळत राहतो.

सैनिकही जीवावर उदार होऊन राजाच्या विचाराला पाठबळ देतात. राजाने अशी अनेक युद्धे जिंकली. आता तो शंभराव्या युद्धाचा टप्पा गाठणार असतो. त्याच्या पूर्वजांनीही अशीच अनेक युद्धे जिंकली; पण त्यांच्यापेक्षा तो आता सरस झाला आहे. युद्ध जिंकल्यानंतर सैनिकांच्या स्वागतासाठी, त्यांचे औंक्षण करून महिलाही विजयाचा आनंद साजरा करतात.

युद्धामुळे निराधार झालेल्या महिलांच्या दु:खाने व्यथित होतात आणि युद्धबंदीचा आवाज उठवतात
युद्धामुळे निराधार झालेल्या महिलांच्या दु:खाने व्यथित होतात आणि युद्धबंदीचा आवाज उठवतातsakal

एक दिवस असेच एक युद्ध जिंकून सैनिक विजयोत्सव साजरा करतात. हरलेल्या राज्यातील महिलांवर अत्याचार होतात. त्यांना बंदी बनवून आणले जाते. विजयी झालेल्या राज्यातील महिला हे दृश्‍य बघतात. त्या महिलांची दर्दभरी कहाणी ऐकतात. युद्धामुळे निराधार झालेल्या महिलांच्या दु:खाने व्यथित होतात आणि युद्धबंदीचा आवाज उठवतात.

हा आवाज महिला कलावंतांचा आहे. त्यांच्या युद्धबंदीच्या चळवळीत सैनिकांच्या पत्नीही सहभागी होतात आणि युद्ध करणार नाही, असे वचन आपापल्या पतीकडे मागतात. युद्धबंदीविरुद्ध प्रत्येक महिलांच्या हातातील घंटी अहिंसेचा संदेश देणारे शस्त्र होते. अहिंसावादी चळवळीच्या घंटीचा नाद टिपेला जाऊन नाटक रंगत जाते आणि नाट्यविचार आकार घेतो.

प्रा. वामन केंद्रे हे नाट्यशिक्षक म्हणून विख्यात आहेत. मुंबई विद्यापीठाच्या अकादमी ऑफ थिएटर आर्ट्सचे त्यांनी १० वर्षे संचालकपद भूषवले. त्यानंतर दिल्लीतील जगविख्यात राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे ते संचालक होते. तत्पूर्वी त्यांनी दिग्दर्शित केलेल्या नाटकांनी रंगभूमीवर वेगळी ओळख कमावली होती, त्यात ‘झुलवा’ या महत्त्वाच्या नाटकाचा समावेश आहे. प्रा. केंद्रे यांनी तब्बल दोन दशकांनंतर दिग्दर्शित केलेले नाटक रंगभूमीवर आले आहे.

त्यांच्या ‘रंगपीठ’ संस्थेच्या माध्यमातून नव्या तरुण कलावंतांना घेऊन, त्यांनी ही देखणी ‘अदा’कारी पेश केली आहे. हा प्रयोग बघितल्यानंतर या कलाकृतीसाठी केलेल्या सखोल संशोधनाची प्रचीती येते. नाटकाची गोष्ट रसिकांपर्यंत पोहचवणे या कलाकृतीचा हेतू नाही, तर एक विचार रुजवण्यासाठी केलेला विचारवाही प्रयोग आहे.

कलाकृतीतील नाट्यविचार युद्धाच्या पार्श्वभूमीशी नाते सांगणारा असला, तरी त्या विचाराला अनेक अदृश्‍य धागे आहेत. नाटकातल्या ‘राजा’कडे प्रतीक म्हणून पाहिले, तर त्याच्यासारखे वेगवेगळे सत्ताधारी आजही जगभरात आहेत. ते आपापले वर्चस्व टिकवण्यासाठी सैनिकांना लढवत असतात. धर्माचे पीठाधीश आपापल्या धर्मवर्चस्वासाठी अनुयायांना लढवतात. आपले अस्तित्व टिकवण्यासाठी नेते कार्यकर्त्यांचा वापर करतात.

जिथे ही वर्चस्वाची, वरचढपणाची लढाई असते, तिथे अनुयायी, कार्यकर्ते, सैन्य लढत राहतात. मारले जातात. त्यांची मुलंबाळं पोरके होतात. राजे मात्र आपापल्या महालात सुखी असतात. त्यांच्या सुखासमाधानाचे जीवन अनुयायांच्या वाट्यालाही येण्यासाठी, युद्ध करण्यापेक्षा शांती-अहिंसेच्या मार्गानेच विश्‍वशांतीचा संदेश नाटकात अधोरेखित झाला आहे.

