New Year Celebration : पुरी श्रीखंड-दूरदर्शनवर रंगारंग कार्यक्रम, न्यू ईयरची पुरानी यादें... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New Year Celebration

New Year Celebration : पुरी श्रीखंड-दूरदर्शनवर रंगारंग कार्यक्रम, न्यू ईयरची पुरानी यादें...

हल्ली सर्वच शाळांना नाताळाच्या ८ ते १२ दिवस सुट्ट्या असतात. सुट्ट्या लागण्यापुर्वी शाळाच मुलांसाठी ख्रिसमस पार्टी ठेवते, शाळा सुरू झाल्यावर न्यु इयर पार्टी केली जाते. त्यामुळे आनंद साजरा करायचा म्हणजे पार्टी झालीच पाहिजे असं जणू हल्लीच्या मुलांना बाळकडूच मिळतं.

मग लहान मुलांची मित्रमंडळी सोसाटीत पार्टीचं आयोजन करतात, जरा मोठी मुलं, मंडळी बाहेर पार्टी करतात तर ज्येष्ठ मंडळीचं त्यांच असं स्वतंत्र काहीतरी प्लॅनिंग असतं. आणि अगदीच काही नसलं तर टीव्हीवरचे कार्यक्रम असतातचं.

पण साधारण एक १५-२० वर्षांपूर्वी आमच्या लहानपणी हे चित्र अगदीच वेगळं असायचं. ३१ डिसेंबर साजरा करायचा, नवीन वर्षाचं स्वागत करायचं म्हणजे लहानांपासून थोरांपर्यंत सगळ्यांचा मिळून असा एकत्र प्लॅन केला जात.

खाण्या-पिण्याची चंगळ

कोणतंही सेलिब्रेशन म्हटलं की, खाण्या पिण्याची चंगळ हे ओघानंच आलं. ते तेव्हाही असायचं. मग घरात काहीतरी खास बनवण्याचा बेत आखला जात, नाहीतर स्पेशल बाहेरून ऑर्डर होत. चायनीज, पास्ता, पिझा असे आज नेहमीचे झालेले पदार्थ त्यावेळी खास अशा दिवशीच खायला मिळायचे. त्यातली उत्सुकता, कुतूहल, मजा आज उरलेलीच नाही.

दूरदर्शनवरचे कार्यक्रम

त्यावेळी घराघरात दूरदर्शन पोहचलेलं असलं तरी आजच्या सारखे भरमसाठ चॅनल्स नव्हते. त्यामुळे ३१ डिसेंबर ला दूरदर्शनवर दिवसभर वर्षभराचा आढावा आणि रात्री रंगारंग कार्यक्रम असायचा. हल्ली बऱ्याच पुरस्कारांच्या कार्यक्रमात सिने तारेतारकांना आपण स्टेजवर सादरीकरण करताना पाहतो. पण त्यावेळी असं या रंगारंग कार्यक्रमातच बघायला मिळत. कोणत्या तरी मोठ्या अभिनेत्या, अभिनेत्रीची खास मुलाखत, किस्से हे आज रोजचंच असलं तरी त्यावेळी ३१ डिसेंबरच्या कार्यक्रमाची खासियत असे.

हा कार्यक्रम घरातले एकत्र बसून बघणार. तेवढ्या वेळात आई दुसऱ्या दिवशी नवीन वर्षाच्या स्वागतासाठी काय बेत करणार त्याची तयारी टी. व्ही बघत करणार. मग तिला गुलाबजाम वळायला, खोबरा बर्फीच्या वड्या पाडायला बाकीचे मदत करणार असं वातावरण असत.

१२ चा ठोका पडला

टीव्ही वरच्या च्या रंगारंग कार्यक्रमात १०, ९, ८, ७, ६... असं काउंट डाऊन सुरू झालं की सगळे जण टीव्ही समोर जमा होणार आणि १२ चा ठोका पडताच टीव्ही वर फाटाके फुटून हॅप्पी न्यू इयर आलं की, सगळे एकमेकांनी विश करणार. लहान घरातल्या मोठ्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेणार. मोठे पण अगदी तोंड भरून नवीन वर्षाच्या भरभराटीच्या शुभेच्छा देणार.

हल्ली हे सगळं हरवलं आहे. आताही घरातल्या सगळ्यांना शुभेच्छा दिल्या जातात पण आपापल्या पार्टीच्या ठिकाणाहून फोन करत. मागे सुरू असलेल्या गोंधळात एका कानात बोट घालत ओरडून. तर अर्धवट ऐकू येत असलेल्या शुभेच्छांचा अंदाज घेत थँक्यू म्हणत सरत्या वर्षाला निरोप दिला जातो.

पार्ट्यांच्या झिंगेने दमून मध्यरात्री पहाटे घरी परतून मग पेंगलेल्या डोळ्यांनी सूर्य पार डोक्यावर आल्यावर नवीन वर्षाकडे बघितलं जातं.