esakal | National Engineers Day 2021: कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा अभियंता
sakal

बोलून बातमी शोधा

मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या

विश्‍वेश्‍वरय्या यांनी साक्रीच्या मुक्कामात तालुक्यातील पांझरा, कान, बुराई या नद्यांवरील फड बागायतीचा तपशीलवार व तांत्रिक अभ्यास केला.

कामाच्या दर्जात तडजोड न स्वीकारणारा अभियंता

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

भारतरत्न मोक्षगुंडम विश्‍वेश्‍वरय्या या जागतिक कीर्तीच्या महान अभियंत्याचा जन्म १५ सप्टेंबर १८६१ रोजी कर्नाटक राज्यात कोलार जिल्ह्यातील मुद्देनहळ्ली येथे झाला. त्यांचा जन्मदिवस हा भारतात ‘राष्ट्रीय अभियंता दिन’ म्हणून साजरा केला जातो. या निमित्ताने त्यांच्या कार्याची ही आठवण...

सर विश्‍वेश्‍वरय्या यांच्या कामाची मुहूर्तमेढ धुळे जिल्ह्यातील साक्री येथे झाली, हे अनेकांना माहिती नसेल. साक्री तालुक्याच्या दृष्टीने ही अत्यंत अभिमानाची गोष्ट आहे. १८८४ मध्ये इंजिनिअरिंगची पदवी घेतल्यानंतर ते नोकरीला लागले. काही दिवस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये ‘एरिगेशन इंजिनिअरिंग’ या विषयावर त्यांनी अध्यापन केले. त्यानंतर नाशिक विभागात साक्री येथे असिस्टंट इंजिनिअर म्हणून सार्वजनिक बांधकाम खात्यात त्यांची नेमणूक झाली. त्या वेळी साक्री तालुक्यातील नामांकित फड बागायतीचा सार्वत्रिक नावलौकिक होता.

विश्‍वेश्‍वरय्या यांनी साक्रीच्या मुक्कामात तालुक्यातील पांझरा, कान, बुराई या नद्यांवरील फड बागायतीचा तपशीलवार व तांत्रिक अभ्यास केला. अशा प्रकारच्या सिंचन क्षेत्रातील आदर्श पद्धतीवर ते प्रभावित झाले. त्यांनी त्यावर खास प्रबंध लिहून आदर्श सिंचन पद्धतीची ओळख जगाला करून दिली. त्यांचा हा प्रबंध आजही दिल्लीतील एका म्युझियममध्ये सुरक्षित आहे. तो प्रबंध वाचून जागतिक बँकेने जपानच्या ‘इको जी सिको’ नावाच्या एका सिंचन तज्ज्ञाला फड बागायतीचे प्रत्यक्ष निरीक्षण करून रिपोर्ट करायला सांगितले होते. सर विश्‍वेश्‍वरय्या यांनी फड बागायती सिंचन पद्धतीच्या धर्तीवर त्यात काही तांत्रिक सुधारणा करून ‘ब्लॉक सिस्टिम’ विकसित केलेली आहे. सिंचनातील ही सिस्टिम अजूनही त्यांच्याच नावाने ओळखली जाते.

१९४८ मध्ये नाशिकजवळ गंगापूर हे पहिले मातीचे धरण बांधण्यात आले. त्याचे कार्यकारी अभियंता गो. नी. धानक होते. त्यासाठी विश्‍वेश्‍वरय्या यांच्या ज्ञानाचा त्यांना उपयोग झाला. पुण्याजवळच्या खडकवासला धरणासाठी त्यांनी डिझाइन केलेले स्वयंचलितद्वार आजपावेतो उत्तमरीत्या कार्यरत आहे. त्याला विश्‍वेश्‍वरय्या गेट म्हणून ओळखले जाते. म्हैसूर राज्यातील भद्रावती लोखंड कारखान्याचे काम व्यवस्थित मार्गी लावून दुसऱ्या मोठ्या कामासाठी त्यांनी राजीनामा देऊन मोकळीक घेतली. भद्रावतीचे काम महात्मा गांधींनी राजगोपालाचारी यांच्यासमवेत बघितले. महात्मा गांधी यांनी १९२७ मध्ये त्यांच्या ‘यंग इंडिया’ या वृत्तपत्रात म्हटले आहे की, कृष्णराजसागरप्रमाणेच भद्रावती कारखाना उभा करताना विश्‍वेश्‍वरय्या यांनी सर्व योग्यता, ज्ञान, वेळ व शक्ती म्हैसूर राज्याच्या सेवेला दिली आहे. ही देशभक्ती स्थानिक रचनात्मक कार्यशैलीचा उत्तम नमुना आहे.

१९५५ मध्ये केंद्र सरकारने विश्‍वेश्‍वरय्या यांना सर्वोच्च मानाचा भारतरत्न पुरस्कार दिला. म्हैसूर सरकारने त्यांना मुख्य अभियंतापदी बढती दिली. इंग्रजांनी त्यांना ‘सर’ ही मानाची पदवी दिली. म्हैसूर सरकारने त्यांना ‘दिवाण’ पद बहाल केले होते. त्यांना ‘डॉक्टर ऑफ सायन्स’ ही सन्मानाची पदवी अनेक विद्यापीठांनी दिली. अश्या थोर अभियंत्याचे १४ एप्रिल १९६२ रोजी निधन झाले. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ १९६७ पासून महाराष्ट्र सरकारने उत्कृष्ट अभियंता पुरस्कार सुरू केले आहेत. त्या क्षेत्रातील उच्च सामाजिक नीतिमत्ता व कामातील योग्यता बघून अभियंत्यांना गौरविण्यात येते. त्यांच्या नावाचा पुरस्कार स्वीकारणाऱ्यांनी त्या हिमालयाएवढ्या उत्तुंग व्यक्तिमत्त्वाचा, त्यांनी केलेल्या कठोर परिश्रमाचा व कामाचा दर्जा याबाबत कुठलीही तडजोड न स्वीकारण्याचा आदर्श घेऊन भारत उभारणीचे काम पुढे चालवले, तर हेच त्यांच्या स्मृतींना खरेखुरे अभिवादन ठरेल.

- उदयकुमार पाटील, दिनकर सलाम.

loading image
go to top