लेखन-दिग्दर्शनासह प्रा. वामन केंद्रे यांचे या नाटकाला प्रभावी ठरवणारे संगीत महत्त्वाचे आहे. दिनू पेडणेकर, गौरी केंद्रे आणि श्रीकांत तटकरे या निर्मात्यांच्या ‘अनामिका’, ‘साईसाक्षी’ आणि ‘रंगपीठ’ या संस्थेने ‘गजब तिची अदा’ची निर्मिती केली आहे. नाटकात प्रोजेक्टरच्या माध्यमातून आजवरच्या जगभरातल्या युद्धाची गांभीर्याची जाणीव करून देणारे आहे. शीतल तळपदे यांची प्रकाशयोजना, उल्लेश खंदारे यांची रंगभूषा, एस. संध्या यांची वेशभूषा आणि अनिल सुतार यांच्या नृत्यदिग्दर्शनाने नाटकाची अदा खऱ्या अर्थाने श्रीमंत झाली आहे.

अहिंसेच्या मार्गाने मानवी मनात सुखशांती नांदू शकते, याचे अनेक ऐतिहासिक दाखले आहेत. सम्राट अशोकाने युद्धात झालेल्या रक्तपाताने दु:खी होऊन बुद्धाच्या शांती-अहिंसेचा प्रचार आणि प्रसार केला. हाच विचार पुढे घेऊन जाणाऱ्या वेगवेगळ्या माध्यमांत अनेक कलाकृती जन्माला आल्या. त्याचा बोध घेऊन शांती अहिंसेच्या विचारातच अखिल मानव जातीचे कल्याण आहे, हे पुन:पुन्हा समाजात रुजवण्याची गरज आहे. आज वेगवेगळ्या कारणांसाठी माणूस क्रोधीत आणि बदला घेण्याची वृत्ती बळावत असताना ‘गजब तिची अदा’ हे नाटक प्रयोगशील शैलीने पुन्हा एकदा अहिंसेचे महत्त्व अधोरेखित करणारे आहे.

Gajab Tichi Adaa Review: विचारवाही देखणी ‘अदा’कारी
Crime news : संभाजीनगर हादरलं! विवाहित महिलेवर तीन सख्ख्या भावांचा सामूहिक बलात्कार

नाटकातील राजाची मुख्य भूमिका ऋत्विक केंद्रे यांनी साकारली आहे. करिष्मा देसलेने साकारलेल्या लक्ष्मी या महत्त्वाच्या भूमिकेसह कलाकार आणि एक महिला या व्यक्तिरेखांतून तिचा अभिनयातील ‘करिष्मा’ अधोरेखित झाला आहे. तिच्यासह महिला कलावंतांमध्ये तेजस्विनी कुराडे (कलाकार, गणिका, महाराणी, स्त्री), सांप्रती पाटील (अबला, गणिका, स्त्री), श्वेतनील सावंत (कलाकार, स्त्री, दासी), तन्वी धुरी (अबला, गणिका, स्त्री),

संस्कृती जाधव (अबला, गणिका, प्रमुख गायिका), समृद्धी देसाई (अबला, गणिका, स्त्री) यांच्यासह श्रुती हळदणकर, वैष्णवी घोडके, मोहिका गद्रे, अंकिता देसाई यांनी वठवलेल्या कलाकार आणि स्त्रियांच्या भूमिका चोख बजावल्या आहेत. पुरुष कलावंतांमध्ये मंदार पंडित (प्रधान, लक्ष्मीचा नवरा), रोहित कुलकर्णी (सैनिक १०, दरबारी) यांच्यासह सचिन जाधव,

Gajab Tichi Adaa Review: विचारवाही देखणी ‘अदा’कारी
Crime news : अल्पवयीन मुलीवर अत्याचार प्रकरणी तरुणाला कारावास, दंड

अमोल जाधव, मंगेश शिंदे, सुमित भालेराव, अनुप हरिश्चंद्रे, दर्शन रायकर, विभव साळवे, मनीष जाधव, महेश महालकर या ‘सैनिकां’नी नाटकातील आपापल्या अभिनयाचे युद्ध जिंकले आहे. सुमारे २५ कलावंतांचा फौजफाटा घेऊन सादर झालेली ही अदा त्यांच्या वेशभूषा, रंगभूषेतील अनेकविध वैशिष्ट्यांनी देखणी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com