डोकेबाज पोलिसिंग 

ब्रिजमोहन पाटील
Friday, 18 September 2020

पुण्याचे पोलिस आयुक्त डॉ. के. व्यंकटेशम यांची मुंबईत पोलिसांच्या विशेष अभियान विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. पुण्यात काम करत असताना त्यांनी  गुन्हेगार, व्हाइट कॉलर गुन्हेगार, वसुलीदार यांचा व्यवस्थित कार्यक्रम केला. पोलिस कर्मचारी, अधिकारीही यातून सुटले नाहीत. त्यांनी राबविलेल्या डोकेबाज पोलिसिंगविषयी... 

टेबलावर एक डायरी...कोणी भेटायला आले की, हाताची घडी घालून शांतपणे म्हणणे ऐकून घ्यायचे...महत्त्वाची गोष्ट लक्षात येताच त्याचे पॉइंट लगेच नोट लिहून ठेवायचे. तो व्यक्ती परत भेटायला आला की लगेच डायरीची पाने उलटून पाहायची. मग थेट फोन करून काम का झाले नाही, याची विचारणा करायची. पत्रकाराने देखील सूचना केली किंवा तक्रार केली, तरी लगेच त्याची डायरीत नोंद करायची. त्यावर, "मैने सब लिखकर रखा है, सब काम होगा." असे सांगायचे...त्यांच्या या डायरीत भरपूर काही दडलेले होते. पुण्यातील भल्या भल्या लोकांची कुंडली होती त्यात...ठरलेल्या गोष्टी वेळेत होतात की नाही, हे डायरीत बघूनच ते सांगायचे. मनात विचार यायचा सीपींची ही डायरी चुकून आपल्या हातात पडायला पाहिजे, लई धिंगाणा होईल....

व्यंकटेशम यांनी गुन्हेगार, व्हाइट कॉलर गुन्हेगार, वसुलीदार यांचा व्यवस्थित कार्यक्रम केला. पोलिस कर्मचारी, अधिकारीही यातून सुटले नाहीत. नागपूरवरून पुण्यात आल्यावर त्यांनी दर मंगळवारी सर्व पीआय, एसीपी, डीसीपी यांची बैठक घेण्यास सुरवात केली. त्याला ते टीआरएम (मंगळवारची आढावा बैठक) म्हणत...पोलिस ठाण्यात आलेल्या प्रत्येक अर्जाचे काय झाले, गुन्ह्याचा तपास कुठे आला, असं बरंच काही बघायचे. सोबतची डायरी उघडली की कोण खोटं बोलतोय, हे कळायचे. टीआरएमची तयारी करण्यातच पीआयचे तीन- चार दिवस जात...सगळे लई वैतागून गेले होते. त्यावेळी मी सामनामध्ये टीआरएमला पोलिस अधिकारी वैतागले, असा भला मोठा कॉलम लिहिला होता. त्याच्या महिन्याभरानंतर सगळ्या संपादकांची पोलिस आयुक्तालयात बैठक घेऊन टीआरएम इंपॅक्ट असा रिपोर्ट सादर केला. किती अर्ज निकाली काढले, किती पेंडिंग आहेत, सायबर क्राईम, स्ट्रीट क्राईमचे काय झाले, असं बरच काही मांडले. मलाही हा रिपोर्ट दिला आणि म्हणाले, "देख टीआरएम काम कर रहा है की नही..." रिपोर्ट बघून काही प्रमाणात तरी प्रश्न सुटलेत असे जाणवले. (१०० टक्के प्रश्न संपणे शक्य नाही...)

महिला, वृद्ध व लहान मुलांसाठी भरोसा सेल हा व्यंकटेशम यांचा ड्रीम प्रोजेक्ट होता. (बदली झाल्यावर आता बंद पडतो की सुरू राहतो हे महत्त्वाचे...) पोलिस अधिकाऱ्यांचा विरोध आहे, हे माहिती असूनही त्यांनी स्वतंत्र इमारतीमध्ये हा विभाग सुरू केला. त्यासाठी वाहतूक पोलिसांचे कार्यालय येरवड्याला घालवले. त्यांनी एकदा प्रत्येक पोलिस ठाण्यातील जिल्हाधिकाऱ्यांची (कलेक्टर) बैठक घेतली आणि सुधरा, असे सांगितले. त्यानंतर एक दोन महिन्यात बरेच कलेक्टर पोलिस मुख्यालयात होते. काही तर बडतर्फ झाले. ही सिस्टीम पूर्ण मोडून निघाली नाही, पण आतापर्यंतचा हा सर्वात मोठा झटका होता. अवैध धंदे बंद करण्यासाठीही शक्कल लढवली. क्राईम ब्रांचला अचानक कारवाईला पाठवले, पण यात ही तोडपाणी होत असल्याने रेकॉर्ड ठेवण्यास सुरवात केली. क्रीम पोस्टिंग असलेल्या सामाजिक सुरक्षा शाखेचे, क्राईम ब्रांचचे विचित्र प्रशासकीय बदल करून महत्त्व संपवले. त्याचे काही दुष्परिणामही झाले. व्यंकटेशम यांनी डोकेबाज पोलिसिंग केले. "किसी को घुस्से से बात कर के नाराज नही करने का?" असं म्हणत ते कार्यक्रम करतं.

व्यंकटेशम यांचा एक चांगला निर्णय म्हणजे, त्यांना भेटायला येणाऱ्या लोकांसाठी मस्त व्यवस्था केली. पूर्वी लोक पॅसेजमध्ये थांबून रहायचे. त्यांनी मस्तपैकी मोठ्या हॉलमध्ये सोफा, टीव्ही वैगेरेची सोय केली, त्यांचे अर्ज घेऊन म्हणने ऐकून घेण्यासाठी दोन पीएसआय नेमले. त्यामुळे वैतागलेल्या लोकांचा राग अर्धा कमी होत असे. त्यानंतर ते स्वतः भेटून म्हणने ऐकून घेत. सीपी आॅफिसच्या इमारतीत सुधारणा करून पोलिसांनाही चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला. गेले कित्येक वर्ष फक्त अधिकाऱ्यांच्या केबिनचे फर्निचर बदलत, पण व्यंकटेशम यांनी सीपी आॅफिसचे रूप पालटले.

आपले संस्थान कसे खालसा झाले, हे काही लोकांना कळाले नाही. त्यामुळे हे लोक व पोलिस सीपीला लई शिव्या घालत...कधी बदली होते, याची वाट पाहत होते. (सामना सोडल्यानंतर क्राईम बीटवर मी नाही, पण तोपर्यंत तरी हे सगळे असे झाले होते.) आज अखेर बदली झाली. आता डॉ. के. व्यंकटेशम यांना शुभेच्छा. मुंबईत पोलिसांच्या विशेष अभियान विभागाच्या प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. नेमके तेथे काय काम चालत ते माहिती नाही, पण ते नक्कीच नवे काय तरी प्रयोग करतील. मी सामना सोडून सकाळला ज्वाईन झालो, तेव्हा नेमके लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजत होते, त्यावेळी "तू तो दल बदलू निकला, अच्छा काम कर..." असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या होत्या…

(लेखक पुणे सकाळमध्ये बातमीदार आहेत)

इतर ब्लॉग्स