जरा पडू दे मुखात, थोडी शिळीच भाकर!

सकाळ वृत्तसेवा
Friday, 16 October 2020

‘पुस्तकप्रेमी’ ग्रुपमधून एकवटली संवेदनशील मनं

 ‘हात जोडितो पावसा, जरा ढगाला आवर..., जरा पडू दे मुखात, थोडी शिळीच भाकर’ सवना येथील कवी राजकुमार नायक यांची ही सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करणारी कविता. कोरोनाच्या लॉकडाउनमुळे सारे जग ठप्प झाले आणि हातातला स्मार्टफोन साऱ्यांचाच मित्र बनला. सोशल मीडियावर बरेच काही चालू असतं; पण आपल्याला जे वाटतं, जे भावतं ते व्यक्त करण्यासाठी अशीच काही संवेदनशील मनं एकवटली आणि त्यांनी ‘पुस्तकप्रेमी’ नावाचा एक व्हॉटस्‌ ॲप ग्रुप तयार केला. याच ग्रुपवर आज सकाळी नायक यांनी पोस्ट केलेली ही कविता.

 दरम्यान, या ग्रुपच्या माध्यमातून सध्या कोल्हापूरस ते दुबईपर्यंतची मंडळी एकत्र आली आहेत आणि त्यांनी सुरू केलेला हा उपक्रम हळूहळू व्यापक होऊ लागला आहे. हल्ली तरुणाई वाचत नाही, हा चुकीचा समज असल्याचे या ग्रुपवरील तरुणाईच्या सहभागामुळे स्पष्ट होते. कारण अगदी विशीतल्या तरुणांपासून ते सत्तरीतल्या ज्येष्ठांपर्यंतची मंडळी या ग्रुपवर आहेत. रोज विविध पुस्तकांवर ग्रुपवर चर्चा होते. गेल्या साडेचार महिन्यांत सर्वाधिक मराठी पुस्तकांवर चर्चा झाली असली तरी हिंदी आणि इंग्रजी भाषांतील पुस्तकांचे प्रमाणही सुमारे दहा टक्के आहे आणि इतर प्रादेशिक भाषांतील पुस्तकांचे प्रमाणही दोन टक्‍क्‍यांपर्यंत आहे.

विषयांचा विचार केला तर ना. सी. फडके यांच्या ‘लघुकथा- तंत्र आणि मंत्र’ पुस्तकापासून ते मूत्रोपचारापर्यंत विविधांगी पुस्तकांवर येथे मंथन घडते. या ग्रुपवर आणखी एक वेगळा प्रयोग जाणीवपूर्वक केला जातो. तो म्हणजे प्रत्येक आठवड्याला एकावर जबाबदारी दिली जाते आणि त्यांनी वाचनविषयक रोज एक लेख लिहून तो ग्रुपवर पोस्ट केला जातो. कुणी लेख लिहितात तर कुणी रोज एक पुस्तक वाचून त्याविषयीचे आपले मत व्यक्त करतात, असे कृष्णा दिवटे सांगतात.

सकस वाचनविषयक मंथन या माध्यमातून घडते आहे. वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून या आठवड्यात मी रोज ‘माझ्या जीवाचे जीवन ः वाचन’ या विषयावर लेख पोस्ट करतो आहे. हळूहळू ही चळवळ नक्कीच वाढत जाईल.
- पी. डी. देशपांडे

संपादन - अर्चना बनगे

इतर ब्लॉग्स