जगातले हे एकमेव देवालय सुरू आहे....

डॉ. नितीन जोशी, नांदेड
गुरुवार, 26 मार्च 2020

जगातले सर्वच देव ‘कोरोना’च्या भीतीमुळे सशस्त्र माणसांच्या पहाऱ्यात दरवाजा लावून बंद आहेत. सर्व धर्मस्थळे बंद करून फक्त एकच धर्म - मानवता आणि एकच धर्मस्थळ - हॉस्पिटल चालू आहे. सध्या डॉक्टर महादेव झाले आहेत आणि कर्मचारी पुजारी. हे वास्तव आहे. 

त्वमेव माताश्च पिता त्वमेव
त्वमेव बंधूश्च सखा त्वमेव

असं हिंदू पुराणात किंवा शास्त्रात सांगितलं आहे. अर्थात हे परमेश्वरा तूच आई अन तूच बाप. माझी पत्नी गेल्याला आज ३ वर्षे ७ महिने आणि २६ दिवस झाले. त्या प्रसंगातून मी शुद्धीवर आल्यापासून वरील श्लोकाचा अर्थ शोधत होतो. मला पडलेला पहिला प्रश्न, की जगाच्या पाठीवर असे कोणते आई-वडील आहेत ज्यांना असं वाटतं, की माझं एक मूल चहा विक्रेत्याचा पंतप्रधान व्हावा तर दुसऱ्या मुलाने वयाच्या विसाव्या वर्षी अतिरेकी बनून आपल्याच इतर काही भावंडांना बॉम्ब टाकून विनाकारण मारून टाकावं, किंवा एका मुलाने रस्त्याच्या कडेला भीक मागावी अन दुसरया मुलाने आपल्या आलिशान घराच्या २७ व्या मजल्यावरून जीव वाचविणाऱ्या आपल्या इतर बांधवांना म्हणजेच डॉक्टर, हॉस्पिटलशी संबंधीत इतर कर्मचारी, पोलीस आणि प्रशासकीय व्यक्तींच्या प्रति कृतज्ञता म्हणून घंटी वाजवत फेरफटका मारावा? मी स्वत: जरी आईबाप नसलो, तरी तितकी संवेदना नक्कीच बाळगतो. माझ्या बुद्धीला ही गोष्ट पटतच नाहीये की त्वमेव माताश्च...

साईबाबांनी तिला बुद्धी का दिली नाही?

माझी पत्नी एम.बी.बी.एस ; एम.डी. असून साईबाबांची फार मोठी भक्त होती. पण तिने स्वेच्छेने हे जग सोडून जाताना, ज्या साईबाबांनी फाटक्या वस्त्रानिशी आजन्म लोकसेवा केली आणि आज ज्यांची संपत्ती हजारो करोड रुपये आहे, जे सुवर्णमुकुट घालून तटस्थ बसून मानवजातीला आशीर्वाद देतात त्या साईबाबांनी तिला मिळालेल्या ज्ञानाचा उपयोग कोरोनाग्रस्त जनतेच्या सेवेसाठी कामी येईल अशी बुद्धी का दिली नाही, असा प्रश्न मला पडला आहे. मात्र काल देशात लॉकडाऊन झाल्याची घोषणा झाल्यानंतर आणि स्वतःच साईबाबांचं देऊळ कुलुपबंद झाल्यानंतर त्या संगमरवरी मूर्तीकडे पाहताना मला याचं उत्तर मिळालं.

माणसांना परिस्थितीनुसार देवही होता येतं

साईबाबा फक्त जिवंत असतानाच तसं करू शकत होते. आता नाही. ही वेळ त्या प्रतिमेकडे पाहून जीवन कसं जगलं पाहिजे आणि ते किती लोकोपयोगी असलं पाहिजे हे समजून घेण्याची आहे. कारण, कोणताच देव त्याची जागा सोडून आजच्या घडीला जेव्हा त्याची संपूर्ण जगाला अत्यंत गरज आहे, तेव्हा यायला तयार नाही किंवा येऊ शकत नाही. मात्र कदाचित त्यानेच काही जणांची नियुक्ती त्याचं काम करण्यासाठी केली असावी. हे नियुक्त केलेले लोक; शासन- प्रशासन, वैद्यकीय सुविधा पुरविणारे सर्वचजण, किराणा दुकानदार, दूधवाला भैया आणि भाजीविक्रेते, पोलीस-प्रसारमाध्यम नावाची काही देवमाणसं आहेत असं जनता जनार्दन म्हणताना आपण पाहत आहोत. इंट्रेस्टिंग गोष्ट आहे, माणसांना अचानक प्राप्त परिस्थिती नुसार देवही होता येतं, इतर वेळा ते बिझी असल्याने दगडांना आपण देव म्हणतो.

कोरोनाने मनुष्याला त्याची जागा दाखवली

आज आपल्या सर्वांची प्रार्थना एकच आहे; दुसरा माणूस माझ्याजवळ यायला नको, कारण तो ‘यम’ असू शकतो. ही अतिशयोक्ती वाटत असली तरी ‘सोशल डिस्टसिंग’च्या माध्यमातून दिला जाणारा निरोप तूर्तास तरी असंच सांगतो आहे. काय ही आपली “मी माणूस”ची अवस्था? अगदी काही आठवड्यांपूर्वी आपली चर्चा, मी ह्या जातीचा, तू त्या जातीचा, मी ह्या धर्माचा, तू त्या. हा माझा देश तो तुझा; माझ्या विमानात मला कोणीही कधीही मारू शकणार नाही अशी अस्त्रे आणि क्षेपणास्त्रे आहेत, तर तुझ्याकडे जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे. माझ्याकडे जगातली सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे तर तुझ्याकडे जगातला सर्वात मोठी व्यापारव्यवस्था असं म्हणणाऱ्या ‘माणूस’ नावाच्या किड्यांना ज्याच सरासरी आयुष्यमान ७० वर्षे आहे त्याला उघड्या डोळ्यालाच काय पण साधारण सूक्ष्मदर्शकाखालीदेखील न दिसणाऱ्या आणि फक्त काही तास किंवा काही दिवसाचं आयुष्य जगणाऱ्या ‘कोरोना’ नावाच्या जग्गजेत्याने जागेवरच त्याची जागा दाखवून दिली आहे.

अजून २१ दिवस घरात बसायचे ध्यानात ठेवा

आपल्याला मिळालेला हा ३ आठवड्यांचा काळ प्रत्येक व्यक्तीने माणूस म्हणून जगण्यासाठी, आत्मचिंतनासाठी निसर्गाने दिलेली संधी आहे. याचा लाभ घेतला नाही तर येणाऱ्या काळात कोरोनाचा भाऊ ‘हंटा व्हायरस’ परत एकदा चीनच्या दारावर ठोठावत ‘मी येतोय’ असं आपल्याला सांगतो आहे हे लक्षात ठेऊन फक्त घरात बसायला सांगतो आहे, हे ध्यानात ठेवा.

इतर ब्लॉग्स