मुक्त होतील माझे पंख, घेईन ठाव आभाळाचा

- सौ. ममता अतुल कुलकर्णी, पुणे
शुक्रवार, 26 जून 2020

स्टेट सायकॉलॉजिस्ट असोसिएशन (स्पा) म्हणजेच राज्य मानसशास्त्रज्ञ संघटना यांच्यातर्फे मे महिन्यात म्हणजेच लॉकडाउनच्या काळात राज्यस्तरीय ऑनलाइन निबंध स्पर्धा घेण्यात आली. या राज्यस्तरीय स्पर्धेला राज्याबाहेरूनही तसेच परदेशातूनही प्रतिसाद लाभला. एका आठवड्याच्या कालावधीत दीडशेच्या आसपास निबंध आले. "लॉकडाउन... मी आणि माझे मनःस्वास्थ्य' या विषयावर ही निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील महिला गटातील तृतीय क्रमांकाचा हा निबंध... 

जगरहाटीमध्ये सगळं रोजच्यासारखं नियमित चाललं होतं, प्रत्येकजण आपापल्या कामात व्यस्त होता, माझंही मुलांची शाळा, अभ्यास सगळं कसं रूळलेल्या नियमांप्रमाणे चालू होतं. आणि अचानक या एकाच वेगाने वाहणाऱ्या नदीमध्ये कोरोना नावाचा बांध नियतीने घातला. सगळं स्तब्ध झालं, शाळा बंद झाल्या, ऑफिसेस घरातून सुरू झाले. सतत बातम्यांचा कानावर भडीमार होत राहीला. मनात अनेक शंका, प्रश्‍न उठत होते. 

अचानक, अवचित रोजची घडी विस्कटली 
कोरोनाच्या भडीमाराने हर दिशा भरकटली 

आपल्या मनाचा कौल घेण्याचा प्रयत्न केला तेव्हा, सकारात्मक फुल सगळ्यात आधी उमलताना दिसलं. वेदनेच्या आधी सुखद जाणीव जेव्हा प्रथम जाणवते, तेव्हा मन निरोगी असल्याचा आनंद मला होतो. अनेकांना प्रश्‍न होता आता कोणास, किती दिवस घरात बसावे लागेल, कंटाळा येईल, पण मला मात्र हा प्रश्‍न कधीच पडला नाही. 11 वर्षांची मुलगी शुभ्रा आणि पाच वर्षांचा मुलगा श्‍लोक यांना परिस्थिती समजावून सांगितली की समजेल याची खात्री होती, आणि माझा नवरा अतुल आणि माझी दोन्ही मुले आम्ही इतके दिवस एकत्र ही जाणीवच माझ्यासाठी अप्रतिम होती. अतुल घरीही कामात असणार होता पण तरी त्याचं फक्त असणंही माझ्यासाठी खूप सुखावह असणार आहे हे मला माहीत होते. सुरवातीच्या काळात बाई नाही याचं दडपण आलं होतं पण तेही सवयीने दूर झालं. 

चहा, नाश्‍ता, दुपारचं, रात्रीचं जेवण एकत्र बसून करणं खूप छान वाटत होतं. माझी मुलंही समजूतदार आणि एकाला दोघं होती तर त्यांचे नवनवीन खेळ सुरू झाले. दुपारच्या जेवणानंतर रोज मुलं आणि आम्ही दोघं UNO (card game) थोड्या वेळ खेळायचे, हा नियम बनून गेला होता. चार वाजले की रोज कामाच्या ठिकाणी अतुलला सरबत नेवून द्यायचं आणि रोज नव्याने त्याचं खूश होणं, मनाला गुदगुल्या करणारं होतं. माझ्या नवनवीन पदार्थांचा पहिला प्रयत्न याच काळात त्यांच्या पोटावर आणि जीभेवर घडत होता त्यामुळे मुलंही खूश होती, मुलांचं काय आवडलं तर खाल्लं नाहीतर नाही खाल्लं, पण खरी परीक्षा तर अतुलची होती, माझ्या प्रेमाखातर असेल कदाचित पण मला हे नको, असं बिचारा कधीच म्हणाला नाही. 

