जीर्णोद्वार 

need for trees
need for trees

रस्त्यावर तशी फारशी वाहतूक नसते... उन्हं उतरलेली... प्रवास मराठवाड्याच्या दिशेने. ना डोंगर ना गर्द झाडी. पळत जाणारा माळ... खुरट्या वनस्पती. गाडी वळण घेते आणि भल्या मोठ्या चिंचेच्या झाडाला वळसा घालून पुढे जाते... क्षण-दोन क्षणाचं दृश्‍य! कुठंतरी पाणी असणार जवळपास. पंधरा-वीस झाडांचा हिरवा तुकडा. तेवढाच. पण दृश्‍यं किती? कानावर आतल्या छोट्याशा देवळातून अस्पष्ट येणारं संगीत. झाडाच्या आणि रस्त्याच्या मध्ये बांधकामावेळी शिल्लक राहिलेले दगड. न घडवलेले. दगडांच्या सांद्रीत वाळलेली पाने. कोवळी छोटी. भिंतीवरच्या तिरक्‍या प्रकाशात... उजळून आलेली पांढरी सदाफुली. एखाद्या आतल्या ओहोळावर विसंबून. जुनी, ओशट वस्रे. तारेवर कसरत करणारी. वारा सुटलाय ना? उडून कसं चालेल? 

कधीतरी दिवसा कोणीतरी थांबून गेलंय नक्कीच. आतपर्यंत गेलेली पानगळ चुरगाळत. कोणतं मंदिर? नाही येत अंदाज. एक जुना पत्रा काही रंगवलेला. अर्धवट लंबाक्षरे त्यावर! त्यावरच स्वतःची जाहिरात चिकटवलेली. दगडी भिंतीच्या जोडकामात वेड्यावाकड्या पडलेले सायकलचे टायर्स. अगदी तिथेच चेपवलेले लोखंडी पत्र्याचे कॅन्स, मुद्दाम चेपवलेले. वेळ घालवण्याचे साधन. 

चिंचेच्या झाडालाच बांधलेल्या दोरीला घट्ट बिलगलेला लाकडी पाळणा. जुना असणार, पाळण्याच्या तळाला असणाऱ्या तिरक्‍या पट्ट्या गायब.. या माळावरचं हे देऊळ ! कदाचित कुणाची समाधी असेल? की पूर्वी चोराचिलटांची भीती नको म्हणून उभा केलेला एक विसावा असेल? निजामशाहीचा हा प्रदेश, लढाया बघितलेला, पावसाळे नव्हे, तर उन्हाळेच जास्त बघितलेला. 

आजूबाजूला लोकवस्ती नाही. नजरेच्या टप्प्यात. नवसायास, माहेरवाशीण, बाधा करणी यासाठी इथं यायचं ही प्रथा. वावर तो अशांचाच. परंपरेच्या जमिनी, श्रद्धा पिढ्यान पिढ्या ओल्याच. गर्द चिंचेच्या झाडासारखा. 

मग वर्षातून होणारे उत्सव सण, जत्रा. आख्यायिका. अनुभव, रितिरिवाज मनासारखं झाल्यावर, नवस पावल्यावर कोपऱ्यात एखादा माठ, समई, वाद्य. फरशीच्या मधोमध नवं पितळी कासव... घंटा, ग्रील, सूरपेटी, तंबोरा, आवारात एखादीच पाणपोई. नवं पत्र्याचं शेड.... इथल्याच सावलीत बसून मग पत्रावळ्यांवर दोन घास खात खात गप्पाही रंगत असतील. नातीगोती, शेत, शिवार, सुखदुःख. इथेच नवे संबंध निर्माण होत असतील. तू या गावचा ना? मग आमची मुलगी या इकडची... पानसुपारी तंबाखूच्या चंचीसोबत, माहितीची अदलाबदल. एखाद्या वेळी झटकन यादी पे शादी. मग नवं जोडपं पुन्हा इथलचं. दर्शनाला, गुलाबी चमचमतं बाशिंग बांधून पिवळ्याधोट पायाची नववधू आणि वऱ्हाड. 

इथल्या सावलीतच, कुणी शेतकरी लवंडून उन्हाची तिरीप चुकवत चुकवत वाट हलकी करण्यासाठी, तर याच परिसरात काठी टेकत येऊन खोकल्याची उबळ आली तर सुरकुतलेल्या हातांनी ताल धरत, भजन म्हणणारी मोठ्या लालभडक कुंकवाची आज्जी. आषाढीला वारकऱ्यांचा मुक्कामही कदाचित. गाडी बंद पडली किंवा पंक्‍चर काढेपर्यंत आत आलेले शहर प्रवासी. उत्सुकतेनं गाभाऱ्यात डोकावणारी. फरशीवर धावणारी त्यांची छोटी कच्ची बच्ची. 

गाडी नीट रस्त्याला लागलेली असते. एका वळणावरच्या छोट्याशा एका दृष्यानं, त्या चिंचेच्या झाडानं, त्या परिसरानं अनेक शक्‍यतांना, कल्पनांना, विचारांना निरीक्षणाला मंथनात ढकललेलं असतं... विस्तीर्ण माळ आता कमी कमी होत जातोय. अंधार पडतोय.. दूरवरच्या शहराकडून येणारे मालवाहू ट्रक्‍स, गाड्या, वर्दळ वाढत जाते आहे. शहराच्या वेशीबाहेरच फ्लेक्‍सचे प्रचंड बोर्ड लागलेत... नव्या मंदिराच्या बांधकामाचे! किती संगमरवरी दगड, किती उंची? किती कलाकुसर यांच्या सचित्र माहितीसह! शिवाय जीर्णोद्वाराला यथाशक्ती मदतीचे आवाहन... नवसाला नक्की पावणारं प्राचीन देवस्थान... आवाहन, भक्तीला, भक्तांना, सर्वांनाच! 
इथं तो चिंचेचा वृक्ष नाही. ना तो टांगलेला लाकडी पाळणा. सावली तरी कशाची पडणार? 

संगमरवरी नक्षीत, दिव्यांच्या कृत्रिम चकमकाटात, पायऱ्यांच्या वळणदार टप्प्यांतून, थंडगार पाण्याच्या प्युरिफायर्समधून, चायनीज बनावटीच्या दीपमाळांतून, हायजीनिक वाटेल अशा तीर्थ-प्रसादाच्या तयार पॅकेटच्या सेवाभावातून इथल्या सगळ्याच अणुरेणुतून ते अस्सल चिंचेचे झाड उगवेल? 

ज्या झाडानं माझ्या कल्पनाशक्‍तीचाच जीर्णोद्वार केला आता ते स्तब्ध असेल. देऊळही. फक्त समई पेटती असेल कदाचित. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com