वेगाची ‘महाराणी’ अमेरिकन जेट कार रेसर जेस्सी कोम्बस...

युवराज इंगवले
मंगळवार, 30 जून 2020

जेस्सीला लहानपणापासूनच वेगाची गोडी होती. त्यातूनच तिने कार रेसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला.

क्रीडा जगतात पुरुषांप्रमाणे महिलांनीही आपला ठसा उमटवला आहे. धाडसी खेळातही महिलांनी ‘हम किसीसे कम नही’ हे जगाला दाखवून दिले आहे. अमेरिकन जेट कार रेसर जेस्सी कोम्बस ही त्यापैकीच एक धाडसी खेळाडू. मात्र, वेगानेच तिचा बळी घेतला. २७ ऑगस्ट २०१९ रोजी एका स्पर्धेत तिला आपला जीव गमवावा लागला. नुकताच तिचा मरणोत्तर ‘सर्वोत्तम जेट कार रेसर महिला’ म्हणून गौरव करण्यात आला आणि तिच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये करण्यात आली.

जेस्सीला लहानपणापासूनच वेगाची गोडी होती. त्यातूनच तिने कार रेसमध्ये करिअर करण्याचा निर्णय घेतला. २०१३ मध्ये ताशी ६४०.५४९ किलोमीटर वेगाने कार चालवून नवा विक्रम आपले नावे केला होता. त्यानंतर जगभरात सर्वात वेगवान कार चालविणारी महिला रेसर म्हणून लोकप्रियता मिळवली. जेस्सीने कार रेसरमध्ये (तीन चाकी कार) जेव्हापासून सहभाग नोंदवण्यास सुरुवात केली तेव्हापासून तिला नवे विक्रम प्रस्थापित करण्याचा जणू ध्यासच लागला होता. तिचा हाच ध्यास जीवघेणा ठरला. २७ ऑगस्ट २०१९ मध्ये ओरगॉन येथील अल्वर्ड डेजर्ट लॅंड स्पीड स्पर्धेत जुना विक्रम तोडण्याचा प्रयत्न करत असताना जेस्सीला मृत्यूने कवटाळले. त्यावेळी तिने ताशी ८४१ वेगाने कार चालवून जागतिक विक्रम आपल्या नावे नोंदविला होता. त्याच विक्रमाची दखल घेत तिला मरणोत्तर जगातील सर्वोत्तम कार रेसर म्हणून सन्मानित करण्यात आले आणि अधिकृतपणे तिच्या विक्रमाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डस्‌मध्ये करण्यात आली.

गेल्या वर्षी ३९ वर्षांच्या जेस्सीने ४० वर्षांपूर्वीचा देशवासीय किटी ओल नील हिचा विक्रम मोडीत काढला होता. किटीने १९७६ मध्ये ताशी ८२३ वेगाने कार चालवून आपल्या नावे जागतिक विक्रम नोंदविला होता. जेस्सीच्या गौरवाबाबत तिची मैत्रीण टॅरी म्हणते, की अखेर जेस्सीचा विजय झाला. जेस्सीकडे प्रचंड इच्छाशक्ती होती. काही तरी जगावेगळे करून दाखविण्याची तिच्याकडे जिद्द होती आणि मला माझ्या मैत्रीणीचा अभिमान वाटतो. सकाळी अलार्म वाजताच जेस्सी झोपेतून जागी व्हायची. चला आज आपण इतिहास रचूया, अशी जेस्सी म्हणायची. तिचा आत्मविश्‍वास माझाही आत्मविश्‍वास वाढवायचा. २७ ऑगस्ट २०१९ रोजी ती एकटीच आपली कार घेऊन अल्वर्ड मेरूस्थळ येथे होणाऱ्या स्पर्धेला रवाना झाली. स्पर्धेत कारसह उतरताच जेस्सीच्या कारने बघता बघता ताशी ८४१.३३८ किलोमीटरचा वेग पकडला. मात्र, तिच्या कारमध्ये तांत्रिक बिघड झाला आणि अपघातात जेस्सीचा मृत्यू झाला. जेस्सीने आपली तीन चाकी कार घरीच बनवली होती.

जेस्सीचा मृत्यू डोक्‍याला जबर मार बसल्याने झाला आणि तिच्या मोटारीने पेट घेतला. त्यावेळी तिला तत्काळ बाहेर काढण्यात आले. मात्र, रुग्णालयात जाण्यापूर्वीच तिने जगाचा निरोप घेतला होता. जेस्सीसारख्या महिला काहीतरी मुलखावेगळे करून जातात आणि संपूर्ण महिला जगताचा सन्मानच वाढवतात.

 

kolhapur poltics

इतर ब्लॉग्स

संपादकीय बातम्या