esakal | मास्क नाही तर...!
sakal

बोलून बातमी शोधा

 No mask  no access no objects no service kolhapur campion story by amar ghorpade

प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात ‘नो मास्क नो गुड’ हे स्टिकर चिकटवले आहे. दुकानदाराने मास्क घातला नसल्यास त्याच्याकडे खरेदी करू नये. ग्राहकाकडे मास्क नसल्यास त्याला वस्तू देऊ नयेत. यामुळे दोघेही एकमेकांचे प्रबोधन करून मास्क वापरतील.

मास्क नाही तर...!

sakal_logo
By
अमरसिंह घोरपडे

‘मास्क नाही, प्रवेश नाही; मास्क नाही, वस्तू नाही; मास्क नाही, सेवा नाही’ हा अभिनव उपक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सुरू आहे. ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत हा उपक्रम राबवला जात आहे. त्याची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी केली जात आहे. ठिकठिकाणी यासंदर्भातील फलक झळकताना दिसत आहेत. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी राबवलेल्या या अभिनव उपक्रमाचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही कौतुक केले. त्यांनी नुकताच पुणे महसूल विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी दृक्‌श्राव्य प्रणालीद्वारे संपर्क साधला होता. मुख्यमंत्री ठाकरे यांनी या उपक्रमाचे कौतुक करून हा उपक्रम राज्यभर राबवायला हवा, असे मत व्यक्त केले. त्यानुसार अनेक ठिकाणी याचे अनुकरणही सुरू झाले. यातूनच या उपक्रमाचे आजच्या कोरोनाच्या महामारीत महत्त्व अधोरेखित होते.


कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. लोकांमध्ये मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग यासारख्या कोरोनाचा संसर्ग रोखणाऱ्या उपाययोजना राबवण्याची जागृती प्रशासनाकडून केली जात आहे. कारवाईबरोबरच कोरोनाबाबत प्रबोधनाची जोडही आता दिली जात आहे. यासाठी लोकांचा संपर्क येणारी ठिकाणे ज्यामध्ये शासकीय कार्यालये, खासगी कंपन्या, व्यापारी, दुकानदार एवढेच नाही, तर टपरीमधूनही मास्क वापराबाबत जागृती करण्यासाठी दर्शनी भागात स्टिकर लावण्यात येत आहेत. कागलमध्ये कागल नगरपरिषदेने शहराच्या प्रवेशद्वारावरच ‘नो मास्क, नो एंट्री’ हा डिजिटल फलक उभारला आहे. त्याचबरोबर शहरातील चौक तसेच वर्दळीच्या ठिकाणीही नागरिकांच्या दृष्टीस येतील अशा पद्धतीने छोटे-मोठे डिजिटल बॅनर, फलक लावले आहेत.

प्रत्येक दुकानाच्या दर्शनी भागात ‘नो मास्क नो गुड’ हे स्टिकर चिकटवले आहे. दुकानदाराने मास्क घातला नसल्यास त्याच्याकडे खरेदी करू नये. ग्राहकाकडे मास्क नसल्यास त्याला वस्तू देऊ नयेत. यामुळे दोघेही एकमेकांचे प्रबोधन करून मास्क वापरतील. याच पद्धतीने लोकसंपर्काच्या सर्वच ठिकाणी मास्कचा वापर अनिवार्य झाल्यास कोरोनाला अटकाव करण्यात यश येऊ शकते. त्याचबरोबर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणेही आवश्‍यक आहे. या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने कारवाईबरोबरच प्रबोधनाचे पाऊल उचलले आहे.


सार्वजनिक ठिकाणी थुंकत सामाजिक आरोग्य धोक्‍यात आणणाऱ्या व्यक्तींचे प्रबोधनही सुरू केले आहे. यासंदर्भात ‘सकाळ’नेही ग्राउंड रिपोर्ट करत ‘पिचकारी नव्हे, तर कोरोनाचे स्फोटकच’ या शीर्षकाखाली प्रकाशझोत टाकला होता. याबाबत प्रशासन तसेच कोल्हापूरमधील सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन ‘माझं कोल्हापूर, थुंकीमुक्त कोल्हापूर’ मोहीम राबवत आहेत. यासाठी विविध स्लोगन करून त्याद्वारे सोशल मीडियावरही जागृती केली जात आहे. या सर्व माध्यमातून लोकांत कोरोनाबाबत जागृती केली जात असताना आपणही शक्‍य तितकी खबरदारी घेऊन त्याला साथ देण्याची आवश्‍यकता आहे. एक जबाबदार नागरिक या नात्याने या मोहिमांना पाठबळ देऊन कोरोनाच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सूचनांचे पालन केले पाहिजे.

संपादन - अर्चना बनगे