आपण इतके दिवस सतत एकत्र राहिलो तर एकमेकांना बोअर होण्याची शक्‍यता असते, पण ही शंका मला कधीच नव्हती, जिथे प्रेम, काळजी आणि विश्‍वास असतो तिथे एकमेकांची संगत कंटाळवाणी कधीच होत नाही. त्याचं स्वयंपाकगृहात येऊन विचारणं "काही करायचंय का', खूप छान वाटायचं, आता मलाही त्याच्या कामाच्या मर्यादा ठावूक आहेत तर त्याला येणारी एक-दोन कामे सांगितली की दोघंही समाधानी. मुरलेल्या लोणच्याप्रमाणे आमचे नाते सहवासाच्या खाराने अजून चविष्ट बनत होते. शनिवार, रविवार चौघांनी एकत्र येऊन साफसफाई मोहीम हाती घ्यायचो, यामुळे मुलांनाही कामाची ओळख झाली. अतुल आणि मुलांच्या फुटबॉल खेळण्याचा दंगाही मनाला सुखावत होता. या लॉकडाउनमुळे माझी मुलं त्यांच्या बाबांच्या अधिक जवळ आली. याचा मला सर्वात आनंद झाला. मुलांना नवीन गोष्टी शिकवायला मिळाल्या, online studies चा नवीन अनुभव त्यांना घ्यायला मिळाला याचेही बरे वाटत होते. 

मन घेई प्रिया संगे, हिंदोळे जुन्या आठवणींचे 
मन सुखावले, गालात लाजले, भरले घडे प्रीतीचे 
थोडी मस्ती, थोडी शिकवणी, खेळ लेकरांचे 
संगतीच्या हसऱ्या डोहात, मन जुळले साऱ्यांचे 

या सगळ्या सुखद गोष्टींबरोबर अभिमानाने ऊर भरून यायचा, तो उन्हातान्हांत आपल्यासाठी झुरणाऱ्या पोलिसांसाठी, दिवसरात्र झटणाऱ्या डॉक्‍टर्स, नर्सेससाठी आणि सफाई कामगारांसाठी. सुसंस्कृतपणाचा आव आणून सामान्य ज्ञान शून्य असणाऱ्या, अन्‌ उगाच मोकाट भटकणाऱ्या निर्लज्ज लोकांचा खूप राग यायचा. ज्यांचे पोट हातावर आहे त्यांना रोज पोटाची खळगी भरण्यासाठी सोसाव्या लागणाऱ्या वेदनांचे खूप वाईट वाटायचे, आपल्या घरापासून लांब असलेल्या परप्रांतीय लोकांची घराकडे जाण्यासाठीची धडपडही मनाला समजत होती. इतर देशातील सरकारपेक्षा भारत सरकार योग्य पावले उचलण्याच्या प्रयत्नात आहे याने मन समाधानी होत होते. आपल्याला तर फक्त घरात रहायचय, या सगळ्यांचा विचार केला तर वाटतं उगाच कामाला आणि बंदिवासाला रडत बसण्याचा आपल्याला काही एक अधिकार नाही. जमावाने केलेली साधूंची हत्या, रेल्वे रूळावर गेलेला कामगारांचा बळी आणि कोरोनामुळे जिवाला मुकलेल्या व्यक्तींचा विचार करता आजही मन हळहळते आहे. 

कोणी म्हणतं हे चीनने जाणूनबुजून केलंय, कधी वाटतं असेलही, कधी वाटतं दैवाची लाठी तर नसेल, चोऱ्या माऱ्या, खून, लेकींचे बलात्कार सगळं अनावर तर झालं नसेल, पण आता हे सगळं थांबावं, सामान्य आणि या झगड्यात लढणाराही भरडला जातोय. बळींची संख्या वाढते आहे, मूक किंकाळी प्रत्येकाच्या मनातून डोकावते आहे. संयम, सहनशक्ती मनात धरून प्रत्येकजण लढतोय. सगळं ठीक होईल पण कधी हा अनुत्तरित प्रश्‍न मात्र मनाला भेडसावतोय. 

मनात भीती, जिवात हुरहुर, प्रश्‍न सतावी भविष्याचे 
घे पदराखाली माते आता, कल्याण करी साऱ्यांचे 
नयनी दाटे सुरेल स्वप्न, होईल निचरा संकटाचा 
मुक्त होतील माझे पंख, घेईन ठाव आभाळाचा 

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या